सहकाराच्या माध्यमातूनच होईल शेतकरी आत्मनिर्भर : केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह

अजंग (ता.मालेगाव) येथे सहकार परिषद संपन्न

मालेगाव, दि. 24 (उमाका वृत्तसेवा) : शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र शासन कटिबद्ध आहे. सहकारातूनच शेतकऱ्यांच्या उन्नतीचा मार्ग समृद्ध होऊन देशातील शेतकरी आत्मनिर्भर होईल. त्यासाठी शेतीला विज्ञान व तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक असून यासाठी केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी राहील, असे प्रतिपादन केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी केले.

अजंग, ता. मालेगाव, जि. नाशिक येथे व्यंकटेश्वरा को. ऑप. पॉवर ॲण्ड ॲग्रो प्रोसिसिंगच्या माध्यमातून आयोजित सहकार परिषदेत केंद्रीय मंत्री श्री. शहा बोलत होते. यावेळी केंद्रीय सहकार व नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा (विदर्भ, तापी खोरे व कोकण विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार छगन भुजबळ, आमदार दिलीप बोरसे, माजी मंत्री डॉ. सुभाष भामरे, डॉ. भारती पवार, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, महामंडलेश्वर स्वामी संविदानंद सरस्वती आदी उपस्थित होते. यावेळी केंद्रीय मंत्री श्री. शहा यांच्या हस्ते माती परीक्षण प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले. तसेच बेळगाव येथील काजू उद्योगाचे दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून उदघाटन करण्यात आले.

केंद्रीय मंत्री श्री. शहा म्हणाले की, दिवंगत प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांनी जय जवान- जय किसानची घोषणा दिली. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या घोषणेला जय विज्ञानची जोड दिली. सुरुवातीच्या वर्षातच त्यांनी माती परीक्षणावर भर दिला. त्यामुळे शेतीला कोणते घटक आवश्यक आहेत याची माहिती मिळाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात बचत झाली. आगामी काळात मृदा परीक्षण करणाऱ्या संस्थांना मदत केली जाईल.

तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी सहकार विभागाची स्थापना केली. आगामी काळात सेंद्रीय शेती ही शाश्वत ठरणार आहे. या शेतीमुळे शेतकऱ्यांना समृद्धीच्या मार्गावर नेता येईल. त्याबरोबरच पर्यावरण रक्षणास मदत होईल. सेंद्रीय शेती आणि या शेतीतून मिळालेल्या उत्पादनांच्या प्रमाणीकरणासाठी केंद्रीय सहकार विभागाच्या माध्यमातून संस्थांची निर्मिती करण्यात येईल. जेणेकरून जागतिक बाजारपेठेत भारतीय शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळू शकेल. तसेच व्यंकटेश्वरा संस्थेने सुरू केलेले कार्य अनुकरणीय आहे. या संस्थेने उत्पादक ते निर्यातदार अशी मूल्य साखळी उभी केली. यामुळे सहकार क्रांतीला अधिकचे बळ मिळणार आहे. सहकाराचा पाया विश्वास असल्यामुळे ही संस्था या विश्वासास पात्र ठरणार आहे. याबरोबरच या संस्थेने जवान आणि किसान यांना जोडण्याचे काम केले. या संस्थेच्या माध्यमातून विविध फळ पिकांचे उत्पादन घेतले जात आहे. या फळ पिकांना बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी पॅकेजिंग, ब्रॅण्डिंग आणि मार्केटिंगसाठी पुरेपूर सहकार्य केले जाईल.

या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास होईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री श्री. शहा यांनी व्यक्त करीत साखर कारखाना उद्योगाच्या सबलीकरणासाठी केलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. त्यात मागील काळात राज्यातील साखर कारखान्यांना 10 हजार कोटी रुपयांचा आयकर माफ केला. तसेच सहकार विभागाच्या माध्यमातून देशपातळीवर गोदाम उभारण्यात येत आहेत.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, रासायनिक खतांचा वाढता वापर पाहता प्रयोगशाळांची आवश्यकता आहे. या प्रयोगशाळेतून शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळेल. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ‘सहकार से समृद्धी ही घोषणा देशासाठी क्रांतिकारक ठरणार आहे. शेतकऱ्यांनी शेतीबरोबरच पूरक उद्योगांवर भर दिला पाहिजे. व्यंकटेश्वरा संस्थेमुळे सेंद्रीय शेतीला पाठबळ मिळेल. या संस्थेला सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. यावेळी आमदार श्री. भुजबळ, माजी मंत्री डॉ. भामरे, डॉ. पवार, डॉ. महात्मे, डॉ. डोळे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. डोळे यांनी संस्थेच्या विस्ताराची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, व्यंकटेश्वरा संस्थेतर्फे बेळगाव येथे काजू प्रक्रिया उद्योग सुरू करण्यात आला आहे. तेथे रोज 24 टन काजू बियांवर प्रक्रिया करण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले. यावेळी राज्यासह कर्नाटकमधील आणि स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.