राष्ट्रीय आमदार संमेलन क्षमता वृद्धिंगत करण्याचे व्यासपीठ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आयोजित राष्ट्रीय आमदार संमेलन

पुणे, दि. 8: राष्ट्रीय आमदार संमेलनाच्या माध्यमातून राजकारणातील ध्येय, मनातील विचार संवादात्मक पद्धतीने मांडण्यासाठी व आपल्या क्षमता वृद्धिंगत करण्यासाठीचे एक व्यासपीठ आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

राष्ट्रीय विधायक संमेलन भारततर्फे देशातील आमदारांसाठी दोन दिवसीय क्षमता वृद्धी कार्यक्रम एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, कोथरुड येथे आयोजित करण्यात आले. राष्ट्रीय आमदार संमेलनाच्या उद्धाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री फडणवीस बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी (दूरदृश्य प्रणाली),  लोकसभेच्या माजी अध्यक्ष पद्मभूषण सुमित्रा महाजन, उत्तर प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष सतीश महाना, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या  उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार सुमीत वानखेडे, विविध राज्यातील आमदार, राजस्थान विधानसभेचे माजी अध्यक्ष सी.पी.जोशी, राष्ट्रीय विद्यार्थी संमेलनाचे संस्थापक राहुल कराड आदी प्रत्यक्ष उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राजकारणात प्रशिक्षित नागरिक सहभागी व्हावे तसेच देशाच्या लोकशाहीत गुणात्मक परिवर्तन होण्यासोबतच त्यांच्या मूल्यातही वाढ व्हावी, यादृष्टीने एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नन्सच्या माध्यमातून राष्ट्रीय आमदार संमेलन, महिला प्रतिनिधी संमेलन असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.यामुळे सक्षम लोकप्रतिनिधी तसेच   अधिकारी व कर्मचारीही  घडत आहेत.

सुदृढ लोकशाहीसाठी हे गरजेचे आहे. देशाच्या विकासकार्यात इतरांपेक्षा असामान्य असे काम करणाऱ्या व्यक्तींनाच लक्षात ठेवले जाते.आपले राजकारणातील स्थान, ध्येय जाणून नागरिक आपल्याला नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी विधीमंडळात पाठवतात, त्यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही याची दक्षता घ्यावी. नागरिकांचा विश्वास सार्थ ठरविण्यासोबतच प्रेरणादायी काम होत असल्याचे कामाच्या माध्यमातून त्यांच्या मनामध्ये प्रतिबिंबीत झाले पाहिजे. भारतीय संविधानाला अनुरुप काम करण्याकरिता आपण राजकारणात आल्याची भावना डोळ्यासमोर ठेवावी असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

विधिमंडळात लोकप्रतिनीधींच्या सहभागातून कायदे निर्मिती हे प्रमुख काम आहे, यामध्ये रुची वाढविली पाहिजे.  समाजातील शेवटच्या घटकांला प्रतिबिंबीत करण्याकरिता सभागृहातील कामकाजात सहभागी झाले पाहिजे. नागरिकांच्या कामांसाठी आणि विधानमंडळ कामात समान न्याय दिला पाहिजे. विधिमंडळात विविध सकारात्मक आयुधांचा वापर करुन नागरिकांचे प्रश्न, आशा, अपेक्षा पूर्ण करण्याकरिता प्रामाणिक प्रयत्न करावे. लोकप्रतिनिधींचे कामकाज प्रशासनासाठी मार्गदर्शक ठरले पाहिजे. त्यानुसार प्रशासनही उत्तरदायी पद्धतीने कामकाज करेल. असे श्री फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, लोकप्रतिनिधींनी बदलत्या काळानुरुप नवीन गोष्टी शिकण्याची गरज आहे. देशातील गावागावापर्यंत तंत्रज्ञान पोहचले असून या माध्यमाद्वारे अधिकाधिक नागरिक व्यक्त होण्याबरोबरच आपल्या कामाचे मूल्यमापन करत असतात. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे काळाची गरज आहे. तंत्रज्ञानातील बदलावर विचारमंथन करावे, असे आवाहन श्री. फडणवीस यांनी केले.

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून संवाद साधताना म्हणाले, लोकशाहीत गुणात्मक परिवर्तनाचे आवाहन स्वीकारुन त्यादृष्टीने या संमेलनाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहे. आपल्या क्षमतेचा पुरेपूर वापर करुन नागरिक, समाज, देशाचे हित डोळ्यासमोर ठेवून काम करावे. समाजातील शेवटच्या घटकांपर्यत पोहचून त्यांच्या समस्या जाणून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्याकरिता प्रयत्न करावे. यामुळे लोकप्रतिनिधीवरील विश्वास वाढण्यास मदत होईल. शाश्वत विकासाची ध्येय गाठण्याकरिता प्रयत्नशील राहावे तसेच या संमेलनाच्या माध्यमातून प्रबोधन व प्रशिक्षण,आणि संशोधन व विकास या त्रिसूत्रीवर काम करावे, असेही श्री. गडकरी यांनी सांगितले.

श्री. महाना म्हणाले, भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार जबाबदारी पार पाडावी. देशात गुणात्मक परिवर्तन आणि काळानुरुप जागतिक पातळीवरील होणारे नाविन्यपूर्ण बदल लक्षात घेता त्याप्रमाणे कामे करावे, याकरिता अगोदर स्वत:मध्ये परिवर्तन करावे.  राजकीय व्यवस्थेत आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवण्यासोबतच नागरिकांच्या विश्वासाला तडा जाणार नाही, याबाबत दक्षता लोकप्रतिनिधींनी  घ्यावी, असेही श्री. महाना यांनी सांगितले.

लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन म्हणाल्या, देशाच्या विकासाकरिता शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्याचा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवण्यासोबतच शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, धोरणे, प्रकल्प समाजातील शेवटच्या घटकांपर्यत पोहचविण्याकरिता पक्षभेद विसरुन सर्व राजकीय पक्षांनी एकत्रितपणे काम करावे. देशात सकारात्मक बदल घडविण्याकरिता राजकारणात चांगल्या लोकांची गरज आहे. राष्ट्रीय विद्यार्थी संमेलनात देशाच्या विविध भागातून लोकप्रतिनिधी येत असल्याने हे संमेलन महत्वपूर्ण असल्याचे श्रीमती महाजन यांनी सांगितले.

प्रास्ताविकात डॉ. कराड म्हणाले, विकासात्मक राजकारण काळाची गरज लक्षात घेता शहरी व ग्रामीण भागातील युवकांना राजकारणाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. सामाजिक सुरक्षतिता, यशस्वी योजना, धोरण आदी महत्वपूर्ण बाबींचे आदान-प्रदान होण्याच्या दृष्टीने आदर्श आचारसंहिता तयार करण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे. देशातील विविध राज्यातील सहा विधानसभेसोबत युवकांना प्रशिक्षण व शिक्षण देण्याबाबत विद्यापीठाने करार केला असल्याचेही डॉ कराड यांनी सांगितले.

यावेळी आर्वी  विधानसभेचे आमदार तथा एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे माजी विद्यार्थी सुमीत वानखेडे यांना लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.