मुंबई, दि..11 : ज्येष्ठ साहित्यिक, ग्रामीण कथाकार आणि कादंबरीकार प्रा. रा.रं.बोराडे यांच्या निधनाने मराठी साहित्यविश्वाने एक प्रतिभासंपन्न लेखक गमावला आहे, अशा शब्दांत मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
त्यांच्या सर्जनशील लेखणीने ग्रामीण जीवनाचे अनेक पैलू उलगडले, समाजमनाचा ठाव घेतला आणि वाचकांना अंतर्मुख केले. त्यांच्या कथांमधील वास्तवदर्शी चित्रण, धक्कादायक शेवट आणि मराठवाडी बोलीतील सहज संवाद यामुळे त्यांचे साहित्य वाचकप्रिय ठरले.
रा.रं.बोराडे यांचा जन्म 25 डिसेंबर, 1940 रोजी लातूर जिल्हा आणि तालुक्यातील काटगाव या गावी झाला होता. बघता बघता महाराष्ट्राचं अवघं साहित्यक्षेत्र त्यांची कर्मभूमी झाली ‘पाचोळा’कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बोराडे सरांनी केवळ साहित्यक्षेत्रात नव्हे, तर शिक्षण आणि साहित्य प्रसाराच्या माध्यमातूनही मोठे योगदान दिले. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदावर असताना त्यांनी ग्रामीण ग्रंथालयांसाठी केलेले कार्य उल्लेखनीय आहे.
त्यांच्या निधनाने मराठी साहित्याची मोठी हानी झाली असून, त्यांच्या साहित्याच्या रूपाने ते कायम आपल्या स्मरणात राहतील. त्यांच्या कुटुंबीयांप्रति मी संवेदना व्यक्त करतो. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, असे श्री. सामंत यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.