बुलढाणा,दि.26 (जिमाका) : बुलढाणा जिल्हा हा भक्ती-शक्तीचा सुरेख संगम आहे. जिल्ह्यातील कृषी, उद्योग, आरोग्य, शिक्षण, पर्यटन, पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रातील विकासातुन जिल्ह्याची परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. या सर्वांगीण विकासाच्या वाटचालीत बुलढाणा जिल्हा आता थांबणार नाही, यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी आज केले.
देशाच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस कवायत मैदानात पालकमंत्री श्री. पाटील यांच्या उपस्थितीत मुख्य शासकीय ध्वजवंदन करण्यात आले. याप्रसंगी संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी आमदार संजय गायकवाड, मनोज कायंदे, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांच्यासह प्रशासनातील अधिकारी, विभाग प्रमुख, स्वातंत्र सेनानी, वीरमाता, वीरपत्नी, ज्येष्ठ नागरिक, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात आता बुलढाणा जिल्ह्याच्याही विकासाला नक्कीच गती मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीच्या पहिल्या शंभर दिवसांचा आराखडा तयार केला असून त्यानुसार राज्य सरकार काम करणार आहे. यात बुलढाण्याचे मोलाचे योगदान राहील.
बुलढाणा हे विदर्भाचे प्रवेशद्वार, भक्ती-शक्तीचा सुरेख संगम, स्वराज्याचे आजोळ आणि आधुनिक संत विचारांचे माहेरघर आहे. शूर सरदार लखोजी जाधवराव यांच्या घरात स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ आई साहेबांचा जन्म सिंदखेडराजा या ऐतिहासिक गावी झाला असून हे मातृतीर्थ आपल्यासाठी प्रेरणास्त्रोत आहे.
आपल्या देशाची कृषि प्रधान देश म्हणून जगभरात ओळख आहे. त्याचप्रमाणे आपला जिल्हाही कृषि प्रधान आहे. शेतकऱ्यांच्या परिश्रमामुळे गेल्या हंगामात जिल्ह्याची सोयाबीनची उत्पादकता देशाच्या सरासरीपेक्षा अधिक राहिली आहे. बदलत्या वातावरणामुळे शेतीवर होणाऱ्या विपरीत परिणामावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करण्याची गरज आहे. ही गरज ओळखून जिल्ह्यात या चालू वर्षात 14 हजार हेक्टर क्षेत्रात संत्रा, मोसंबी, सीताफळ, केळी, पेरू, आंबा या फळपिकांची लागवड करण्यात आली आहे. सेंद्रिय शेतीचे क्षेत्रही वाढत असून ते आता आठ हजार हेक्टरपर्यंत पोहोचले आहे. आगामी काळात भाजीपाला, तेलबिया आणि बियाणे उत्पादन केंद्र विकसित करण्यावर भर दिला जात आहे. तसेच बियाणे उत्पादनात शेतकऱ्यांनी दिलेल्या योगदानामुळे सोयाबीन बियाण्यांच्या उत्पादनात जिल्हा अव्वल राहिला आहे.
यंदाच्या आर्थिक वर्षाच्या खरीप हंगामामध्ये सुमारे सात लाख पस्तीस हजारपेक्षा जास्त तर रब्बी हंगामामध्ये सव्वा तीन लाखांपेक्षा जास्त हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यावर्षी एक लाख बारा हजार हेक्टर क्षेत्रावर निर्मित सिंचन क्षमता निर्माण करण्याचे नियोजन आहे. सूक्ष्म सिंचन योजनेंतर्गत पंचाहत्तर हजार हेक्टरपर्यंत सिंचन क्षेत्रामध्ये वाढ झालेली आहे.
गतवर्षी खरीप हंगामावर अतिवृष्टीमुळे काही तालुक्यातील पिकांवर संकट आले. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात आले. प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत सन 2023-24 मध्ये खरीप व रब्बी हंगामातील 497 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. अवेळी पाऊस अतिवृष्टी पूर, आणि दुष्काळ बाधित नऊ लाख शेतकऱ्यांना आतापर्यंत 815 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मदत व पुनर्वसन विभागामार्फत देण्यात आलेली आहे. या मदतीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी शासन पुरेपूर प्रयत्न करीत आहे.
शासनाने शेतकऱ्यांसाठी शेतमाल तारण योजना व ई-नाम योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सात कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना ई-लिलाव पद्धतीने आपला शेतमाल विक्री करण्याची सुविधा उपलब्ध झाली असून आतापर्यंत सुमारे 30 हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. वर्षाअखेर जवळजवळ पस्तीस लाख क्विंटल शेतमालाची विक्री झाली आहे. यातून सुमारे 1300 कोटी रुपयांहून अधिक रकमेची उलाढाल झाली असून शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाला योग्य भाव मिळण्यास मदत झाली आहे, ही मोठी उपलब्धी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हमीभाव व बाजारभावासाठी नजीकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ई-नाम प्रणालीवर नोंदणी करुन जास्त भाव देणाऱ्या व्यापाऱ्याकडेच शेतमाल विक्री करावी, असे आवाहन पालकमंत्री ना. पाटील यांनी यावेळी केले.
