पुणे, दि. २७ : इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाच्या स्थलांतरीत कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार उमा खापरे, आमदार बापूसाहेब पठारे, विभागाचे संचालक ज्ञानेश्वर खिलारी, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, महाज्योतीचे महासंचालक राजेश खवले, उपसचिव कैलास साळुंखे, सहसंचालक संतोष हराळे, प्रशांत शिर्के आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. सावे म्हणाले, कामाचे ठिकाण प्रशस्त असल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कामाचा उत्साह वाढेल. कार्यालयास पुरेशी जागा उपलब्ध करुन देण्यात आली असून विभागाने अधिक कार्यक्षमपणे व पारदर्शकपणे काम करावे. पेपरलेस कामकाजाला प्राधान्य द्यावे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या योजना तालुकास्तरापर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. श्री. सावे यांनी कार्यालयातील दालनांची यावेळी पाहणी केली.
यावेळी पुणे, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, नाशिक व लातूर प्रादेशिक उपसंचालक, सहसंचालक, सहायक संचालक तसेच कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.