लातूर जिल्ह्याच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घ्या – पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक

  • जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याला प्राधान्य देणार
  • चुकीच्या गोष्टींना पाठीशी घालणार नाही; चांगल्या कामाला सहकार्य

लातूर, दि. २६ : जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी हितावह असणारे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी प्रयत्न करावेत. जिल्ह्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रशासनाने अधिक गतीने आणि समन्वयाने काम करावे, अशा सूचना पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिल्या.

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी संगीता टकले, संदीप कुलकर्णी, अहिल्या गाठाळ, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता डॉ. सलीम शेख यांच्यासह विविध शासकीय विभागांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून अधिकाधिक निधी मिळविण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे सांगून पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांना लाभदायक ठरणारी विकास कामे करण्यावर सर्व विभागांनी भर द्यावा. यासाठी लोकप्रतिनिधींना विश्वात घेवून काम करावे. जिल्ह्याच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या चांगल्या उपक्रमाला आपला पाठींबा राहील. मात्र, कोणत्याही चुकीच्या गोष्टींना पाठीशी घातले जाणार नाही. तसेच जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पालकमंत्री म्हणून सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

लातूर ते टेंभूर्णी महामार्गाचे रुंदीकरण, जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याला आपले प्राधान्य राहणार आहे. तसेच विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाला नवीन एमआरआय मशीन घेण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. यासोबतच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी सीएसआर फंडातून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री ना. भोसले म्हणाले. लातूर जिल्ह्याने शिक्षण क्षेत्रातील वेगळा पॅटर्न तयार केला आहे, याप्रमाणेच जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विकासाचा नवा पॅटर्न निर्माण करावा. आपल्या कार्यकाळात जिल्ह्याच्या विकासात भरीव योगदान देण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत, असे पालकमंत्री यावेळी म्हणाले.

 बर्ड फ्ल्यूचा प्रसार रोखण्यासाठी सतर्क राहून काम करा

उदगीर शहरातील कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूमुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र, त्यानंतर पाठविलेले उदगीर आणि अहमदपूर तालुक्यातील कुक्कुट पक्ष्यांचे वैद्यकीय अहवाल नकारात्मक आल्याने कुक्कुट पक्ष्यांना बर्ड फ्ल्यूची बाधा झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आपल्या जिल्ह्यातील कुक्कुट पक्ष्यांना सध्या बर्ड फ्ल्यूची लागण झालेली नाही. मात्र, बाजूच्या जिल्ह्यांमधून बर्ड फ्ल्यूचा प्रसार होवू नये, यासाठी पशुसंवर्धन विभागाने सतर्क राहून काम करावे. विविध पथके प्रत्यक्ष फिल्डवर पाठवून सातत्याने परिस्थितीचा आढावा घ्यावा. प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्या. तसेच नागरिकांनी घाबरून जावू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी यावेळी जिल्ह्यातील विविध विकास कामांची पीपीटीद्वारे माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या शंभर दिवसांच्या सात कलमी कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील जास्तीत जास्त पांदन रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यादृष्टीने तहसीलदार यांनी कार्यवाही सुरु केली आहे. जिल्ह्यातील विविध क्षेत्रांचा अभ्यास करून जिल्हा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार दरवर्षी करावयाच्या कामांचे नियोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. कृषी, आरोग्य, उद्योग, प्राथमिक शिक्षण, कौशल्य विकास, जिल्हा परिषद, पोलीस प्रशासन यासह विविध विभागांचा पालकमंत्र्यांनी यावेळी आढावा घेतला.

लातूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तयार करण्यात आलेल्या हिरकणी कक्षाला पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भेट देवून तेथील सुविधांची पाहणी केली.

 शासकीय जमिनींची माहिती आता एका क्लिकवर

लातूर जिल्ह्यातील सर्व शासकीय व गायरान जमिनींची माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने तयार केलेल्या संगणक प्रणालीचे उद्घाटन पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते रिमोटद्वारे करण्यात आले. या उपक्रमामुळे विविध विकास कामांसाठी जिल्ह्यातील शासकीय जमिनींची माहिती तत्काळ उपलब्ध होणार आहे.

0000