कलाकारांवरील अन्याय दूर करण्यासाठी विशेष न्यायाधिकरण स्थापण्याबाबत सकारात्मक – कामगार मंत्री आकाश फुंडकर 

मुंबई, दि. 28 : चित्रपट उद्योगामध्ये काम करणारे कलाकार, सह-कलाकार, नायक, सह-नायक यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी विशेष न्यायाधिकरण स्थापण्यासंदर्भात विधी व न्याय विभागाकडे विचारणा करण्याचे निर्देश कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिले.

चित्रपट क्षेत्रात लहान भूमिका करणाऱ्या कलाकारांवर होत असलेल्या अन्यायाबद्दल सिने टी. व्ही. असोशिएशनचे पदाधिकारी मनोज जोशी, जॉनी लिव्हर, बिंदू दारासिंग, संजय पांडे, उपासना सिंग यांनी मंत्रालयात कामगार मंत्री श्री.फुंडकर यांची भेट घेतली. यावेळी कामगार विभागाचे उपसचिव स्वप्नील कापडणीस, उपसचिव दिपक पोकळे उपस्थित होते.

कामगार मंत्री श्री.फुंडकर म्हणाले की, लहान भूमिका करणाऱ्या कलाकारांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन केला जाणार नाही. कलाकारांवर कंत्राटदार किंवा निर्मात्यांकडून अन्याय झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधितावर कठोर कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर या कलाकारांना वेळेत वेतन मिळावे, यासाठी नियमावली तयार करण्यात येणार असून तो लवकरच केंद्रीय कामगार मंत्रालयाकडे पाठविण्यात येईल, असेही कामगार मंत्री श्री.फुंडकर यांनी सांगितले.

000

संजय ओरके/विसंअ/