अर्थव्यवस्था बळकटीकरणात शेतकऱ्यांचे योगदान : जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

नाशिक येथे जागतिक कृषी महोत्सवाचा समारोप     

नाशिक, दि. 10 फेब्रुवारी, 2025 (जिमाका वृत्तसेवा) : देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रीलियन डॉलर होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. देशाची अर्थव्यवस्था बळकटीकरणात शेतकऱ्यांचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री (गोदावरी, कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले.
आज यूथ फेस्टिवल मैदान येथे आयोजित जागतिक कृषी महोत्सव 2025 समारोप कार्यक्रम प्रंसगी ते बोलत होते. यावेळी आमदार छगन भुजबळ, नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर अध्यक्ष अण्णासाहेब मोरे, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव भागवत यांच्यासह अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

                                                                                                                                    जलसंपदा मंत्री श्री. विखे-पाटील म्हणाले की, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. अर्थसंकल्पात कृषीक्षेत्रासाठी भरीव तरतूद केली आहे. त्यामुळे देशात सर्वात जास्त गुंतवणूक या क्षेत्रात केली जाणार आहे.  नवनवीन योजनांचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून शेतकरी व समृद्ध शेतीसाठी अविरतपणे सेवा सुरू आहे. नव्या पिढीला रचनात्मक कामांमधून नवी दिशा देण्याचे काम स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून होत आहे. नवीन तंत्रज्ञानामुळे शेतीची नवीन औजारे, पीकपद्धती,  फळे व पीकांचे नवीन वाण यामुळे शेती उत्पादनात वाढ होतांना दिसत आहे. पश्चिम खोऱ्यातील वाहून जाणारे 65 टीएमसी पाणी पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्याचे महत्वाचे नियोजित असून यासाठी 50 ते 60 हजार कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. पुढील पाच वर्षात हे काम पूर्ण  करुन गोदावरी खारे दुष्काळमुक्त करण्याची शासनाचे प्रयत्न आहेत. जिल्ह्यातील धरणक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शेतीसाठी पाण्याचे नियोजन करतांना बिगर सिंचन क्षेत्रासाठी असेलेले पाण्याचे काटकोर नियोजन करण्याच्या सूचना जलसंपदा विभाग व नाशिक महानगरपालिका यांना दिल्या असल्याचे जलसंपदा मंत्री श्री. विखे-पाटील यांनी सांगितले.


शेतीक्षेत्रात होणारे क्रांतिकारी बदल स्वीकारतांना येणाऱ्या काळात निर्यातक्षम शेतीसाठी अधिक संधी कशा उपलब्ध होतील यासाठी अधिक प्रयत्नांवर भर देण्यात येणार आहे. यासाठी जैविक शेती व सेंद्रीय खतांचा वापर करून कमी खर्चात शेतीची उत्पादकता अधिक वाढण्याच्या कृषी  विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. शेतीपूरक दुग्ध व्यवसायास अधिक चालना देण्यासह शेती उत्पादनांची  विक्री व्यवस्था बळकट करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे जलसंपदा मंत्री श्री. विखे-पाटील यांनी सांगितले.

यावेळी आमदार श्री. भुजबळ यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी कृषी, जलसंपदा विभागाचे अधिकारी, शेतकरी व नागरिक उपस्थित होते.


000000