करजगी बालिका अत्याचार प्रकरणाची राज्य महिला आयोगाकडून दखल

खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला फाशीच्या शिक्षेसाठी पाठपुरावा करणार - महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर

सांगली, दि. ८ (जि. मा. का.) : जत तालुक्यातील करजगी येथील बालिका अत्याचार प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा मिळण्यासाठी पाठपुरावा करू. पीडितेच्या कुटुंबियांना मनोधैर्य योजना व मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत देऊ, असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आज केले. करजगी येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस स्थानक, उमदी येथे बैठक घेऊन संपूर्ण घटनेचा आढावा घेतल्यानंतर त्या बोलत होत्या.

यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) संदीप यादव, प्रभारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुरेंद्र बेंद्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे, प्रभारी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी रोहिणी वाघमारे, बाल विकास प्रकल्प अधिकारी शकुंतला निकम, जिल्हा चाईल्ड लाईन कक्षाच्या  समन्वयक आदी उपस्थित होते.

यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर म्हणाल्या, करजगी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याची घटना अत्यंत निर्दयी, माणुसकीला काळिमा फासणारी व वेदनादायी असून, या घटनेचा निषेध करते. या प्रकरणी अत्यंत कमी कालावधीत पंधरा दिवसात दोषारोपपत्र दाखल केले जाईल, असे त्या म्हणाल्या.

घटनेचा आढावा घेतल्यानंतर श्रीमती चाकणकर यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच, पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व त्यांना धीर दिला.