नागपूर विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत चंद्रपूर जिल्हा ‘चॅम्पियन’

राज्यस्तरावरही उत्कृष्ट कामगिरी करा - पालकमंत्री डॉ. अशोक उईके

चंद्रपूर, दि 10 : चंद्रपूर येथे पार पडलेल्या नागपूर विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी करत 356 गुणांसह ‘जनरल चॅम्पियनशीप’ चा किताब पटकाविला. तर उपविजेता गडचिरोली जिल्ह्याला 305 गुण मिळाले. राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी चंद्रपूर जिल्हा विजयी चमुसह ‘जनरल चॅम्पियनशीप’’ चषक स्वीकारला.

दिनांक 7 ते 9 फेब्रुवारी 2025 या कालावधीत विसापूर येथील सैनिक शाळेत नागपूर विभागीय क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. नागपूर विभागातील सहा जिल्हे आणि नागपूर येथील आयुक्त कार्यालयातील चमूने सदर स्पर्धेत सहभाग नोंदविला. या स्पर्धेचा समारोप सैनिक स्कूल येथे 9 फेब्रुवारी 2025 रोजी पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, नागपूरच्या विभागीय आयुक्त माधवी खोडे – चवरे, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविशांत पंडा, नागपूर येथील उपायुक्त दिपाली मोतिहाळे, सहायक जिल्हाधिकारी अपुर्वा बासुर, कश्मिरा संख्ये, सैनिक स्कूलचे प्राचार्य कॅप्टन अश्विन अनुपदेव, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

राज्य स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करा  पालकमंत्री डॉ. अशोक उईके

यावेळी बोलतांना पालकमंत्री डॉ. अशोक उईके म्हणाले, महसूल विभाग प्रशासनाची मुख्य रक्तवाहिनी आहे. दैनंदिन काम करीत असतांनाच अशा प्रकारच्या क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमातून अधिकारी – कर्मचा-यांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध होते. जिल्हास्तर, विभागीय स्तर आणि राज्य स्तरावर खेळण्याची चांगली संधी त्यांना मिळते. खेळामध्ये यश प्राप्त करणे हे ध्येय ठेवायलाच पाहिजे. प्रशासनामध्ये काम करीत असतांना आपण आपली ओळख निर्माण करतो, तशीच ओळख खेळाच्या माध्यमातूनही निर्माण झाली पाहिजे. राज्यस्तरावरील क्रीडा स्पर्धेत आता नागपूर विभाग आणि चंद्रपूर जिल्ह्यानेसुध्दा उत्कृष्ट कामगिरी करावी, अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी व्यक्त केली.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने क्रीडा स्पर्धांचे उत्कृष्ट आयोजन : आमदार किशोर जोरगेवार

राज्य शासनाच्या 590 कोटीतून ही सैनिक स्कूल उभी राहिली आहे. खेळाच्या अत्याधुनिक सोयीसुविधा येथे आहेत. शासनाला महसूल प्रशासनाकडून जास्त अपेक्षा असतात. महसूल विभागाच्या क्रीडा स्पर्धांप्रमाणेच नागपूर विभागाने इतरही शासकीय  विभागांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा आयेाजित कराव्यात. जेणेकरून इतर विभागातील अधिकारी कर्मचा-यांनासुध्दा स्वत:तील कलागुण विकसीत करता येईल. या क्रीडा स्पर्धांचे चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने उत्कृष्ट आयोजन केले, असे त्यांनी सांगितले.

राज्यात नागपूर विभाग नेहमीच अग्रेसर राहावा : विभागीय आयुक्त माधवी खोडे

महसूल विभागावर प्रशासनाची मोठी जबाबदारी असते. कामाच्या तणावातून मुक्त होण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन आवश्यक आहे. नागपूर विभागातील सहा जिल्हे आणि आयुक्त कार्यालयाच्या टीम येथे आल्या. सर्वांनी चांगली कामगिरी केली असून खेळभावना केवळ खेळातच नव्हे तर कामातूनही दिसू द्यावी. तसेच संपूर्ण राज्यात नागपूर विभाग नेहमीच अग्रेसर असावा, अशी अपेक्षा विभागीय आयुक्त माधवी खोडे – चवरे यांनी व्यक्त केली.

प्रास्ताविकात जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. म्हणाले, तीन दिवस या स्पर्धा घेण्यात आल्या. नागपूर विभागातून एकूण 1080 अधिकारी आणि कर्मचा-यांनी यात सहभाग नोंदविला. 22 क्रीडा प्रकारामध्ये या स्पर्धा घेण्यात आल्या. अशा स्पर्धांमधून व्यक्तिमत्व विकास होण्यास मदत होते.

कार्यक्रमाचे संचालन तहसीलदार प्रताप वाघमारे यांनी तर आभार निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांनी मानले. यावेळी उपविभागीय अधिकारी संजय पवार, रविंद्र माने, उपजिल्हाधिकारी (भुसंपादन) संजय पवार, तहसीलदार विजय पवार, श्रीधर राजमाने यांच्यासह इतर खेळाडू अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

हे संघ ठरले विजेता आणि उपविजेता : कबड्डी – विजेता गडचिरोली जिल्हा, उपविजेता चंद्रपूर जिल्हा. व्हॉलीबॉल – विजेता चंद्रपूर, उपविजेता गडचिरोली.  थ्रो बॉल – विजेता गडचिरोली, उपविजेता चंद्रपूर. खो-खो  महिला : विजेता गडचिरोली, उपविजेता चंद्रपूर. खो-खो पुरुष : विजेता गडचिरोली, उपविजेता चंद्रपूर. क्रिकेट – विजेता चंद्रपूर, उपविजेता नागपूर. फुटबॉल – विजेता चंद्रपूर, उपविजेता गडचिरोली. याशिवाय उत्कृष्ट गायन सोलो, उत्कृष्ट अभिनय सोलो, वैयक्तिक नृत्य, उत्कृष्ट वेशभुषा, नक्कल, युगल गीत, दिग्दर्शन, कलाप्रकार मध्ये चंद्रपूर आणि गडचिरोलीसह गोंदिया, भंडारा, वर्धा, नागपूर जिल्ह्यांनी चांगली कामगिरी केली.

००००