नवीन कामगार कायदे लागू करताना कामगार हिताची पूर्ण काळजी घेतली जाईल – कामगार मंत्री आकाश फुंडकर

मुंबई, दि.6 : नवीन कामगार कायदे लागू करताना कामगार हिताची काळजी घेण्यात येईल तसेच भारतीय मजदूर संघाने घेतलेल्या हरकतींचा पूर्ण विचार केला जाईल, असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी आज केले.

भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने नवीन लेबर कोड आणि बी.एम.एस. या विषयावर आयोजित सेमिनार मध्ये ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ऍडव्होकेट अनिल ढुमणे, महामंत्री किरण मिलगिर, अखिल भारतीय उपाध्यक्ष राज बिहारी शर्मा, क्षेत्र संघटन मंत्री श्री राजेशजी, ना.मे.लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्थेच्या संचालक श्रीमती रोशनी कदम – पाटील आणि प्राध्यापक पी.एम.कडूकर उपस्थित होते.

नवीन कामगार कायदे 2019 – 2020 पासून संसदेने पास केलेले असून ते लागू करण्याबाबत केंद्र व राज्य सरकार विचार करीत आहे. या पार्श्वभूमीवर या कायद्यांबाबत भारतीय मजदूर संघाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी या सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते.

सेमिनारचे उद्घाटन कामगार मंत्री श्री.फुंडकर यांनी केले. ॲड.ढुमणे आणि श्री.शर्मा यांनी या कायद्यांबाबत भारतीय मजदूर संघाची भूमिका विशद केली. या निमित्ताने ॲड.ढुमणे यांनी लिहिलेल्या ” नवीन लेबर कोड आणि बी.एम.एस.’ या पुस्तकाचे प्रकाशन भारतीय श्रमशोध मंडळाच्या वतीने कामगारमंत्री श्री.फुंडकर हस्ते करण्यात आले.

सामाजिक सुरक्षा कोड 2020 आणि वेतन कोड 2019 हे कामगार कायदे असंघटित आणि संघटित क्षेत्रातील कामगारांच्या साठी लाभदायक असून घरेलू, बांधकाम, अंगणवाडी, आशा सेविका, फेरीवाले, रिक्षाचालक, टॅक्सीचालक आदी असंघटित क्षेत्रातील सुमारे 50 कोटी कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि संघटित आणि असंघटित क्षेत्रातील सर्व कामगारांना किमान वेतन हमी देणारे असल्याने ते तत्काळ लागू झाले पाहिजे, अशी मागणी याप्रसंगी करण्यात आली. त्याचबरोबर औद्योगिक संबंध कोड 2020 आणि व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाची स्थिती कोड 2020 या कोड मधील कारखाना बंद करणे, कामगार कपात, ले ऑफ, फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट, स्टॅंडिंग ऑर्डर आणि कंत्राटी कामगारांशी संबंधित अनेक तरतुदी बदलून मगच ते कायदे लागू करावेत, अशी मागणी भारतीय मजदूर संघाच्यावतीने यावेळी करण्यात आली.

या सेमिनारला राज्यभरातून संरक्षण, वीज मंडळ, बँका, विमा, अनुऊर्जा, पोस्ट , मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, RCF , पोर्ट ट्रस्ट, खाजगी कारखाने, सार्वजनिक उद्योग, सहकारी बँका, शासकीय कर्मचारी, सिक्युरिटी प्रेस व करन्सी नोट प्रेस, कंत्राटी कामगार, अंगणवाडी, घरेलू , बांधकाम, रिक्षाचालक, फेरीवाले, टॅक्सीचालक, बिडी, मर्चंट नेव्ही, सुरक्षा रक्षक, एअर इंडिया आदी उद्योगातील 250 पेक्षा जास्त प्रतिनिधी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण मिलगिर यांनी तर सूत्रसंचालन बाळासाहेब भुजबळ यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मुंबईचे सचिव संदीप कदम यांनी केले.
000