लातूर, दि. ३० : जिल्हा वार्षिक योजनेसोबतच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमधून जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त निधी मिळविण्याचा प्रयत्न राहणार असून यामाध्यमातून जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यात येईल. जिल्ह्यात प्रगतीपथावर असलेली, तसेच नव्याने सुरु होणारी विकासकामे गुणवत्तापूर्ण होतील, याची संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी. जिल्हा वार्षिक योजनेतील कामे विहित कालावधीत पूर्ण होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज येथे दिल्या. तसेच जिल्हावासियांसाठी अतिशय महत्वाचे असलेल्या जिल्हा रुग्णालयाच्या जमिनीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून लवकरच निधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री ना. भोसले बोलत होते. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार संभाजी पाटील निलंगेकर,आमदार संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, पालक सचिव मनीषा म्हैसकर, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. तसेच सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार विक्रम काळे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे या बैठकीमध्ये सहभागी झाले होते.
प्रारंभी जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी प्रास्ताविकामध्ये सन २०२४-२५ मध्ये जिल्हा वार्षिक योजनेतून झालेल्या खर्चाची व सन २०२५-२६ मध्ये प्रस्तावित कामांची माहिती दिली. तसेच जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी यांनी जिल्हा नियोजन समिती विविध योजनानिहाय खर्चाची, तसेच प्रस्तावित निधी, पुनर्विनियोजन प्रस्ताव याबाबत माहितीचे सादरीकरण केले.
कृषिपंपासाठी सुरळीत वीज पुरवठा हा अतिशय महत्वाचा विषय आहे. ग्रामीण भागातील विद्युत रोहित्र विषयक तक्रारीं सोडविण्याला प्राधान्य द्यावे. विद्युत भार वाढल्यामुळे नादुरुस्त होणाऱ्या विद्युत रोहीत्रांची यादी तयार करून त्यांची क्षमता वाढविणे, वीज वितरणचे सुरळीत होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री ना. भोसले यांनी दिल्या. एखादे रोहित्र नादुरस्त झाल्यानंतर त्याठिकाणी पर्यायी रोहित्र तातडीने उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी औसा तालुक्यात सुरु करण्यात आलेला ‘पॉवर ऑन व्हील’ हा उपक्रम जिल्ह्यात सर्वत्र राबवावा, असे त्यांनी सांगितले.
जिल्हा वार्षिक योजनेतून प्रस्तावित कामे विहित कालावधीत पूर्ण करावीत. उपलब्ध करून दिलेल्या निधीतून अधिकाधिक गुणवत्तापूर्ण आणि लोकोपयोगी कामे करून आपल्या जिल्ह्याच्या विकासाला गती द्यावी. या कामांमध्ये कोणताही गैरप्रकार किंवा हयगय होणार नाही, याची दक्षता संबंधित विभाग प्रमुखांनी घ्यावी, असे पालकमंत्री ना. भोसले म्हणाले.
यावेळी सर्व लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यातील सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी व्यवस्था, रस्ते विकास, आरोग्य व्यवस्था, जलजीवन मिशन, सिंचन प्रकल्प व तलाव, बंधारे यांची दुरुस्ती, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, प्रधानमंत्री पीक विमा योजना, जिल्हा रुग्णालय आदी विषय मांडले.
‘गाव तिथे स्मशानभूमी’साठी निधी देणार
प्रत्येक गावामध्ये स्मशानभूमी असावी, याकरिता ‘गाव तिथे स्मशानभूमी’ मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात स्मशानभूमीसाठी जमीन उपलब्ध असलेल्या गावांची यादी तयार करून स्मशानभूमी बांधकामाचा प्रस्ताव सादर करावा. या कामांना जिल्हा नियोजन समितीमधून निधी देण्यात येईल. यासोबत ज्या गावांमध्ये जमीन उपलब्ध नाही, अशा गावांमध्ये भूसंपादनासह स्मशानभूमी बांधकामासाठी दुसऱ्या टप्प्यात निधी दिला जाईल. जिल्हा परिषद बांधकाम विभागाने बांधकामाचा आराखडा आणि प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री ना. भोसले यांनी दिल्या.
विविध विषयांवर मंत्रालय स्तरावर बैठकीचे आयोजन करणार
लातूर जिल्ह्यातील लातूर ते टेंभूर्णी महामार्ग रुंदीकरण आणि पानगाव ते लातूर रस्त्याच्या कामाचा प्रश्न, जलजीवन मिशनची अपूर्ण काम लवकरात लवकर पूर्ण करणे, तसेच जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प, तलाव यांच्या दुरुस्तीच्या कामांबाबत लवकरच मंत्रालय स्तरावर बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री म्हणाले. जिल्हा रुग्णालयाच्या जमिनीसाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देण्याबाबत नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीवेळी चर्चा झाली. त्यानुसार संबंधित विभागाला सूचना देण्यात आल्या असून लवकरच यासाठी निधी उपलब्ध होणार आहे, असे त्यांनी सांगतिले.
सर्वांना सोबत घेवून जिल्ह्याचा समतोल विकास करणार
लातूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करताना आठवणीत राहतील, अशी विकास कामे करून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याचा आपला प्रयत्न आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधी, प्रशासन यांना सोबत घेवून जिल्ह्याचा समतोल विकास करण्याला प्राधान्य दिले जाईल. जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी, त्यांना अपेक्षित विकास अधिक गतीने व्हावा, यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
भारतीय संविधानाची प्रत देवून उपस्थितांचे स्वागत; मुलींच्या नावाची नेमप्लेट भेट
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्य शासनामार्फत घर घर संविधान उपक्रम राबविण्यात येत आहे. यानिमित्त जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह सर्व उपस्थितांचे भारतीय संविधानाची प्रत देवून स्वागत करण्यात आले. तसेच जिल्हा प्रशासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या ‘माझी मुलगी, माझा अभिमान’ उपक्रमांतर्गत सर्व मान्यवरांना घरावर लावण्यासाठी मुलींचे नाव असलेली नेमप्लेट भेट देण्यात आली.
सन २०२५-२६ करिता ४९० कोटी २९ लाख रुपयांचा प्रारूप आराखडा; जास्तीत जास्त निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करणार
लातूर जिल्ह्यासाठी सन २०२५-२६ करिता जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत ३६१ कोटी २६ लाख रुपये, जिल्हा वार्षिक योजना (अनुसूचित जाती घटक कार्यक्रम) अंतर्गत १२५ कोटी रुपये आणि जिल्हा वार्षिक योजना (आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना) अंतर्गत ४ कोटी ३ लाख रुपये अशा एकूण ४९० कोटी २९ लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्याला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यामध्ये जिल्हा विकास आराखड्यासाठी २५ टक्के निधी प्रस्तावित केला असून याअंतर्गत जिल्ह्यात कृषी व संलग्न सेवा, उद्योग आणि सेवा क्षेत्रातील विविध कामांवर भर देण्यात येणार आहे. सन २०२५-२६ करिता अंमलबजावणी यंत्रणांनी ६८२ कोटी ६८ लाख रुपयांची अतिरिक्त मागणी नोंदविली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विकासकामांना गती देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीला जास्तीत जास्त प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री ना. भोसले यांनी यावेळी सांगितले.