कुतूहलातून विविध विषयांवरील साहित्याची निर्मिती; राज्यस्तरीय साहित्य संमेलनात डॉ. अच्युत गोडबोले यांचे प्रतिपादन

मंत्री उदय सामंत यांनी दृकश्राव्य माध्यमाव्दारे संमेलनाला शुभेच्छा

सगरोळी (नांदेड ) दि.९ फेब्रुवारी : विश्व, मनुष्य व निसर्ग निर्मितीचे लहानपणापासूनच मला प्रचंड कुतूहल होते. कुतूहलापोटी वाचनाची आवड निर्माण झाली. पुढे लेखणीतून प्रगट होत गेलो व  माझ्या हातून विविध विषयांवर ५६ पुस्तकांची निर्मिती झाली असल्याचे जेष्ठ साहित्यिक डो. अच्युत गोडबोले यांनी सांगितले. सगरोळी (ता.बिलोली) येथे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते.

यावेळी  व्यासपीठावर देगलूर-बिलोली विधानसभेचे आमदार जितेश अंतापुरकर, संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा संस्कृती संवर्धन मंडळाचे चेअरमन प्रमोद देशमुख, माजी आमदार गंगाधर पटणे, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ. मार्तंड कुलकर्णी साहित्यिक देविदास फुलारी आदींची उपस्थिती होती. उद्योग तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दृकश्राव्य माध्यमाव्दारे या संमेलनाला शुभेच्छा दिल्या.

रविवार (ता.९) रोजी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई व येथील संस्कृति संवर्धन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते.

‘मुसाफिर’ या पुस्तकाने अनेकांच्या आत्महत्या रोखल्या, बोर्डरूम हे पुस्तक वाचून अनेकांनी उद्योग उभारले. समाजास याचा लाभ होत असल्याने समाधान वाटते. उद्याचे जग हे तंत्रज्ञानावर आधारित असून हे सर्वांना समजावे म्हणून मराठीतून पुस्तके लिहिली. तंत्रज्ञानाबाबत अद्ययावत राहावे.  प्रचंड वाचन, गाणी, चर्चा यासह त्यातील  मुख्य शिलेदार, माणसे, त्याची थेरी, मूलतत्त्वे याचा अभ्यास केला. लोकांचा विश्वास व  माझाही आत्मविश्वास वाढला, माझ्यामुळे सहलेखक तयार झाले. येथील संस्थेचे काम पाहून प्रभावित झालो असल्याचे ते म्हणाले.

माझ्या मतदारसंघात हा कार्यक्रम होत असल्याने अभिमानास्पद आहे. येथे अनेक कार्यक्रमातून नागरिकांची जडणघडण होत असल्याचे आमदार जितेश अन्तापुरकर म्हणाले.

सगरोळी येथील कर्मयोग्याच्या भूमीत हे संमेलन व्हावे अशी मनापासून इच्छा होती. यापुढे सगरोळी येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरावे अशी इच्छा मार्तंड कुळकर्णी यांनी व्यक्त केली. प्रमोद देशमुख यांनी सर्व मान्यवर व सारस्वतांचे शब्दसुमनांनी स्वागत केले. परिसरास कर्मयोगी बाबासाहेब देशमुख साहित्य नगरी तर सभा मंडपास मराठवाड्याचे भूमिपुत्र कविवर्य दे.ल. महाजन यांचे नाव दिले होते. यावेळी साहित्यिक व श्रोते मोठ्या संखेने उपस्थित होते.
संमेलनाच्या उद्घाटनासाठी  मराठी भाषामंत्री उदय सामंत उपस्थित राहणार होते,  परंतु त्यांनी आभासी पद्धतीने श्रोत्यांशी संवाद साधला. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी राज्यशासन कटिबद्ध असून सर्वतोपरी मदत केली जाईल अशी ग्वाही देऊन संमेलनास शुभेच्छा दिल्या.

0000