वसतिगृह, आश्रमशाळांची वारंवार भेटी देऊन तपासणी करावी – मंत्री अतुल सावे

इतर मागास बहुजन कल्याण विभागाचा मंत्री अतुल सावे यांनी घेतला आढावा

पुणे, दि. २७ : इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या घटकांसाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत विविध ५४ कल्याणकारी योजना राबविण्यात येत असून वसतिगृह व आश्रमशाळा योजनेंतर्गत विद्यार्थ्यांची उपस्थिती तसेच विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची वारंवार भेटी देऊन तपासणी करावी, अशा सूचना मंत्री अतुल सावे यांनी दिल्या.

इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाच्या स्थलांतरित कार्यालयाच्या उद्घाटनानंतर आयोजित विभागाच्या राज्यस्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागाचे संचालक ज्ञानेश्वर खिलारी, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, महाज्योतीचे महासंचालक राजेश खवले, उपसचिव कैलास साळुंखे, सहसंचालक संतोष हराळे, प्रशांत शिर्के आदी उपस्थित होते.

मंत्री श्री सावे म्हणाले, राज्यात सन २०१७ मध्ये सामाजिक न्याय विभागातून नव्याने इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्थापना झाली. मागील अडीच वर्षात इतर मागास बहूजन समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. १०० विद्यार्थी क्षमतेचे मुला-मुलींसाठी ५६ वसतीगृह २६ जिल्ह्यात सुरु करण्यात आली आहेत. वसतिगृहात प्रवेश देताना जातप्रमाणपत्र पडताळणी करुनच प्रवेश देण्यात यावा. बोगस प्रमाणपत्र प्रकरणी गुन्हा दाखल करावा असे सांगून ते म्हणाले या विभागांतर्गत योजना राबविण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. परंतु शासनाच्या निधीचा योग्य विनियोग होईल याची सर्व अधिकाऱ्यांनी गंभीरपणे दखल घ्यावी. व विद्यार्थ्यांच्या तक्रारी येणार नाहीत यासाठी सर्व सोई उपलब्ध असल्याची वसतीगृह व आश्रमशाळांना भेटी देऊन खात्री करावी.

ते म्हणाले, ज्या जिल्ह्यात अद्याप वसतिगृहासाठी भाडेतत्त्वावर घेण्यासाठी जागा निश्चित करण्यात आलेल्या नाहीत त्या जिल्ह्यांनी तातडीने जागा निश्चित करुन प्रस्ताव सादर करावेत, विद्यार्थ्यांना भोजन भत्ता तसेच साहित्य पुरवठा प्राधान्याने करावा, वसतीगृह अनुदानाबाबत पाठपुरावा करावा असे त्यांनी सांगितले.

यावेळी मंत्री सावे यांनी मॅट्रिकोत्तर योजना, मॅट्रिकपूर्व योजना, परदेश शिष्यवृत्ती योजना, स्वयंम व आधार योजना, धनगर समाजातील विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी निवासी शाळेत प्रवेश, वसतिगृह योजना, आश्रमशाळा योजना, कै. वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना, कै. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, घरकुल योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना, निपुण भारत योजनेंतर्गत विभाग व जिल्हा निहाय नोंदणी तसेच विभागातील रिक्त पदांचा आढावा घेतला.

प्रास्ताविकात श्री. खिलारी यांनी विविध योजना व त्याअंतर्गत खर्चाची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. तसेच इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाच्या वतीने संचालनालय स्तरावर आश्रमशाळा संहितेमध्ये सुधारणा करण्याचे कामकाज अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले.

बैठकीला पुणे, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, नाशिक व लातूर प्रादेशिक उपसंचालक तसेच सहायक संचालक उपस्थित होते.
0000