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसायाचा विस्तार हा जिल्ह्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा घटक आहे. यावर्षी एक लाख सत्तेचाळीस हजार लिटर दूध उत्पादन झाले आहे. याबरोबरच मत्स्यबीज उत्पादन वाढविण्यावर देखील भर दिला जात आहे आणि शेतकऱ्यांची औद्योगिक क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात 3 हजार 215 शेतकरी उत्पादक संस्था तर 202 शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झाल्या आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
जिल्ह्यात जिगांव, राहेरा, आलेवाडी हे प्रमुख सिंचन प्रकल्प होत आहेत. जिगांव प्रकल्पातून सव्वा लाख हेक्टर क्षेत्रापैकी माहे जून 2025 पर्यंत दहा हजार हेक्टर, राहेरा लघु सिंचन प्रकल्पातून मार्च 2025 पर्यंत 465 हेक्टर तर आलेवाडी लघु सिंचन प्रकल्पातून जून 2025पर्यंत 750 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. जिगांव, राहेरा, आलेवाडी या तीनही सिंचन प्रकल्पाचा तीनशे गावांना लाभ होणार आहे. जिल्ह्यात एकूण 35 हजार 311 कोटी रुपयांचे सिंचन प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. या सिंचन प्रकल्पातून एक लाख बारा हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वाचा मानला जाणारा 139 दशलक्ष घनमीटर साठवण क्षमतेचा वैनगंगा-नळगंगा नदी जोड प्रकल्प 88 हजार 575 कोटी रुपये खर्चाचा असून, यामध्ये 386 मीटर लांबीच्या कालव्याचे बांधकाम प्रस्तावित आहे. यात नळगंगा, कोलोरी आणि शेलोडी हे तीन प्रकल्प प्रस्तावित केले आहेत. या प्रकल्पामुळे बुलढाण्यातील सुमारे 38 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. हा प्रकल्प जिल्ह्याच्या जलसंधारण आणि कृषी विकासात मोठी भूमिका बजावेल, अशी अपेक्षा पालकमंत्री यांनी व्यक्त केली.
जिल्ह्यातील जिगाव, वैनगंगा-नळगंगा नदी जोड प्रकल्प, सिंदखेडराजा विकास आराखडा, ऐतिहासिक लोणार सरोवर विकास आराखड्यातील कामे, जिल्ह्यातील रस्ते विकास इत्यादी प्रकल्पांना पुढील काळात गती देऊन पूर्ण करण्याचा माझा मानस आहे. याशिवाय शिक्षण, आरोग्य, कृषी क्षेत्रात भरीव कामगिरी करण्यासाठी मोठा वाव असून या क्षेत्रांचा विकास करण्यात कोणत्याही प्रकारचा हात आखडता न घेता प्राधान्य देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख पासष्ठ हजार शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत जिल्ह्यात दोन हजार एकरात 91 उपकेंद्राद्वारे 401 मेगावॅट वीज निर्मितीचे उद्दिष्ट आहे. यापैकी पळशी आणि बोरी येथे दोन सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले असून उर्वरित 67 प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. या प्रकल्पांतून शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठ्याची सुविधा उपलब्ध केली जात आहे.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया आणि मुद्रा योजना या सारख्या योजनांद्वारे जिल्ह्यात नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी अल्प दराने कर्ज सवलत देवून त्यांच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. या योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे. जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राच्या विस्ताराच्या दृष्टीने मोताळा येथे नविन एमआयडीसी प्रस्तावित करण्यात आली असून खामगांव आणि देऊळगांव राजा येथील औद्योगिक क्षेत्राचे विस्तारीकरण प्रस्तावित आहे. याद्वारे स्थानिक युवकांना नोकऱ्या व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न राहणार आहे. समृद्धी महामार्गांतर्गत सिंदखेडराजा तालुक्यातील सावरगाव माळ, निमखेड व गोळेगाव आणि मेहकर तालुक्यात साब्रा-काब्रा या दोन नवीन टाउनशिप प्रस्तावित आहेत. हा प्रकल्प बुलढाणा जिल्ह्याच्या औद्योगिक व आर्थिक विकासाला चालना देईल, असा विश्वास पालकमंत्री यांनी व्यक्त केला.
