अमरावती, दि. 1 : महसूल प्रशासन हा राज्य शासनाचा चेहरा आहे. विविध विकासकामे राबविण्यासोबतच नागरिकांना दैनंदिन जीवनात आवश्यक असणारी कामे महसूल विभागाकडून केली जातात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन सुखकर होईल, असे पारदर्शक प्रशासन राबवावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवार, दि. 31 जानेवारी रोजी विभागीय आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी सौरभ कटियार, डॉ. किरण पाटील, पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, महसूल प्रशासनामधील नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील कामे तातडीने व्हावी यासाठी शासनाने गतिमान व्हावे. नागरिकांना चांगल्या सोयी मिळाव्या यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे आवश्यक आहे. यासाठी तालुका, जिल्हास्तरावर लक्ष केंद्रित होणे गरजेचे आहे. यापुढे महसूल प्रशासनातील सर्व कामे ही गुणवत्तेनुसार होणार आहे. कामे करताना येणाऱ्या अडचणी आणि प्रश्न मांडावेत. याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.
महसूल विभागातही कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करण्यात येणार आहे. त्यामुळे इतर राज्यातील चांगल्या उपक्रमांची माहिती घेऊन आपल्या राज्यातही राबविण्यात यावेत. दैनंदिन कामकाजात कल्पकवृत्तीचा उपयोग केला असल्यास त्याची निश्चित प्रशंसा केली जाईल आणि त्यास सुधारणेस सहकार्य केले जाईल. राज्य शासनाने वाळू धोरण जाहीर केले आहे. यात महसूल प्रशासनातील सर्वांनी अभिप्राय नोंदवावा, असे निर्देश त्यांनी दिले.
प्रशासकीय यंत्रणा ही पूर्णपणे ग्रामपातळीवर कार्यरत असते. त्यामुळे अधिकाऱ्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन महसुली कायद्यात आवश्यक सुधारणा करण्यात येईल. यासाठी सर्वांनी सुधारणा प्रस्तावित कराव्यात. महसूल प्रशासनाकडे असलेले गौण खनिज वसुली, अर्ध न्यायिक प्रकरण, महा राजस्व अभियानात येणारे उपक्रम, प्रलंबित केसेस यामध्ये तीन महिन्यात लक्षणीय सुधारणा करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
00000