समाज कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वंयसेवी संस्था व या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेवक व्यक्ती यांना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. सन 2023-24 या वर्षासाठीच्या सामाजिक न्यायाच्या 6 पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. त्या पुरस्कारांची सविस्तर माहिती… |
समाजातील दुर्बल घटक व प्रामुख्याने अनुसूचित जातीचा शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकास करून समता आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी तसेच मागासलेल्या वर्गाला समाजाच्या मुख्य प्रवाहाबरोबर आणण्यासाठी राज्य शासन विविध योजना आणि कार्यक्रम राबवित आहे. तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना प्रोत्साहन देण्यासाठी विविध पुरस्कारांच्या योजना सामाजिक न्याय विभाग राबवित आहे. नुकत्याच सहा विविध पुरस्कारासाठी पात्र संस्था आणि व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
समाज कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक यांना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सन 2023-2024 या आर्थिक वर्षात देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. ज्या वर्षासाठी व ज्या पुरस्कारांकरीता अर्ज करण्यात येत आहे. त्या वर्षासाठी त्या पुरस्काराकरिता विहीत केलेल्या अटींची पूर्तता करणे आवश्यक राहील. तसेच पुरस्कारासाठी दि. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर अशी गणना विचारात घेण्यात येईल. सन 2023-2024 या वर्षाकरीता पात्रतेचा कालावधी 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 असा विचारात घेण्यात येईल. अर्ज मागविण्यात आलेल्या सहा पुरस्कारांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार
पुरस्काराचे स्वरुप:- 51 व्यक्तींना रु. 15 हजार आणि 10 संस्थांना रु. 25 हजार एक.
पुरस्कारासाठी निवडीचे निकष (व्यक्ती):- अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागासवर्गीय जाती कल्याण, दिव्यांग कल्याण व समाज कल्याण क्षेत्रात 15 वर्षे वैयक्तिक अभिजात कार्य करणाऱ्या व्यक्ती.
पुरस्कार निवडीचे निकष (संस्था):- समाज कल्याण क्षेत्रात मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी शिक्षण, आरोग्य, अन्याय निर्मूलन अंधश्रद्धा निर्मूलन, जागरण इत्यादी क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, संस्थेचे वरील समाज कल्याण क्षेत्रात 10 वर्षाहून अधिक उल्लेखनीय कार्य आवश्यक संस्थेमध्ये कोणत्याही गैरव्यवहार नसावा. मागील 5 वर्षाचे लेखा परीक्षण अहवाल आवश्यक.
2) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार
पुरस्काराचे स्वरुप:- 25 व्यक्तींना रुपये 25 हजार आणि संस्थांना रुपये 50 हजार.
पुरस्कारासाठी निवडीचे निकष (व्यक्ती):- मातंग समाजाकरिता कलात्मक, समाज कल्याण साहित्य. शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणारे नामावंत. कलावंत, साहित्यिक व समाज सेवक असावेत. वरील क्षेत्रात किमान 10 वर्ष कार्य केलेले असावे. व्यक्ति व संस्थेस एकापेक्षा अधिक वेळेस पुरस्कारास पात्र समजण्यात येणार नाही. महिला 30 टक्के पर्यंत असाव्यात. पुरस्कारासाठी फक्त मातंग समाजातील कलावंत व साहित्यिक व समाजसेवक यांचा विचार केला जाईल.
पुरस्कारासाठी निवडीचे निकष (संस्था):- समाज कल्याण क्षेत्रात मातंग समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षण, आरोग्य, अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती इत्यादी क्षेत्रात कार्य करणारी संस्था. मातंग समाजाच्या कल्याणासाठी 10 वर्षाहून अधिक मौलिक काम असावे. मातंग समाज सेवा व विकास या क्षेत्रात काम पाहून पुरस्कारासाठी निवड करण्यात येईल.
3) पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार
पुरस्काराचे स्वरुप:-एका व्यक्तीला रुपये 21 हजार एक आणि एका संस्थेला रुपये 30 हजार एक.
