आशा निराशेच्या हिंदोळ्यावर असलेल्या युवापिढींना सावरण्याचे साहित्यिकांमध्ये सामर्थ्य –  डॉ. रविंद्र शोभणे

दिल्ली येथील अगामी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर साधला संवाद

नागपूर, दि.11 :  जगातल्या कोणत्याही साहित्याची पाने उलगडून पाहिली तर त्यात समाज जीवनाच्या सुख-दु:खाचे, मानवी भाव विश्वाचे प्रतिबिंब आपल्या भेटीला येते. एखादी कादंबरी, कथा, कविता, गझलेचा शेर हा या भावभावनेचा साक्षात्कार असतो. हा साक्षात्कार जगण्याला सकारात्मकतेची प्रेरणा देणारा असतो. अलिकडच्या काळात आशा-निराशेच्या हिंदोळ्यावर असलेल्या युवापिढींना सावरण्याचे सामर्थ्य हे साहित्यिकांमध्ये, कविमध्ये आहे असे नि:संदिग्ध प्रतिपादन 97 व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रविंद्र शोभणे यांनी केले.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या औचित्याने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे त्यांच्याशी साधलेल्या संवादात ते बोलत होते. नव्यापिढीपर्यंत, महाविद्यालयीन युवकापर्यंत मराठी साहित्याबाबत अधिक जवळीकता निर्माण व्हावी, सकारात्मकता निर्माण व्हावी, वाचन चळवळीला बळ मिळावे या उद्देशाने विविध साहित्यिकांशी संवादाची ही मोहीम राज्यभर हाती घेण्यात आली आहे.

साहित्य हे मनाला समाधान देणारे असते. सुखदु:खाच्या पलिकडे, क्षणाक्षणाला ताणल्या जाणाऱ्या उत्सुकतेच्या पलिकडे मनाला सावरुन धरण्याची ऊर्जा साहित्यामधून आपल्याला घेता येते. समाजाचे प्रतिबिंब साहित्यात असल्याने काळानुरुप विवेकाचे भान आपल्याला यातून मिळते. श्यामची आई सारखी कादंबरी वाचल्यावर कुणाच्याही आयुष्यात पावित्र्याच्या वाटा निर्माण करते. आजच्या पिढीने आपल्या वाचनाच्या व्यासंगाला अधिक बळ हे साहित्यातून मिळते, असे डॉ. शोभणे यांनी सांगितले.

1954 नंतर दिल्ली येथे होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाबद्दल सर्वांच्या मनात कमालीची उत्सुकता आहे. काही महिण्यांपूर्वी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने भारताच्या प्रमुख भाषांच्या मांदीयाळीत आता मराठी विराजमान झाली आहे. महाराष्ट्र शासनाने मराठी साहित्य संमेलनासाठी विश्वासाने पुढे येत आर्थिकदृष्ट्या दिलेला राजाश्रय महत्वाचा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मराठी भाषेप्रती सुरु केलेले विविध उपक्रम याचा डॉ.रविंद्र शोभणे यांनी गौरव केला. मराठी भाषा प्रेमी, साहित्यप्रेमी या साहित्य संमेलनातून सकारात्मकतेची नवी ऊर्जा अनुभवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी त्यांच्याशी हा संवाद साधला. विविध समाज माध्यमांवर लवकरच हा दृकश्राव्य संवाद लवकरच उपलब्ध करुन दिला जात आहे.

00000