मुंबई, दि. १२ – नागपूर येथील फुटाळा तलावाच्या परिसरात अतिक्रमण करुन त्यावर लॉन व निवासी इमारतींचे बांधकाम झाले असल्याचे आढळून आले असून, याबाबत पाहणी व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही तातडीने करण्यात यावी, असे निर्देश महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. या अतिक्रमणासाठी जबाबदार असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
नागपूरच्या फुटाळा तलावाच्या परिसरात अतिक्रमण झाल्याच्या तक्रारीसंदर्भात श्री.बावनकुळे यांच्या मंत्रालयातील दालनात बैठक झाली. यावेळी आमदार विकास ठाकरे उपस्थित होते.
श्री.बावनकुळे म्हणाले, या प्रकरणी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन तातडीने अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही करण्यात यावी. त्याचप्रमाणे अतिक्रमणासाठी जबाबदार असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम आणि महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
ही जागा नागपूर जिल्हाधिकारी यांच्या मालकीची असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात आहे. तसेच ३० वर्षे मुदतीकरिता फुटाळा जलाशय परिसर एकात्मीकृत प्रकल्पाकरिता महामेट्रो महामंडळास हस्तांतरीत केलेली आहे. या परिसरात महामेट्रो महामंडळामार्फत एकात्मीकृत प्रकल्पांतर्गत विविध कामांचे कार्यान्वयन सुरू आहे. तेलंगखेडी येथे फुटाळा तलाव परिसर तसेच महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या जमिनीवर अतिक्रमण करुन त्यावर लॉन व निवासी इमारतींचे बांधकाम करण्यात आल्याच्या अनुषंगाने अतिक्रमण काढण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत संबंधितांना नोटीस पाठविण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
0000
बी.सी.झंवर/विसंअ