पुरस्कारासाठी निवडीचे निकष (व्यक्ती):- अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील भूमिहीन, शेतमजूर व दुर्बल घटकांचे कल्याणासाठी झटणारे नामावंत समाजसेवक असावेत. सामाजिक क्षेत्रात कमीत कमी 15 वर्ष कार्य केलेले असावे. एका व्यक्तीस एकापेक्षा जास्त पुरस्कारासाठी पात्र समजण्यात येणार नाही. हा पुरस्कार मिळण्यास जात, धर्म, लिंग, क्षेत्र ह्या गोष्टीचा विचार केला जाणार नाही.
पुरस्कारासाठी निवडीचे निकष (संस्था):- समाज कल्याण क्षेत्रात व अनु. जाती व नवबौद्ध समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षण, आरोग्य, अन्याय निर्मूलन, अंधश्रद्धा रूढी निर्मूलन, जनजागृती भूमिहीन शेतमजूर यांचे कल्याण इत्यादी क्षेत्रात कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांना हा पुरस्कार दिला जाईल. वरील समाज कल्याण क्षेत्रात 10 वर्ष कार्य असावे. विशेष मौलिक व भरीव काम करणाऱ्या संस्थेच्या बाबतीत अट शिथिल करण्यात येईल.
4) संत रविदास पुरस्कार
पुरस्काराचे स्वरुप:-एका व्यक्तीला रु. 21 हजार एक आणि एका संस्थेला रुपये 30 हजार एक.
पुरस्कारासाठी निवडीचे निकष (व्यक्ती):- चर्मकार समाजाच्या व दलित समाजाच्या कल्याणासाठी झटणारे नामावंत समाजसेवक असावेत. सामाजिक क्षेत्रात कमीत कमी 15 वर्षे कार्य केलेले असावे. व्यक्तीस एकापेक्षा जास्त पुरस्कारासाठी पात्र समजण्यात येणार नाही. लोकनियुक्त प्रतिनिधी पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत.
पुरस्कार निवडीचे निकष (संस्था):-समाज कल्याण क्षेत्रात चर्मकार समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षण, आरोग्य, अन्याय निर्मूलन अंधश्रद्धा रुढी निर्मूलन, जनजागृती इत्यादी क्षेत्रात कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांना हा पुरस्कार दिला जाईल. वरील समाज कल्याण क्षेत्रात किमान 10 वर्षाहून अधिक काळ कार्य केलेले असावे. विशेष मौलिक व भरीव काम करणाऱ्या संस्थेच्या बाबतीत अट शिथिलक्षम राहील.
(१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार या पुरस्कारासाठी व्यक्तीकरिता वयाची अट पुरुषांसाठी किमान 50 वर्ष आणि महिलांसाठी किमान 40 वर्ष राहील. या पुरस्कारासाठी संस्थांच्या बाबतीत या संस्था मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950 व संस्था नोंदणी अधिनियम, 1860 अंतर्गत नांदणीकृत असाव्यात आणि या संस्था राजकारणापासून अलिप्त असाव्यात.
सर्व पुरस्कारासाठी शिफारशीच्या पद्धती पुढीलप्रमाणे आहेत. अ) व्यक्तीचे संपूर्ण जीवन चरित्र आ) विना दुराचार प्रमाणपत्र इ) गैर वर्तनाबाबत खटला किंवा शिक्षा झाली नसल्याचे प्रमाणपत्र ई) सार्वजनिक संपत्तीचा अपहार केला नसल्याचे प्रमाणपत्र ड) संस्था व व्यक्ती यांनी केलेल्या विशेष कार्याचा तपशील.
5) शाहू,फुले, आंबेडकर पारितोषिक
पुरस्कारांची संख्या (संस्था) :- एकूण 12 पुरस्कार (सहा महसूल विभागातील प्रत्येकी दोन प्रमाणे 12 संस्था)
पुरस्काराचे स्वरूप (शासकीय/अशासकीय संस्था) :- रु.7.50 लक्ष (धनाकर्ष) सन्मानपत्र मानपत्रासाठी चांदीचा स्क्रोल, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ.
