राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनीचा समारोप
अमरावती, दि. १ : बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनीच्या माध्यमातून संशोधन आणि प्रगतशीलता दिसून येते. या बालवैज्ञानिकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रदर्शनीमधील सर्वोत्कृष्ट उपक्रमांना देण्यात येणारी रक्कम वाढविण्यात येणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिली.
शिवाजी शिक्षण संस्थेच्या प्रांगणात आयोजित राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनीचा समारोप आज करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मिलिंद कुबडे, राज्य विज्ञान परिषदेच्या संचालक डॉ. हर्षलता बुरांडे, राज्य विज्ञान संस्थेचे प्रा. प्रवीण राठोड, शिक्षण उपसंचालक निलिमा टाके, शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख, जयश्री राऊत, संस्थेचे उपाध्यक्ष जयंत पाटील पुसदेकर, दिलीप इंगोले, प्राचार्य डॉ. गजानन कोरपे आदी उपस्थित होते.
राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले, विद्यार्थ्यांना संशोधनाकडे वळवण्यासाठी विज्ञान प्रदर्शनी हे महत्त्वपूर्ण व्यासपीठ आहे. या ठिकाणावरून असंख्य वैज्ञानिक दृष्टिकोन असलेली व्यक्तिमत्व घडली आहे. हे परिषदेचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यामुळे या प्रदर्शनीला विशेष महत्त्व आहे. राज्य वैज्ञानिक दृष्टिकोनासाठी अग्रस्थानी आहे. संशोधन आणि प्रगतिशीलतेतून नवे शोध समोर येतील. हे नवे शोध समस्या निराकरणासाठी उपयोगी पडतील. तसेच यातून महत्त्वाचे तंत्रज्ञान पुढे येईल.
आपला देश तरुणांचा देश आहे. या प्रदर्शनीमधील नवीन संकल्पना बौद्धिकतेला चालना देतील. यातून विकसित असे उपक्रम राबविण्यात येतील. यासाठी समाजातील प्रत्येक वर्गाला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. भविष्यातील वैज्ञानिक घडविण्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी पंकज नागपुरे यांचा सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. कोरपे यांनी प्रास्ताविक केले. प्रवीण राठोड यांनी अहवाल वाचन केले. सहभागी विद्यार्थ्यांमधून प्रसाद जाधव, युवराज कृष्णकुबेर आणि मनीषा गुप्ता यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी सूनयंशी घोंगडे यांना चॅम्पीयन ट्रॉफी देवून गौरविण्यात आले. तसेच रेहान दारव्हणकर, जोसेफ, संस्कार देशमुख, पुष्पा वाकचौरे, पुनम कावर, गायत्री धुरी, संतोष देशमाने, गणेश बदकल यांनी प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल गौरविण्यात आले.
पोलीस कुटुंबीयांच्या समस्यांची दखल घेऊन मार्गी लावू – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
गृहराज्यमंत्र्यांचा पोलीस कुटुंबीयांशी संवाद
अमरावती, दि. १ : पोलीस कुटुंबीयांशी संवाद कार्यक्रमात मांडण्यात आलेल्या समस्या लेखी स्वरुपात घेऊन त्या मार्गी लावण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन गृह ग्रामीण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले.
पोलीस मुख्यालयात आज डॉ. भोयर यांनी पोलीस कुटुंबीयांशी संवाद साधला. यावेळी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सागर पाटील, कल्पना बारवरकर आदी उपस्थित होते.
राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी, पोलीस कुटुंबीयांच्या समस्या जाणून घेण्यासाठी हा संवाद कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. यामध्ये पोलिसांनी त्यांचे कुटुंबीय यांना होत असलेल्या समस्यांबाबत माहिती घेण्यात येत आहे. संवादामधून अनेक नवीन मुद्दे समोर येत आहेत. प्रामुख्याने पोलिसांच्या निवासस्थानाची समस्या समोर येत आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये शासनाच्या प्रयत्नाने मोठ्या प्रमाणात निवासस्थानी बांधण्यात येत आहेत. याबाबत राज्यस्तरावर समिती सहकार्य करीत आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी स्वातंत्र्यपूर्व काळातील पोलीस ठाणे आणि निवास व्यवस्था आहे. या ठिकाणी आवश्यक ती तरतूद करून समस्या मार्गी लागण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
पोलीस कुटुंबीय कायम दुसऱ्याच्या संरक्षणासाठी तयार असतात. मात्र पोलीस कर्तव्यावर असताना त्यांचे कुटुंब सुरक्षित राहील, यासाठीही प्रयत्न करण्यात येतील. आज संवादामध्ये मांडलेल्या विविध मुद्द्यांवर दखल घेण्यात येईल. या सर्व समस्या पोलीस प्रशासनाकडून लेखी स्वरुपात मागविण्यात येऊन त्या लवकरात लवकर निकाली काढण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल.
पोलीस आयुक्त श्री. रेड्डी यांनी निवासस्थानाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी नवीन बांधकामे हाती घेण्यात आली आहे. तसेच पोलीस कुटुंबीयांशी सातत्याने संवाद साधण्यात येत असल्यामुळे अनेक समस्या निकाली निघत असल्याचे सांगितले. श्रीमती बारवरकर यांनी प्रास्ताविक केले. विशाल आनंद यांनी आभार मानले.
00000
परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
अमरावती, दि. 1 : सर्वसामान्य नागरिकांना घर विकत घेताना म्हाडा सर्वात चांगला पर्याय असतो. त्यामुळे नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ते नियोजन करावे, असे निर्देश गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज म्हाडाच्या अमरावती विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी म्हाडाचे मुख्य अधिकारी श्री. देशमुख, श्री. सोनवणे आदी उपस्थित होते.
राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले, म्हाडाने आतापर्यंत 18 हजार घरे दिली आहेत. प्रत्येकाला हक्काचे घर मिळवून देण्याचे प्रधानमंत्री यांनी उद्देश ठेवला आहे. यासाठी राज्य शासन ही पुढाकार घेत आहे. त्यामुळे म्हाडाने गतीने नियोजन करावे. तसेच प्रत्येक प्रकल्पाचा पाठपुरावा करून पूर्णत्वास न्यावा. अमरावती विभागात म्हाडाची घरे बांधण्यासाठी पुरेसा वाव आहे. त्यामुळे सक्षम नियोजन करून, तसेच आवश्यकता भासल्यास खाजगी भागीदारीतून प्रकल्प पूर्णत्वास न्यावेत. विकासकांना माहिती व्हावी यासाठी त्यांची बैठक घेण्यात यावी. त्यांना सुरू असलेल्या प्रकल्पाबाबत माहिती देण्यात यावी. जनजागृतीसाठी मिळावे घेण्यात यावे.
कर्मचारी संघटनांना माहिती दिल्यास त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल. तसेच लाभार्थी ही वाढतील. घरांची संख्या वाढवण्यासाठी एमआयडीसीची जागा उपलब्ध होत असल्यास ती घेण्यात यावी. यामुळे नागरिकांना स्वस्तात घरे मिळू शकतील. नागरिकांना परवडणारी घरे मिळावी, यासाठी दरवर्षी किमान तीन हजार घरांची नियोजन करावे. यासाठी जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
00000