◆ जनता दरबारात ३७८ तक्रार अर्ज दाखल
◆ अर्जांवर २८ फेब्रुवारी पर्यंत कारवाईचे निर्देश
यवतमाळ, दि.७ (जिमाका) : आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ.अशोक ऊईके यांच्या अध्यक्षतेखाली शासन आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत तहसिल कार्यालय बाभुळगावच्या प्रागंणात जनता दरबार घेण्यात आला. जनता दरबार मध्ये एकुण 23 विभागाचे अधिकारी, कर्मचारी आपल्या स्टॉलवर उपस्थित होते. यावेळी ३७८ तक्रार अर्ज प्राप्त झाले. अर्जांवर कालमर्यादेत कारवाई करण्याच्या सूचना संबंधित विभागांना श्री.ऊईके यांनी केल्या.
कार्यक्रमास सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडाचे प्रकल्प अधिकारी अमीत रंजन, उपविभागीय अधिकारी गोपाळ देशपांडे, तहसीलदार मिरा पागोरे, सतिश मानलवार, नितीन परडखे, प्रकाश भुमकाळे, आनंद सोळंके, अनिकेत पोहेकर तसेच विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
श्री.ऊईके यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. आलेल्या तक्रार अर्जांवर चर्चा केली. तक्रारींवर संबंधित विभागाने कालमर्यादेत म्हणजे दि.२८ फेब्रुवारी पर्यंत कारवाई करुन अर्जदारास कळविण्यात यावे. शासन सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी काम करते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही, त्यांची कामे गतीने होतील याकडे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशा सूचना त्यांनी केल्या.
सुरुवातीस तहसिलदार मिरा पागोरे यांनी जनता दरबार आयोजनाची माहिती दिली. त्यानंतर विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. उपविभागीय अधिकारी गोपाळ देशपांडे यांनी जनता दरबार कार्यक्रमाच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात आरोग्य विभागाकडून मोफत नेत्र तपासणी, शुगर तपासणी व रक्तदाब तपासणीचे आयोजन करण्यात आले होते. अग्रीस्टॅक योजनेंतर्गत फार्मर आयडी बनविण्याकरीता कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये २८७ शेतकऱ्यांच्या फार्मर आयडी तयार करण्यात आल्या. कार्यक्रमास दोन हजारावर नागरिक उपस्थित होते. शेवटी आभार निवासी नायब तहसीलदार यांनी मानले.
000