पुरस्कारासाठी निवडीचे निकष (संस्था):- राज्य शासनाच्या (रुल्स ऑफ बिझनेस) अनुसार हा विभाग कार्यरत असला पाहिजे. संस्थेने समाजातील अतिशय दुर्बल व मागासवर्गीय घटकातील व्यक्ती व समाजासाठी सेवा, शिक्षण, आरोग्य, पुनर्वसन, रोजगार अशा व यासारख्या व्यक्तिगत व सामुहिक क्षेत्रांमध्ये एकमेव अद्वितीय कार्य केलेले असले पाहिजे. सदर संस्था संबंधित क्षेत्रात किमान मागील 10 वर्षापासून कार्यरत असणे आवश्यक आहे. संबंधित संस्था ही मुंबई विश्वस्त नोंदणी अधिनियम 1950 व संस्था नोंदणी अधिनियम 1860 अन्वये नोंदणीकृत असावी. संस्थेची आर्थिक स्थिती बळकट असली पाहिजे. संबंधित संस्थेविरुद्ध किंवा पदाधिकाराविरुद्ध फौजदारी गुन्हा किंवा दंडात्मक कारवाई झालेली नसावी.
6) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार
पुरस्काराची संख्या (संस्था):- राज्यस्तर -3 विभागीयस्तर (महसूल विभागात प्रत्येकी 3 याप्रमाणे 18 पुरस्कार)
पुरस्काराचे स्वरूप (शासकीय/अशासकीय संस्था):- राज्यस्तरीय पुरस्कार-3 प्रथम पुरस्कार रु. 5 लक्ष द्वितीय पुरस्कार-रु. 3 लक्ष तृतीय पुरस्कार रु. 2 लक्ष विभागीयस्तर पुरस्कार-18 प्रत्येक प्रवर्गामधून उत्कृष्ट ठरलेल्या संस्थेस रु.1 एक लक्ष पारितोषिक देण्यात येते.
पुरस्कारासाठी निवडीचे निकष (संस्था):- अ) अनुसूचित जातीच्या मुला-मुलींसाठी शासकीय वस्तीगृह. ब) अनुसूचित जातीच्या मुलामुलींसाठी निवासी शाळा/आश्रमशाळा. क) अनुसूचित जातीच्या मुलामुलींची अनुदानित वसतिगृहे प्रत्येक स्तरावर समितीने दिलेला निर्णय हा अंतिम राहील. संस्थाची तपासणी करून समितीमार्फत अंतिम निर्णय घेण्यात येईल. पुरस्कारासाठी अंतिम निवडीच्या वेळी जर दोन्ही संस्थांना समान गुण मिळाल्यास चिठ्ठी पद्धतीने संस्थेची निवड करण्यात येईल. प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवणारी संस्था 5 वर्ष कालावधी पर्यंत पुन्हा पुरस्कारासाठी पात्र असणार नाही. ज्या संस्थेविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल झाले असतील किंवा शासकीय अनुदानाचा गैरवापर केल्याचे निष्पन्न झाले असेल अशा संस्था पुरस्कारासाठी पात्र राहणार नाही. कोणतीही संस्था एकाच वेळी दोन पारितोषिक मिळविण्यास पात्र असणार नाही.
इच्छुक स्वयंसेवी संस्था व व्यक्ती यांनी पुरस्कारासाठी त्यांचे विहित नमुन्यातील अर्ज संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्याकडे दि. 15 फेब्रुवारी 2025 पर्यंत सर्व नमूद कागदपत्रांसह दाखल करावेत. अर्जाचा नमुना संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचे कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आलेला आहे सदर पुरस्काराची जाहिरात व अर्जाचा नमुना शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या https://sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, इमारत, मंत्रालय, मादाम कामा रोड, पहिला मजला, विस्तार, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई (कार्यालय दूरध्वनी:- 020-26126307) या कार्यालयाने प्रमुख वृत्तपत्रातून प्रसिद्धी देऊन पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.
अनिल आलुरकर
उपसंचालक (माहिती), अमरावती