जिल्ह्यात अकोला-खंडवा हा 23 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग आणि जालना- खामगाव हा 162 किलोमीटर लांबीचा रेल्वे प्रकल्प बांधणीचे काम लवकरच सुरु होणार आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजना या एकत्रित आयुष्मान भारत योजनेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यात सव्वा सात लाखापेक्षा अधिक आयुष्मान कार्ड वितरित करण्यात आले असून 90 हजार रुग्णांनी योजनेचा लाभ घेतला आहे.
तसेच बुलढाणा येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या इमारतीकरिता 403 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून सध्या त्याचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. तसेच जळगाव जामोद येथे नवीन आयुर्वेद महाविद्यालयाकरीता जागा उपलब्ध करुन देण्यात आली असून यास देखील लवकरच अंतिम मान्यता प्राप्त होणार आहे.
बुलढाणा जिल्ह्याच्या पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्राचा विकास जलदगतीने होत आहे. शेगाव विकास आराखड्यातील सर्व कामे पूर्ण झाली आहेत. लोणार सरोवर विकास आराखड्याची अंमलबजावणी सुरु असून सिंदखेडराजा विकास आराखड्यासाठी 233 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तसेच ज्ञानगंगा, अंबाबर्वा अभयारण्य, मियावाकी, इकोटुरीझम, ॲग्री टुरीझमला देखील प्रोत्साहन दिले जात आहे. या उपक्रमातून जिल्ह्यात पर्यटन विकास आणि रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार आहे. यासह जंगल संसाधने आणि वन्य परिसरात राहणाऱ्या ग्रामस्थांचा प्रामुख्याने विचार करुन या भागातील आदिवासी बांधवांना मदत करण्यास आगामी काळात प्राधान्य दिले जाईल.
शहरी व ग्रामीण भागातील वंचित व गरजू लोकांना हक्काचे घर मिळावे यासाठी जिल्ह्यात शबरी आवास, रमाई आवास, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर धनगर आवास, मोदी आवास, प्रधानमंत्री आवास इत्यादी विविध आवास योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात चालू वर्षात एकूण 17 हजार 55 घरकुलांकरीता 267 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत जिल्ह्यातील सुमारे साडेसहा लाख महिलांना दरमहा पंधराशे रुपयांची मदत देण्यात आली आहे. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधताना सामाजिक स्तरही उंचावण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यासाठी वसतिगृह, निवासी शाळा, आश्रमशाळा, स्वाधार योजना, भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना, मुलींच्या विवाहासाठी कन्यादान योजना इत्यादी विविध योजना शासनाकडून राबविण्यात येत आहे. यामुळे समाजातील मागे पडलेल्या वंचित घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात सामिल करून घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
भारतीय संविधान हे जगातील सर्वोत्तम संविधान आहे. या संविधानामुळे राष्ट्र निर्माणासाठी हातभार लागला आहे. प्रत्येक नागरिकाने सकारात्मक विचारातून प्रगतीकडे वाटचाल करण्याचा संकल्प करावा. येत्या काळात आपण सर्व जण चिकाटीने देशाला प्रगतीपथावर नेऊ, असे आवाहन पालकमंत्री मकरंद पाटील यांनी यावेळी केले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या अधिकारी, कर्मचारी व खेळाडूंना पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी ध्वजदिन निधी संकलन 2023 चे बुलढाणा जिल्ह्याचे 104 टक्के उदिष्ट पूर्ण केल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्कॉ. लिडर रुपाली सरोदे यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाचे उत्कृष्ठ महसूल अधिकारी म्हणून अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, तहसिलदार निलेश मडके, नायब तहसिलदार प्रविण घोटकर यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन विभाग, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, निवडणूक विभाग, जिल्हा क्रीडा कार्यालयातील खेळाडू, समाजकल्याण कार्यालय, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे अधिकारी व कर्मचारी यांचा गौरव करण्यात आला. तसेच शेगाव तालुक्यातील 11 गावामध्ये केस गळती प्रकरणी प्रशासनाला केलेल्या सहकार्याबाबत बोंडगावचे माजी सरपंच रामेश्वर थारकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ॲलीमको व जिल्हा प्रशासनामार्फत दिव्यांगाना विनामुल्य व्हिल चेअर, रोलेटर, एलबो क्रंच आणि टायसिकल व बॅटरी मोटर सायकलचे वाटप करण्यात आले. अॅग्रीस्टॅक उपक्रमातंर्गत फार्मर आयडी प्राप्त केलेल्या शेतकऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात पोलीस विभागाने शानदार पथसंचलन केले. त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांव्दारे बॅण्ड ड्रिल, डंबेल्स कवायत, डिश कवायत, ॲरोबिक्स डान्स व कराटे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. यावेळी प्रेक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणाला दाद दिली. कार्यक्रमाचे संचालन चंद्रशेखर जोशी व श्री. मोरे यांनी केले.
00000