नवी दिल्ली, दि. ६ : मराठी माणसाने राजधानी दिल्लीत भूतकाळात प्रभावीपणे आपला ठसा उमटविलेला आहे. आज तो अधिक प्रभावीपणे उमटविण्याची आज गरज आहे. मराठी माणूस दिल्लीत टिकला पाहिजे, मराठी संस्कृती वाढीस लागली पाहिजे, अशी भावना “मराठी भाषा, मराठी माणूस आणि दिल्ली” या परिसंवादात मान्यवरांनी व्यक्त केली.
दिल्लीत होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने हा परिसंवाद महाराष्ट्र सदन येथे आयोजित करण्यात आला होता. सरहद या संस्थेने या परिसंवादाचे आयोजन केले.
खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, अरविंद सावंत, मेधाताई कुलकर्णी, वैभव डांगे, ज्येष्ठ पत्रकार सुनील चावके, तामिळनाडू कॅडरचे सध्या केंद्रीय शिक्षण खात्याचे सचिव आनंद पाटील, भारतीय डाक सेवेचे अधिकारी कौस्तुभ देशमुख या मान्यवरांनी या परिसंवादात भाग घेतला. पत्रकार प्रशांत वाघाये यांनी संवादक म्हणून भूमिका पार पाडली.
आपल्या पुढच्या पिढीपर्यंत मराठी भाषा पोहोचविण्यासाठी प्रत्येकाने आपल्या परीने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे दिल्लीत होणार असून उत्तर भारत आणि महाराष्ट्राला जोडणारा हा धागा आहे.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर महाराष्ट्राने प्रयत्नाने दिल्लीत आपले वेगळे स्थान निर्माण केले. मुंबई सारख्यां शहरात केंद्र शासनाच्या विविध आस्थापनेवर मराठी अधिकाऱ्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविण्याची अपेक्षा श्री. सावंत यांनी व्यक्त केली.
अमोल कोल्हे म्हणाले, महाराष्ट्राला महापुरुषांची मोठी परंपरा असून या महापुरुषांच्या इतिहास राष्ट्रीय स्तरावर वारंवार मांडता आला पाहिजे. मराठी माणसाची सांस्कृतिक भूक भागविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, असे सांगून वैभव डांगे यांनी दिल्लीतील मराठी माणसांचा इतिहास विशद केला.
मराठी पत्रकारांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी सर्वांनीच सहकार्य केले पाहिजे, अशी अपेक्षा ज्येष्ठ पत्रकार सुनील चावके यांनी व्यक्त केली.
मराठी भाषा आणि मराठी समाजासाठी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन श्री पाटील यांनी केले.
मेधा कुलकर्णी यांनी मराठी भाषेतील साहित्य हे व्याकरणाच्या दृष्टिकोनातून योग्य असायला हवे अशी अपेक्षा व्यक्त केली.
00000
अंजु निमसरकर, मा.अ.