- मोफत वीज योजनेतून १९१ कोटींची बील माफी
- युवा कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे ११ कोटीचे विद्यावेतन
- ३ लाख ४२ हजार शेतकऱ्यांना १८९ कोटींचे वाटप
यवतमाळ, दि.26 (जिमाका) : मागील काळात राज्य शासनाने अनेक लोकोपयोगी योजना सुरु केल्या. त्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांचा आत्मसन्मान वाढविणारी योजना ठरली आहे. जिल्ह्यात 6 लाख 91 हजार महिलांना प्रती महिना 1 हजार 500 रुपयांचे अर्थिक सहाय्य दिले जात आहे. बळीराजा मोफत वीज योजनेतून शेतकऱ्यांच्या कृषि पंपांना देखील मोफत विज पुरवठा केला जात असून अवघ्या काही महिन्यात 191 कोटी रुपयांची विज बील माफी देण्यात आली असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
येथील समता मैदानात भारतीय प्रजासत्ताकाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री संजय राठोड यांनी ध्वजवंदन झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, उपवनसंरक्षक धनंजय वायभासे, अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत उंबरकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य संग्राम सैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटनेच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली. हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. देशाच्या इतिहासात स्वातंत्र्य दिन जितका महत्वाचा आहे, तितकेच महत्व प्रजासत्ताक दिनाचे आहे. जगात सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून आपल्या देशाकडे पाहिले जाते. ही आपल्या सर्वांसाठी गौरवाची बाब आहे, असे पुढे बोलतांना पालकमंत्री म्हणाले.
शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन सातत्याने काम करत आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेतून केवळ 1 रुपयात शेतकऱ्यांना पिकाला संरक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात 7 लाख 99 हजार तर रब्बी हंगामात 1 लाख 49 हजार शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग नोंदविला. प्रधानमंत्री किसान योजना आणि याच योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने सुरु केलेली नमो किसान महासन्मान निधी योजना शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या योजना ठरल्या आहे. यावर्षी या दोनही योजनेतून जिल्ह्यातील 2 लाख 85 हजार शेतकऱ्यांना 232 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य वितरीत करण्यात आले आहे.
2023 च्या खरीप हंगामात कापुस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टर पर्यंत प्रति हेक्टरी 5 हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा शासनाने केली होती. त्यानुसार जिल्ह्यातील 3 लाख 42 हजार शेतकऱ्यांना 189 कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहे. यावर्षी नैसर्गिक आपत्तीत शेतपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी आपण 267 कोटी रुपयांची मागणी शासनाकडे केली आहे. ही रक्कम देखील लवकरच प्राप्त होऊन शेतकऱ्यांना वाटप केली जातील.
एकही पात्र शेतकरी पिककर्जापासून वंचित राहू नये, अशा सूचना मी केल्या होत्या. यावर्षी खरीप हंगामात 1 लाख 65 हजार शेतकऱ्यांना 1 हजार 857 कोटीचे पिक कर्ज वाटप आपण केले आहे. युवकांना प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारक्षम करण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ सुरु करण्यात आली. जिल्ह्यात 3 हजार 211 युवक या योजनेतून प्रशिक्षण घेत आहे. या प्रशिक्षणार्थ्यांना आतापर्यंत 11 कोटी 15 लाख रुपयांचे विद्यावेतन वितरीत करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम युवकांचे उद्योग निर्मितीचे स्वप्न साकार करणारी योजना ठरली आहे. गेल्यावर्षी या योजनेतून 628 प्रस्ताव आपण मंजूर केले. यावर्षी 1 हजार 105 नवउद्योजक नव्याने तयार करण्याचे उद्दिष्ट आपण ठेवले आहे. जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, मोदी आवास योजना, जनमन आवास योजनेतून 1 लाख 20 हजार 920 घरकुले आपण बांधतो आहे. त्यापैकी 85 हजारावर घरे बांधून पुर्ण झाली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतून जिल्ह्यातील शहरी भागात देखील 13 हजारावर घरे बांधली जात आहे. त्यापैकी 5 हजारावर घरे पुर्ण झाली आहे.
खनिज विकास निधीतून वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अद्ययावत ऑपरेशन थिएटर आपण तयार केले. विविध आरोग्य विषयक सुविधांसाठी 44 कोटी रुपयांचा निधी महाविद्यालयास दिला. खनिज मधूनच जिल्ह्यातील 15 प्राथमिक आरोग्य केंद्रांना विविध प्रकारच्या सुविधांसाठी 23 कोटी रुपयांचा निधी दिला. जिल्हा परिषदेच्या 63 शाळा मॅाडेल शाळा करत असून त्यासाठी 65 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
महात्मा ज्योतिराव फुले आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतून 1 हजार 356 आजारांवर विनामुल्य उपचार केले जातात. जिल्ह्यात 82 हजार 580 रुग्णांवर या योजनेतून उपचार करण्यात आले. त्यासाठी 371 कोटी शासनाने उपलब्ध करून दिले आहे. ईमारत व इतर बांधकाम कामगारांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनेतून 24 हजार कामगारांना 22 कोटी 33 लाखाच्या लाभाचे वितरण करण्यात आले. 38 हजार कामगारांना सुरक्षा व अत्यावश्यक संच तर 55 हजार कामगारांना गृहउपयोगी वस्तु संचाचे वाटप करण्यात आले. जलजीवन मिशनमधून जिल्ह्यात 4 लाख 8 हजार कुटुंबांना नळ जोडणी देण्यात आली.
केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने ॲग्रीस्टॅक ही संकल्पना राबविली जात आहे. शेतकरी, ग्राहक, विक्रेते आणि सरकार यांना एकत्र आणणारी ही संकल्पना असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याअंतर्गत नोंदणी करणे आवश्यक आहे. मृद व जलसंधारणाच्या व्यापक जनजागृतीसाठी राज्यस्तरीय पाणलोट यात्रा आपण काढतो आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते आपल्या जिल्ह्यातून या यात्रेचा शुभारंभ होणार आहे. केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चव्हाण, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यावेळी उपस्थित राहणार आहे.
याच दिवशी गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेंतर्गत गाळ काढण्याच्या मोहिमेचा शुभारंभ देखील आपण करतो आहे. या मोहिमेसाठी नाम, पाणी फाऊंडेशन, भारतीय जैन संघटना, आर्ट ऑफ लिव्हींग अशा नामवंत संस्थांचा सहभाग आपल्याला लाभत आहे. राज्यातील सर्व टॅंकरग्रस्त गावांना टॅंकरमुक्त करण्याची मोहिम देखील आपण हाती घेतो आहे. या मोहिमेचा शुभारंभ देखील लवकरच होणार आहे, असे पालकमंत्री श्री.राठोड यांनी सांगितले.
ध्वजवंदनानंतर पोलिस व विविध विभाग तसेच शालेय विद्यार्थ्यांचे पथसंचलन झाले. विविध पुरस्कारांचे वितरण देखील पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यानी सांस्कृतिक व क्रीडा विषयक कार्यक्रम सादर केले. तंबाखुमुक्तीची सामुहिक शपथ घेण्यात आली. कार्यक्रमाचे संचलन चंद्रबोधी घायवटे व शुभांगी वानखेडे यांनी केले. कार्यक्रमास विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000