शंभर दिवसांच्या कृती आराखड्याच्या अनुषंगाने सर्व शासकीय विभागांचा आढावा
कोल्हापूर, दि. 24 : शासनाने नागरिकांसाठी ज्या आत्मीयतेने शंभर दिवसांचा कृती आराखडा तयार केला आहे त्या आत्मीयतेने त्याची अंमलबजावणी करा. लोकांचा शासनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपल्या कामातून बदलला पाहिजे अश्या सूचना पुणे विभागीय आयुक्त, डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले, येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला शासकीय कार्यालयामध्ये सौजन्याची वागणूक मिळावी. सर्वसामान्यांना चांगल्या प्रकारे शासकीय सुविधा, योजनांचा लाभ मिळावा, त्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून शंभर दिवसांचा कृती आराखडा तयार केला असून त्यामध्ये खूप साध्या साध्या गोष्टींचा समावेश आहे. त्या सर्व घटकांची यशस्वी अंमलबजावणी करून सकारात्मक बदल घडावेत. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, उपवनसंरक्षक गुरुप्रसाद, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, अति. पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, महानगरपालिका आयुक्त इचलकरंजी ओमप्रकाश दिवटे यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी तसेच गट विकास अधिकारी उपस्थित होते.
आयुक्त डॉ.पुलकुंडवार यावेळी म्हणाले, नागरिकांचे म्हणणे ऐकून त्यांचे जीवनमान सुखर होण्यासाठी मदत करा. शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी सौजन्याने वागून त्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची दक्षता घ्या. त्या ठिकाणी आवश्यक सोयीसुविधा यात स्वच्छतागृह, पिण्याचे शुद्ध पाणी, त्यांना बसण्याची व्यवस्था करा. स्वच्छतेबाबत सर्व विभागांसाठी त्या त्या जिल्ह्यात विभागीय आयुक्तांना नोडल अधिकारी म्हणून शासनाकडून नेमण्यात आले आहे. याअनुषंगाने त्यांनी आज कोल्हापूर येथे विविध विषयांचा आढावा घेतला. जिल्हा, तालुका, गावस्तरावर असणाऱ्या विविध शासकीय विभागांनी परस्पर समन्वय ठेवून शासनाचा उद्देश साध्य होण्यासाठी कामे करा. तालुकास्तरावर दर महिन्यातून एकदातरी एकत्रित येऊन बैठका घ्या. विविध प्रश्न त्या ठिकाणी चर्चेला घ्या आणि ते सोडवा. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय कोणीही सहज उपचार घेईल अशी सर्व सुविधांयुक्त असावीत. नव्या जुन्या सर्व शासकीय कार्यालयांमधील कचरा काढा, तसेच जुनी वाहने निर्गत करा असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. शासनाच्या संकेतस्थळावरून ग्रामीण भागातील लोकांना आवश्यक कामासाठी सहज माहिती मिळावी अशी अपलोड करा. प्रधानमंत्री आवास योजनेतील उद्दीष्ट पूर्ण होतील याची दक्षता घ्यावी. मंजूर घरकुले लवकर पूर्ण होण्यासाठी कर्जपूरवठा विना अडथळा होईल, यासाठी बँकाना आवश्यक ते निर्देश द्यावेत. 31 जानेवारीपर्यंत जीपीडीपी अपलोड होणे आवश्यक आहे. अधिकारी लोकांच्या भेटीसाठी वेळेत उपलब्ध असले पाहिजेत. नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा, सुविधा गुणवत्तापूर्ण असल्या पाहिजेत, अशा सूचनाही विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी दिल्या.
जिल्ह्यामध्ये येणाऱ्या कोणत्याही गुंतवणूकदारांना त्रास होईल असे कोणतेही प्रकारचे कृत्य प्रशासनातील कोणत्याही विभागाकडून होता कामा नये. ग्रामसेवकापासून ते जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत कोणत्याही स्तरावर नवीन येणाऱ्या उद्योगांसाठी अडचणी निर्माण होणार नाहीत किंवा झाल्या तरी त्या जलद गतीने सोडवल्या जातील यासाठी प्रयत्न करा. नवीन प्रकल्प त्याच वेळेत पुर्ण होईल यासाठी खात्रीने प्रयत्न करा. ग्रामपंचायत महापालिका अशा ग्रामीण शहरी भागातील महसूल, जिल्हा परिषदेने अतिक्रमण निर्मूलनासाठी विशेष मोहीम राबवावी. तसेच गड किल्ल्यांवरील अतिक्रमणाबाबत शासनाने दिलेल्या सूचनांनुसार तातडीने कार्यवाही करावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या. विभागीय आयुक्त डॉ.पुलकुंडवार यांचे स्वागत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पुस्तक भेट देऊन केले. महसूल विभागाकडून नागरिकांना विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात येत आहे. यामधील लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात विभागीय आयुक्त डॉ.पुलकुंडवार यांच्या हस्ते आधिवास प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यातील कामांबाबतचे सादरीकरण केले. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. व इचलकरंजी महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी त्यांच्या कामकाजबाबतचा आढावा दिला.
सर्व शाळांना सीसीटीव्ही बसविणारा कोल्हापूर जिल्हा राज्यात पहिला
कोल्हापूर जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सर्व 100 टक्के सीसीटीव्ही बसविण्याचे काम पुर्ण झाल्याचे त्यांनी बैठकीत सांगितले. हे संपुर्ण काम लोकसहभागातून केले असल्याचे ते म्हणाले. याबाबत विभागीय आयुक्त डॉ.पुलकुंडवार यांनी अभिनंदन करून या प्रकल्पाचे कौतुक केले.