रायगड जिमाका दि.31- शालेय विद्यार्थ्यांना जागरूक, आदर्श आणि सक्षम नागरिक बनण्याच्या दृष्टीने माझी शाळा- सुरक्षित शाळा अंतर्गत राबविण्यात आलेला स्टुडंट ऑफ रोड सेफ्टी हा उपक्रम अत्यंत स्तुत्य व उपयुक्त आहे. हा उपक्रम गृह विभाग आणि शालेय शिक्षण विभाग यांच्या मार्फत राज्यातील सर्व शाळांमध्ये संयुक्तरित्या राबविण्यासाठी शासनस्तरावरून विशेष प्रयत्न करण्यात येतील असे प्रतिपादन महिला व बालविकासमंत्री कु आदिती तटकरे यांनी केले.
रस्ता सुरक्षा सप्ताह २०२५ अंतर्गत रायगड जिल्हा पोलीस यांच्या वतीने “माझी शाळा सुरक्षित शाळा” अंतर्गत सुरक्षित शाळा व “स्टुडंट ऑफ रोड सेफ्टी” पारितोषिक वितरण समारंभ सोहळा २०२५ चे आयोजन बालगंधर्व रंगभवन, रिलायन्स टाऊनशिप, नागोठणे येथे करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते आदींसह विविध शाळेचे विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
1 जानेवारी पासून रायगड पोलीस दलाकडून सुरक्षाविषयक वेगवेगळ्या प्रकारचे अतिशय स्तुत्य उपक्रम यशस्वीपणे राबविले जात आहेत. त्याबद्दल पोलीस दलाचे विशेष अभिनंदन करून कु तटकरे म्हणाल्या माझी शाळा , सुरक्षित शाळा या उपक्रमाअंतर्गत सुरक्षेविषयक जनजागृती व प्रबोधन कार्यक्रमात शालेय विद्यार्थी व विद्यार्थीनींना समाविष्ट करून घेण्यात आले ही अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. शालेय अभ्यासक्रमा बरोबरच विद्यार्थ्यांना सुरक्षेचे धडे दिले जात आहेत. यामुळे हे विद्यार्थी याबाबत दक्ष व जागरूक राहतील. या अभियानात 500 शाळांचे सर्वेक्षण करून त्यापैकी 28 शाळांची निवड करून त्यांना सुरक्षेच्या साठी सन्मानित करण्यात आले आहे. एकूणच शाळांच्या दृष्टीने ही बाब महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येक पालकांच्या शालेय व्यवस्थापनाकडून माझा पाल्य सुरक्षित असला पाहिजे ही अपेक्षा असते. या उपक्रमामुळे शाळांचे सुरक्षा मूल्यांकन वाढले आहे . जिल्ह्यातील सर्व शाळांनी सुरक्षेच्या बाबतीत आवश्यक ते नियम पाळून गुणांकन मिळवून आपली शाळा सुरक्षितअसल्याचे सिद्ध करावे असे आवाहन कु. तटकरे यांनी यावेळी केले.
रायगड पोलीस दलाच्यावतीने राबविण्यात आलेला हा उपक्रम राज्यस्तरीय करण्यासाठी देखील प्रयत्न करण्यात येतील असेही कु. तटकरे यांनी सांगितले.पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या उपक्रमाबद्दल रायगड पोलीस दलाचे अभिनंदन केले.
यावेळी मंत्री कु आदिती तटकरे यांच्या हस्ते सुरक्षा गुणांकन प्राप्त 28 शाळेतील विद्यार्थी, शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले. रस्ता सुरक्षा अभियानातर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली.
या कार्यक्रमाला विविध शाळांचे विद्यार्थी, शिक्षक आणि पालक उपस्थित होते.