नाशिक जिल्ह्यात ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टरसाठी जमिनीचा प्रस्ताव सादर करा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश

मुंबई, दि. १२ : ग्रामीण आणि विशेषत: आदिवासी भागामध्ये उद्योगक्षेत्र वाढावे, आदिवासी समाजातील उद्योजकांना व्यवसाय वृद्धीसाठी प्रोत्साहन मिळावे, यादृष्टीने ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टर विकसित करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास (एमआयडीसी) जमीन हस्तांतरीत करण्याबाबत प्रस्ताव सादर करावा. या प्रस्तावावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल, असे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यातील जांबुटके येथे ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टर विकसित करण्यासाठी शासकीय जमीन एमआयडीसीला हस्तांतरीत करण्याबाबत श्री.बावनकुळे यांच्या मंत्रालयीन दालनात बैठक झाली. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, उद्योग विभागाचे सचिव डॉ.पी.अन्बलगन, एमआयडीसीच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली मुळे यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

महसूल मंत्री श्री.बावनकुळे यांनी ग्रामीण आणि आदिवासी भागात औद्योगिक विकास होणे आवश्यक असल्याचे सांगून जांबुटके येथे मोफत जमीन देण्याबाबत प्रस्ताव सादर करावा, तसेच येथे आदिवासी समाजातील उद्योजकांना 50 टक्के प्राधान्य देण्यात यावे, असे निर्देश यावेळी दिले.

00000

बी.सी.झंवर/विसंअ