सोलापूर दि.10 (जिमाका) महाबळेश्वर येथे मधु पर्यटनासारखा (हनी टुरिझम) प्रकल्प राबवून देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्याचे प्रयत्न केले जातील. तसेच मधमाशांच्या संवर्धनासाठी लोकचळवळ उभी राहिली पाहिजे, असे प्रतिपादन खादी व ग्रामोद्योगचे सभापती रवींद्र साठे यांनी केले.
एव्हरेस्ट उद्योग समूहाच्या सहकार्याने व राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या पुढाकाराने महाबळेश्वर येथे मधुबन हा प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मधपाळांना व ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना श्री.साठे बोलत होते. यावेळी राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गीतांजली बावीस्कर, सहमुख्य कार्यकारी अधिकारी रेश्मा माळी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप, रामबंधू मसालेचे हेमंत राठी व एव्हरेस्टच्या वतीने रवींद्र गांधी उपस्थित होते.
राज्याच्या एकूण क्षमतेच्या केवळ 7 ते 8 टक्के आज महाराष्ट्रात मध उत्पादन होते. हे मध उत्पादन वाढण्यासाठी खादी मंडळ प्रयत्नशील आहे. मध गोळा करण्यासाठी व मधपाळ तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना शास्त्रोत्क प्रशिक्षण देण्यात आले पाहिजे. मधकेंद्र योजनेाच्या माध्यमातून मंडळ हे काम करत आहे. आपल्याकडे मध हे सोनं आहे; परंतु त्याचा आपण हवा तेवढा प्रचार व प्रसार करीत नाही. भविष्यकाळात मधमाश्यांच्या संवर्धनाची लोकचळवळ उभी राहिली तर महाराष्ट्रात मधक्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. इस्त्रायलप्रमाणे आपल्याकडे मधमाळांचा डेटा उपलब्ध नाही. राज्यातील प्रत्येक मधपाळांची नोंद करून राज्यात किती मधपाळ आहेत याची माहिती वेबसाईटवर दिली पाहिजे. देशात कोठेच मधसंचालनालय नाही ते केवळ महाराष्ट्रात आहे. महाबळेश्वर येथील मधसंचालनालयाचा वर्धापनदिन साजरा झाला पाहिजे. 20 मे हा जागतिक मधपाळदिन म्हणून साजरा केला जातो. यंदा या दिवशी राज्यातील सर्व मधपाळांना एकत्रित करून मधपाळांचे महाअधिवेशन भरविण्याची सूचना रवींद्र साठे यांनी केली.
महाबळेश्वर येथील मध संचालनालय पुढील काळात “ सेंटर ऑफ एक्सलंस ” करण्याची मंडळाची कल्पना आहे. त्यादृष्टीने इथे झालेले मधुबन ही एक छोटी सुरूवात आहे. मधमाशी व मधमाशीपालन या विषयी अधिकाधिक प्रबोधन होण्याची आवश्यकता साठे यांनी प्रतिपादित केली. अशाच प्रकारचे दुसरे मधुबन येत्या काळात बोरिवली, मुंबई येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात होणार असल्याची माहिती साठे यांनी दिली.
अमेरिका आणि चीनमध्ये मधमाश्यांचे विष गोळा केले जाते. हे विष एक कोटी रुपये किलो या भावाने विकले जाते. दुर्धर आजारावर हे विष गुणकारी आहे. भविष्यात खादी व ग्रामोद्योगमंडळाच्या वतीने अशाप्रकारे विष गोळा करता येते का, याचा राज्यशासन गांभीर्याने विचार करीत आहे, अशी माहिती मंडळाचे सभापती साठे यांनी यावेळी दिली.
००००