पालघर,दि.8:- शेती, उद्योग आणि संस्कृती यांचा पर्यटनाशी मेळ घालून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी चिकू महोत्सवाचे विशेष महत्त्व आहे, असे प्रतिपादन इतर मागास बहुजन कल्याण,दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी केले.
पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील बोर्डी येथे आजपासून सुरु झालेल्या 2 दिवसीय ‘चिकू महोत्सव 2025’ या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. सावे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास आ.राजेंद्र गावित, आ.विनोद निकोले, संदीप राऊत, शारदा पाटील, फेस्टिव्हलचे अध्यक्ष उदय चुरी, पर्यटन विभागाचे सहसंचालक .हनुमंत हेडे, तहसिलदार सुनिल कोळी, सरपंच श्याम दुबळा, नरेश राऊत, एन.के.पाटील, प्रभाकर सावे आदि मान्यवर उपस्थित होते.
श्री.सावे म्हणाले की, या महोत्सवात चिकू आणि त्यावर प्रक्रिया केलेले पदार्थ, पारंपरिक वारली चित्रकला तसेच स्थानिक ग्रामीण संस्कृतीचा अद्वितीय अनुभव मिळत आहे. स्थानिक शेतकरी, उद्योजक आणि कलाकारांना त्यांच्या उत्पादनांचे सादरीकरण करण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून चिकू उत्पादकांना बाजारपेठ मिळण्याबरोबरच ग्रामीण पर्यटनाचा मोठा विकास होण्यास मदत होणार आहे. या महोत्सवात विविध प्रकारचे 200 हून अधिक स्टॉल लावण्यात आले आहेत. त्याकरीता पर्यटकांनी या स्टॉलला भेट देऊन स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी. चिकू फेस्टिवल शेती, संस्कृती आणि पर्यटनाचा एक अनोखा संयोग असून ग्रामीण विकासाची अद्वितीय संधी आहे. असेही ते म्हणाले.
रूरल एंटरप्रुनर्स वेल्फेअर फाउंडेशन (REWF) यांच्या वतीने आयोजित या महोत्सवाचे यंदा 11 वे वर्ष आहे. येणाऱ्या काळामध्ये या भागाचा विकास वेगाने होणार आहे. त्यामुळे या विकास कामात नागरिकांचा सहभाग असायला पाहीजे. पालघर जिल्हा हा काही काळात 4 थी मुंबई होणार आहे. चिकूच्या माध्यमातून अनेक वस्तू तयार करण्यात येत आहे. त्यामुळे उद्योजकांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. महाराष्ट्रात उद्योग वाढले पाहीजेत. त्याकरीता शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून महिलांना व युवकांना सक्षम करण्यात येणार आहे.असेही श्री.सावे म्हणाले.
कार्यक्रमाच्या शेवटी फेस्टिव्हलचे अध्यक्ष उदय चुरी यांनी उपस्थितांचे आभार मानले.