यवतमाळ, दि.24 (जिमाका) : प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना- पाणलोट विकास घटक 2.0 अंतर्गत जलसंधारणाच्या जनजागृतीसाठी ‘पाणलोट रथयात्रा’ काढण्यात येणार आहे. या राज्यस्तरीय यात्रेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते यवतमाळ येथून होणार आहे. जवळपास 30 हजार शेतकरी या कार्यक्रमास उपस्थित राहणार असून त्या अनुषंगाने आज पालकमंत्री संजय राठोड यांनी तयारीचा आढावा घेतला.
महसूल भवन येथे आयोजित बैठकीला पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत उंबरकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यात्रा शुभारंभ कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय ग्रामविकास मंत्री, राज्याचे दोनही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहे. यवतमाळ येथून यात्रेचा शुभारंभ झाल्यानंतर ही यात्रा दिग्रस तालुक्यातील लाख, तुपटाकळी, काटी, रामनगर गावातून पुढे जाणार आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक 2.0 या योजनेच्या राज्यातील 140 प्रकल्प क्षेत्रातील 30 जिल्ह्यांमध्ये पाणलोट रथ तीन महिने जनजागृतीचे काम करणार आहे. जिल्ह्यातून यात्रेचा शुभारंभ होणार असल्याने उत्तम नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना केल्या.
यात्रेदरम्यान पाणलोट अंतर्गत नवीन कामांचे भूमिपूजन, झालेल्या कामांचे जलपूजन तसेच लोकार्पण, वृक्ष लागवड, जुन्या पाणलोट कामांची दुरुस्ती, भूमी जलसंवाद, श्रमदान असे उपक्रम होणार आहेत. यात्रेसाठी पाणलोट योद्धे तसेच धरिणी ताई यांची पाणलोट जनजागृतीसाठी नेमणूक करण्यात येणार आहे. यात्रेतील सहभागासाठी युवकांची माय भारत पोर्टलमार्फत नोंदणी करण्यात येणार असून हाती मृदा घेऊन मृद व जल संरक्षण व संधारणाची शपथ घेतली जाणार आहे. यात्रेदरम्यान गावकऱ्यांना देखील शपथ दिली जाणार आहे.
यात्रेत दृकश्राव्य पद्धतीचे फिरते मोटार वाहन राहणार असून गावकऱ्यांना आभासी पाणलोट सहलीचा अनुभव घेता येईल. तसेच यात्रेदरम्यान माती व पाणी परीक्षण केले जाईल. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेतून शेतकऱ्यांना धरण व तलावातील गाळ शेतात टाकण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. यात्रेचा शुभारंभ यवतमाळात होणार असल्याने वेगवेगळ्या समित्या नेमून जबाबदारींचे वाटप करण्यात आले आहे. बैठकीत प्रत्येक समिती प्रमुखाकडून पालकमंत्र्यांनी तयारीचा आढावा घेतला.
यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा – संजय राठोड
मृद व जलसंधारण काळाची गरज झाली आहे. शेतकऱ्यांना सिंचनासह नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी जलसंधारण फार महत्वाचे आहे. त्याचे महत्व नागरिकांना पटवून देण्यासोबतच विविध घटकांचा यासाठी सहभाग वाढविण्यासाठी ही यात्रा आहे. या यात्रेत शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांनी केले आहे.