अमरावती, दि. 3 : सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26 चा प्रारूप आराखडा अंतिम करण्यासाठी उमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक पार पडली.
याबैठकीस उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी जिल्हानिहाय सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेचा संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांचा दुरदृष्यप्रणालीद्वारे आढावा घेतला तसेच जिल्ह्यातील विविध विकास योजनावरही याबैठकीत चर्चा करण्यात आली.
यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच जिल्ह्याच्या पालकसचिव श्रीमती आय ए कुंदन या दुरदृष्यप्रणालीद्वारे तर अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातून आमदार सुलभा खोडके, आमदार उमेश ऊर्फ चंदू यावलकर, आमदार प्रविण तायडे, आमदार गजानन लेवटे, आमदार केवलराम काळे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, मनापा आयुक्त सचिन कलंत्रे, उपायुक्त नियोजन कावेरी नाखले, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजीत म्हस्के आदी उपस्थित होते.
यावेळी पुढील वर्षीच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या अर्थसंकल्पावर बैठकीत चर्चा झाली. जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारणसाठी 417.78 कोटी रुपये, अनुसूचित जाती घटक कार्यक्रमासाठी 102 कोटी रुपये, तर आदिवासी उपयोजना घटक कार्यक्रमासाठी 117.38 कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. सर्व कामे वेळेत आणि उच्च दर्जाची पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासकीय यंत्रणांना देण्यात आले. सुरु कामे विहित वेळेत पूर्ण करण्याबाबतही यावेळी सूचना देण्यात आल्या.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी जिल्ह्यातील नाविण्यपूर्ण उपक्रमाची माहिती दिली. यामध्ये मेळघाटातील आरोग्य आव्हानांना तोंड देण्यासाठी ‘मिशन 28’ उपक्रम, चिखलदरा येथील साहसी खेळ प्रकार, वन पर्यटन विकास आदींबाबत यावेळी माहिती दिली. उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सहासी खेळ प्रकारात सुरक्षिततेला प्राधान्य देण्याबाबत यंत्रणेला निर्देश दिले.
00000