नाशिक, दि. 9 (जिमाका वृत्तसेवा) : शहरीकरण आणि नागरिकरण वाढत असताना पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन होणे आवश्यक आहे. पर्यावरणाचे रक्षण आणि नद्या पुनर्जीवित करीत पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी येथे केले.
नाशिक येथील यूथ फेस्टिव्हल मैदानावर श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट, दिंडोरी, दिंडोरी प्रणित शेतकरी उत्पादक कंपनी, राज्य शासनाचा कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (नाशिक) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक कृषी महोत्सव 2025 मध्ये आज सकाळच्या सत्रात ‘पर्यावरण’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी खासदार डॉ. शोभा बच्छाव, आमदार सीमा हिरे, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद, आबासाहेब मोरे आदी उपस्थित होते.
यावेळी मंत्री श्रीमती मुंडे यांच्या हस्ते शेतीत विविध उपक्रम राबविण्याऱ्या शेतकऱ्यांसह पर्यावरण पूरक केंद्र म्हणून जळगाव जिल्ह्यातील आनंद नगर यांचा सत्कार करण्यात आला.
मंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या की, भविष्यातील पिढीसाठी संपत्ती नव्हे, तर सुरक्षित पर्यावरण राखून ठेवणे काळाची गरज आहे. त्यासाठी पर्यावरण संतुलन राखणे आवश्यक आहे. मोठमोठी बांधकामे करताना रोपांची लागवड करणे आवश्यक आहे. सध्या प्रयागराज येथे कुंभमेळा सुरू आहे. नाशिक – त्र्यंबकेश्वर येथे सन 2027 मध्ये कुंभमेळा होईल. आगामी कुंभमेळा हा स्वच्छ, पर्यावरणपूरक ठेवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. कुठल्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. त्यासाठी पर्यावरण विभागातर्फे नियोजन केले जाईल. गोवंश संवर्धनासाठी पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. पर्यावरण संवर्धनाचा एक भाग म्हणून पुष्पगुच्छऐवजी बियांचे पाऊच दिल्यास अधिक उपयोगी ठरणार आहे. तशा सूचना सुद्धा देण्यात येतील. तसेच ग्रामीण भागात उद्योजक वाढविण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येईल, असेही मंत्री श्रीमती मुंडे यांनी सांगितले.
यावेळी श्री. मोरे, डॉ. गिरासे आदींनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमानंतर मंत्री श्रीमती मुंडे यांनी कृषी प्रदर्शनाची पाहणी केली. यावेळी शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000