मुंबई, दि. 12 : विद्यार्थ्यांचे आरोग्य प्राधान्यक्रमावर ठेवून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांची दरवर्षी तपासणी करण्यात येते. याच अनुषंगाने यावर्षी दोन कोटी शालेय विद्यार्थ्यांची मोहीमस्तरावर तपासणी करण्यात यावी. त्याचप्रमाणे आयुष्मान कार्डच्या लाभापासून एकही लाभार्थी वंचित राहणार नाही, यासाठी नियोजन करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत.
मंत्रालय येथे आरोग्य विषयक विविध विषयांच्या आढावा बैठकीत श्री. आबिटकर बोलत होते. यावेळी महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आण्णासाहेब चव्हाण, आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या उपसंचालक रेखा गायकवाड आदी प्रत्यक्ष तर आरोग्य विभागाचे सचिव विरेन्द्र सिंह, तसेच सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व मंडळांचे उपसंचालक, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याची दरवर्षी तपासणी करण्यात येते. या तपासणी दरम्यान आरोग्य विषयक समस्या आढळून आलेल्या विद्यार्थ्यांवर शासकीय रुग्णालयात मोफत उपचार करण्यात येतात. या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने राज्यातील 0 ते 18 वयोगटातील साधारण दोन कोटी विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात यावी. तसेच या विद्यार्थ्यांची तपासणी केल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना आरोग्याच्या समस्या जाणवतील, त्यांना योग्य उपचार मिळण्यासाठी व उपचारांचे नियमीत मॉनिटरींग होण्यासाठी नाशिक जिल्हा परिषदेने तयार केलेले ॲपची माहिती घेण्यात यावी. तसेच आरोग्य तपासणी करण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांची येत्या आठ दिवसांत सर्व माहिती अद्ययावत करून मोहिमस्तरावर या तपासणी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात यावे. यासाठी शालेय आणि महिला व बाल विकास विभाग यांचे देखील सहकार्य घेण्यात यावे, अशा सूचनाही श्री. आबिटकर यांनी दिल्या.
प्रधानमंत्री व मुख्यमंत्री यांच्या आरोग्यविषयक महात्वाकांक्षी योजनांचा लाभ सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहचवून राज्यतील एकही लाभार्थी या योजनेपासून वंचित राहू नये याबाबत नियोजन करण्यात यावे. या अनुषंगाने आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या प्रत्येक लाभार्थ्याला आयुष्मान कार्ड मिळण्यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी युद्धपातळीवर आयुष्मान कार्ड काढण्याचे काम हाती घ्यावे व या कामाचा दैनंदिन अहवाल सादर करावा, असेही श्री. आबिटकर यांनी सांगितले.
गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याबाबत (पीसीपीएनडीटी) नागरिकांमध्ये जनजागृती होण्याच्या दृष्टिने आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. या कायद्याची प्रभावी आणि गतिमान अंमलबजावणी करण्यासाठी आरोग्य, पोलीस यंत्रणा, विधी तज्ज्ञ व सामाजिक संस्था यांच्या मदतीने भरारी पथके नियुक्त करण्यात यावी, असे निर्देश ही श्री.आबिटकर यांनी यावेळी दिले. आपत्कालीन सेवांचा देखील यावेळी आढावा घेण्यात आला.
0000
अर्चना देशमुख/विसंअ/