मुंबई, दि.१२: “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” योजनेची विविध संलग्न महाविद्यालयांमधून वेगाने आणि प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश कौशल्य, रोजगार, उद्योजकता आण नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिले
राज्यातील विविध शासकीय विद्यापिठांसमवेत सामंजस्य करार करून संयुक्तपणे अंमलबजावणी कार्यवाही करण्यात येत आहे. यानंतर याच धर्तीवर राज्यातील इतर शासकीय विद्यापीठांसमवेत करार करण्यात येतील. यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (NEP) स्किल क्रेडीट पॉईंट करता येतील.
मंत्रालय येथील दालनात मुंबई विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी यांच्या दरम्यान नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (NEP) स्किल क्रेडीट पॉईंट सांमजस्य करार झाला. यावेळी कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, आयुक्त नितीन पाटील, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर अपूर्वा पालकर,मुंबई विद्यापीठ कुलगुरू डॉ. प्रा. रविंद्र कुलकर्णी, कुलसचिव प्रसाद कारंडे, राज्य कौशल्य सोसायटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनावणे उपस्थित होते.
कौशल्य विकास मंत्री लोढा म्हणाले की, मुंबई विद्यापीठ व राज्य कौशल्य विकास सोसायटी यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करारामुळे 200 पेक्षा अधिक महाविद्यालय यामध्ये समाविष्ट होतील अशी आशा आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० मध्ये व्यावसायिक शिक्षणाला महत्व देण्यात आलेले आहे. धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सकारात्मक वातावरण निर्मिती होण्यासाठी तसेच, युवक- युवतींना कौशल्य विकासाची संधी महाविद्यालयामध्ये उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” ही नाविन्यपूर्ण योजना सुरु केली आहे. यानुसार, प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान अंतर्गत राज्यातील महाविद्यालयांमध्ये “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र (ACKVK)” स्थापन करण्याकरिता प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
राज्यातील नामांकित महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र स्थापन करून 15 ते 45 वयोगटातील युवक-युवतींना कौशल्य विकास प्रशिक्षण प्रदान करून, त्यांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. याकरिता केंद्र शासनामार्फत निश्चित केलेल्या Common Cost Norms नुसार कौशल्य विकास केंद्रांना विविध टप्प्यांमध्ये प्रशिक्षण शुल्क अदा करण्यात येत आहे. या योजनेसाठी १५ ते ४५ वयोगटातील संबंधित प्रशिक्षणासाठी आवश्यक किमान पात्रतेनुसार युवक-युवती पात्र आहेत. आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजनेकरिता संपूर्ण राज्य अनुदानित प्रमोद महाजन कौशल्य विकास व उद्योजकता विकास अभियानाच्या निधीमधून योजना सुरु करण्यात आली असल्याचेही श्री. लोढा यांनी सांगितले.
या योजनेंतर्गत मान्यता दिलेल्या प्रत्येक महाविद्यालयातील कौशल्य विकास केंद्रात प्रतिवर्षी साधारण १५० युवक-युवतींना कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याप्रमाणे संपूर्ण राज्यात प्रतिवर्षी साधारण १,५०,००० युवक-युवतींना कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे श्री. लोढा यांनी सांगितले.
0000
संध्या गरवारे/विसंअ/