भंडारा दि. २६ : गावठाणातील जमिनीचे स्वामित्व योजनेअंतर्गत ग्रामीण अत्याधुनिक ड्रोनद्वारे सर्वेक्षण करून जनतेला मिळकतीची सनद, आखीव पत्रिका व नकाशा हे डिजीटल स्वरुपातील अधिकार अभिलेख तयार करण्यासाठी स्वामित्व योजनेचे जिल्हयात ९७ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती पालकमंत्री संजय सावकारे यांनी आज जिल्हावासीयांना संबोधित करतांना सांगितले.
पोलीस मैदानात आयोजित मुख्य प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला ध्वजारोहण केल्यानंतर राष्ट्रगीत व राज्यगीत झाले. त्यांनतर पोलीस, गृहरक्षक दल, शालेय विदयार्थी यांच्यासह विविध पथकांनी मानवंदना दिली. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिभकाटे, खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ.संजय कोलते,मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी, पोलीस अधिक्षक नुरूल हसन, उपवनसंरक्षक राहुल गवई, निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे उपस्थित होत्या.
जिल्हयाच्या सर्वागिण विकासासाठी कटीबध्द असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री संजय सावकारे यांनी आज केले. जिल्हयातील विविध विकासकामाच्या प्रगतीचा आढावा आज मांडला. यावेळी गतिमान प्रशासकीय कामकाजासाठी मिशन हंड्रेड डेज म्हणून शंभर दिवसाचा कालबद्ध कार्यक्रम राबविण्याला प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले.
मत्सव्यवसायाला चालना देण्यासाठी मत्स्यजिरे निर्मितीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. 2023-24 च्या हंगामात 2700 लक्ष मत्स्यजिरे निर्मिती झाली, तर 11 सहकारी संस्थांना मत्स्य प्रजननासाठी साहित्य प्रदान करण्यात आल्याचे श्री.सावकारे यांनी सांगितले.
जिल्ह्यात 185 दुध संस्थांमार्फत दूध संकलन करण्यात येत असून नव्याने 15 विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी दूध संकलन सुरू केले असून या उपक्रमामुळे दुग्ध व्यवसायाला चालना मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.
एक रूपयात पीक विमा योजनेतर्गंत जिल्ह्यातील 5207 शेतकऱ्यांनी 3813 हेक्टर क्षेत्रासाठी पिक विमा घेतला आहे.
NABH प्रमाणपत्र मिळण्याकरिता भंडारा जिल्ह्यातील ३ आयुर्वेदिक दवाखान्याचा समावेश करण्यात आला होता. त्यामध्ये येरली, वडद व लाखोरी हे आयुर्वेदिक दवाखाने आहेत. तसेच कायाकल्प कार्यक्रमांतर्गत भंडारा जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा, उपजिल्हा रुग्णालय तुमसर, ग्रामीण रुग्णालय अड्याळ, सिहोरा व लाखांदूर या पाच रुग्णालयांना कायाकल्प पुरस्कार प्राप्त झाल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
बेला ग्रामपंचायतीला देशातील प्रथम क्रमांकाचा कार्बन न्यूट्रल पंचायत पुरस्कार 2024 मिळाला आहे. ही जिल्हयासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुकुंद ठवकर व रोहीणी मोहरील यांनी केले. कार्यक्रमाला सर्व वरिष्ठ अधिकारी, पत्रकार,विविध क्षेत्रातील मान्यवर व विदयार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
आयुध निर्माणीतील मृतकांना मौन श्रध्दांजली
भंडारा जिल्हयातील जवाहरनगर स्थित आयुध निर्माणीतील मृतकांना यावेळी सामुहिक मौन श्रध्दाजंली वाहण्यात आली. या घटनेप्रती पालकमंत्री श्री.सावकारे यांनी संवेदना व्यक्त केल्यात.
00000000
000