जालना जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठक संपन्न
जालना, दि. 1 (जिमाका) :- मराठवाड्याच्या शहरासह ग्रामीण भागातून उत्तम खेळाडू घडून त्यांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर राज्याचे आणि देशाचे प्रतिनिधीत्व करावे अशी माझी इच्छा आहे. तरी जिल्हा क्रीडा संकुलात उभारणी करण्यात येणारा स्विमींग पुल आकर्षक रचनेसह ऑलिम्पिक स्पर्धेतील दर्जाचा स्विमींग पुल तयार करण्यात यावा, असे निर्देश पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.
जालना जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. याप्रसंगी त्या बोलत होत्या. या बैठकीस आमदार बबनराव लोणीकर, आमदार अर्जून खोतकर, आमदार संतोष दानवे, आमदार हिकमत उढाण, क्रीडा उपसंचालक युवराज नाईक, महापालिका आयुक्त संतोष खांडेकर, शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता स्मिता पवार, यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, जिल्ह्यात क्रीडा संस्कृती वाढत आहे. विविध खेळामध्ये उदयोनमुख खेळाडू सराव करत आहेत. तसेच लगतच्या जिल्ह्यातील जलतरण स्पर्धेतील खेळाडूंना येथे संधी मिळेल असे पहावे. स्विमींग पुलाचे काम करत असतांना बालेवाडी येथील कॉमनवेल्थ स्पर्धेत वापरण्यात आलेल्या स्विमींगपुलचे प्रथमत: अवलोकन करावे. स्नानगृहाचा परिसर स्वच्छतेसह कोरडा राहील याप्रकारे उभारणी करावी. तसेच क्रीडा संकुलाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात येवून स्विमींग पुलासह इतर ठिकाणी वापरात येणाऱ्या पाण्याचा अपव्यय टाळावा. जिल्हा क्रीडा संकुलातील टप्पा-1 चे काम संपुर्ण करुन वापरात आल्यानंतर टप्पा -2 मधील 400 मीटर सिथेंटीक ट्रॅक, नॅचरल ग्रास फुटबॉल मैदान, धावपट्टी तसेच मल्टीपर्पज सभागृहाचे कामकाज हाती घेण्यात यावे. असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी क्रीडा संकुलात करण्यात येणाऱ्या कामकाजाची सादरीकरणाद्वारे माहिती दिली.