छत्रपती संभाजीनगर,दि.१०(जिमाका)- जिल्ह्यात औद्योगिक गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर येत आहे. जिल्ह्यात विविध सुविधांचा विकास करण्यासाठी अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टीकोनातून काम करावे,असे निर्देश राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज जिल्हा प्रशासकीय यंत्रणेला दिले.
येथील स्मार्ट सिटी कार्यालयात आज जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणांचा सर्वसाधारण आढावा पालकमंत्री शिरसाट यांनी घेतला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मनपा आयुक्त जी.श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मिणीयार, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक सिरसे तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व तहसिलदार आदी उपस्थित होते.
पालकमंत्री शिरसाट यांनी गौण खनिज, मातोश्री पाणंद रस्ते योजना, मनपा हद्दीतील जमिन मोजणी प्रकरणे, जिल्हा परिषदेचे विविध उपक्रम, जिल्हा परिषद इमारत बांधकाम, महात्मा गांधी ग्रामिण रोजगार हमी योजना, स्वच्छ भारत मिशन, आरोग्य योजना, पोलीस दल अशा विविध विभागांचा आढावा घेतला.
शहरातील एका अपहरण प्रकरणात पोलिसांनी अवघ्या काही तासात तपास काम पूर्ण करुन अपहृत बालकाची सुखरुप सुटका केली त्याबद्दल पालकमंत्री शिरसाट यांनी पोलीसांचे अभिनंदन केले. पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, गौण खनिज प्रकरणी कारवाई करतांना पोलीस दल सोबत असावे याची खात्री महसूल विभागाने बाळगावी. तहसिलदार, मंडळ अधिकारी यांचा आढावा घ्यावा. लवकरच तालुकानिहाय जनसंवाद यात्रा सुरु करण्याचा आपला मानस असल्याचे पालकमंत्री शिरसाट यांनी सांगितले. ते म्हणाले की, अधिकाऱ्यांनी कामकाज करतांना येणाऱ्या अडचणींबाबतही सांगावे. त्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करु. अधिकाऱ्यांनी कामे करुन जनतेला सेवा सुविधा उपलब्ध करुन द्याव्या. त्यास आपले प्राधान्य आहे. जनहिताची कामे वेळेत पूर्ण करावी. जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अधिक चांगली करावी. गुन्हेगारीची केंद्रे ओळखून त्यावर कारवाई करावी. कुणालाही पाठीशी घालू नका. ग्रामिण भागात शेतरस्ते मोकळे करण्यासाठी मातोश्री पाणंद रस्ते योजना राबवा, असे निर्देश त्यांनी दिले.
०००००