नवी दिल्ली, दि. ६ : औषधी वनस्पतींच्या आरोग्यविषयक लाभांविषयी जनजागृती करण्यासाठी, शतावरी सशक्त आरोग्यासाठी या प्रजाती-विशेष अभियानाचे उद्घाटन आयूष राज्यमंत्री श्री प्रतापराव जाधव, (स्वतंत्र प्रभार), यांच्या हस्ते आयुष भवन, येथे करण्यात आले.
या कार्यक्रमाला वैद्य राजेश कोटेचा, सचिव, आयुष मंत्रालय, डॉ. महेश कुमार दधीच, मुख्य कार्यकारी अधिकारी, राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ (NMPB) तसेच आयुष मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित होते.
राज्यमंत्री श्री. जाधव म्हणाले, यांनी १० वर्षांत आयुष मंत्रालयाच्या विकासावर प्रकाश टाकला तसेच शतावरीच्या आरोग्यविषयक लाभांविषयी जनजागृती करण्यासाठी एन एम पी बी (NMPB)च्या या नव्या उपक्रमाचे कौतुक केले. एन एम पी बी (NMPB )द्वारे राबविण्यात आलेल्या आवळा, मोरिंगा, गिलोय आणि अश्वगंधा मोहिमेविषयी माहिती दिली.
१५ ऑगस्ट २०२२ रोजी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी “पंचप्राण” उद्दिष्टावर प्रकाश टाकला, ज्याअंतर्गत भारताने २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनावे असा संकल्प करण्यात आला. या पंचप्राण उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी आयुष मंत्रालयाच्या एन एम पी बी ने शतावरी वनस्पतीची निवड केली आहे. शतावरी ही वनस्पती महिलांच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरणार आहे.
वैद्य राजेश कोटेचा, सचिव, आयुष मंत्रालय यांनी औषधी वनस्पतींशी संबंधित उपक्रम आणि एन एम पी बी च्या उपलब्धींची माहिती दिली. तसेच, एन एम पी बी च्या “औषधी वनस्पतींच्या संवर्धन, विकास आणि शाश्वत व्यवस्थापनासाठीच्या केंद्रीय क्षेत्र योजनेचा उद्देश आणि घटक” याबाबतही सविस्तर माहिती दिली.
डॉ. महेश कुमार दधीच, एन एम पी बी, आयुष मंत्रालय यांनी शतावरी वनस्पतीच्या औषधी महत्त्वाबरोबरच कृषी अर्थशास्त्र विषयी माहिती दिली. शतावरीच्या आरोग्यविषयक लाभांविषयी जनजागृती करण्यासाठी या अभियानांतर्गत पात्र संस्थांना आर्थिक सहाय्य दिला जाणार आहे.
००००