प्रजासत्ताक दिन विशेष लेख
स्वातंत्र्य प्राप्तीनंतर जगातील कोणतीही आर्थिक ओळख नाही अशा स्थितीत असणारा आपला देश आता जगातली पाचवी अर्थसत्ता बनला आहे आणि याच पार्श्वभूमीवर आपण 26 जानेवारीला 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत या निमित्ताने देशाच्या विकासाची वाटचाल आणि त्याला असलेले संविधानाचे अधिष्ठान अधिक प्रभावीपणे कार्यरत असल्याचे जाणवते.
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यानंतर राज्यघटना अर्थात संविधान लिहिण्याचे काम सुरू झाले. या संविधानास स्वीकार करून आपण संघराज्य हे देखील सार्वभौम प्रजासत्ताक म्हणून घोषित केले तो दिवस अर्थात 26 जानेवारी 1950 होय. प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचे नेमके प्रयोजन देखील हेच आहे. आपण स्वीकार केलेल्या संविधानाच्या स्मरणाचा हा दिवस.
संविधान हा प्रत्येक भारतीय व्यक्तीचे हक्क, कर्तव्य यांचा अमूल्य असा दस्तऐवज आहे आणि याद्वारेच लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांची प्रतिष्ठापना झालेली आहे.
आपले संविधान डोळ्यासमोर येते ते भारतीय लोकांच्या आकांक्षा आणि स्वप्ने यांना आधार देणारे अधिष्ठान म्हणून याचे असलेले महत्त्व अधोरेखित होते.
आपल्या स्वातंत्र्यासाठी मोठा लढा उभारण्यात आला होता आणि यात अनेकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिलेले आहे. या सर्व स्वातंत्र्यसैनिक हुतात्म्यांसह या स्वातंत्र्यलढ्यातील प्रत्येक स्वातंत्र्यसैनिकाचे स्मरण करण्याचा हा दिवस त्यानंतर आधुनिक भारताच्या उभारणीत सीमेवर युद्ध लढून देशाच्या संरक्षणासाठी शहीद झालेला जवानांचेही स्मरण करण्याचा हा दिवस आहे.
संविधानात प्रतिष्ठापित मूल्ये आणि तत्वे यांचे पालन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. ती मान्य करून प्रगत आणि समृद्ध भारताची उभारणी करण्यासाठी वचनबद्ध होण्याचा हा दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिन आहे.
गेल्या 76 वर्षात सर्व क्षेत्रात आपला देश अग्रेसर राहिलेला आहे. मंगळ आणि चंद्रावरच्या मोहिमेत यश मिळवताना दुसरीकडे अन्न धान्य उत्पादनात आलेली आत्मनिर्भरता औद्योगिक क्रांतीतून साधलेली प्रगती हे सारं आपण या दिवशी आठवलं पाहिजे.
जागतिक क्षेत्रात गुंतवणूकदार उत्तम संधीचा देश म्हणून आपल्याकडे बघतात त्यामुळे आपल्या देशावर 150 वर्षे राज्य करणाऱ्या ब्रिटनला मागे टाकून पहिल्या पाच आर्थिक सत्तांमध्ये आपण प्रवेश केला आहे.
दळणवळण क्रांतीत आपण 5 G चा टप्पा ओलांडून 6 G तंत्राच्या उंबरठ्यावर आहोत आणि सोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI मध्येही आपण वाटचाल सुरू केली आहे. आगामी काळ हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा काळ आहे याच जाणिवेतून आपण पावलं उचलायला हवी. चांद्रयान प्रक्षेपण बघण्यासाठी बैलगाडीतून जाणारा हा आपला भारत देश आजही जमिनीवर आहे आणि अवकाशालाही गवसणी घालतोय म्हणून आपला हा देश खऱ्या अर्थाने सारे जहाँ से अच्छा… ठरतो.
जयहिंद.
प्रशांत विजया अनंत दैठणकर
जिल्हा माहिती अधिकारी, बीड