मराठी भाषेच्या समृद्धी आणि वृद्धित वर्धा जिल्ह्याचे योगदान

देशाच्या राजधानीत दिल्ली येथे २१ ते फेब्रुवारी दरम्यान ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्याचवेळी देशाच्या स्वातंत्र्य लढ्याच्या राजधानीत वर्ध्यात दोन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने झाली. येवढ्यावरच हा प्रवास थांबला नाही तर मराठीची समृद्धी करण्यास वर्ध्याने मोठे योगदान दिले आहे. पुस्तकी साहित्य आणि जीवनाच्या यशस्वी समृद्ध वाटचालीचे मराठीतील साहित्य जिल्ह्यातील साहित्यिकांनी दिले आहे. यात योगदान देणाऱ्यांची श्रेय नामावली मोठी आहे. पण मराठी भाषेचा विविधांगी अभ्यास करणारे ध्यासवंत जिल्ह्यात होऊन गेले.

मराठी भाषेला शासनाने अभिजात भाषेचा दर्जा दिला, हा उपचार झाला पण जिल्ह्यातील साहित्यिकांनी मराठी भाषेतील साहित्य लिहून जनजीवनावर उपकार केले आहे. गांधीजींनी याच भूमीत मराठीत साहित्य लिहिले. काही हिंदी भजनाचे मराठी भाषेत भाषांतर केले. आचार्य  विनोबा भावे यांनी गिताई लिहिली. देविदास सोटे यांनी याच भूमीत मराठीतल्या वऱ्हाडी साहित्याला वेगळे अंग दिले. प्रा.डॉ.सानप यांनी याच भूमीत समग्र तुकाराम लिहून संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या विविध सामाजिक योगदानासह जीवनातील समाजहितैशी पैलूंचा परिचय करून दिला. देविदास सोटे यांनी पहिला वऱ्हाडी भाषेचा शब्दकोष वर्ध्यातच लिहिला आणि मराठी साहित्याच्या वर्धिष्णू वाटचालीत योगदान दिले. सेलू तालुक्यातील महाबळा गावचे वसंतराव वऱ्हाडपांडे नागपुरीबोलीचा पहिला शब्दकोष याच भूमित लिहिला. सरोज देशमुख लिहिते व्हा, म्हणतच स्वत: मराठीत लिहितच असतात. मराठी कवी संजय इंगळे तिगावकर यांचेही मराठीच्या विविध पदरांना सोनेरी काठ लावायला हात मागे नाहित. हिंगणघाटचे कवी बुरबुरे, सुनिता कावळे, यांचा मराठीच्या विकास योगदानातला वाटा विसरता येणारच नाही. त्यांच्या वतीने भाषेच्या समृद्धी आणि वृद्धीला योगदान मिळतच असते.

१९६९ आणि २०२३ मध्ये अखिल भारतीय महाठी साहित्य संमेलने याच गांधीभूमीत झाली. वर्धेकरांचे त्यांनी दिलेल्या मराठी भाषेच्या विकासाकरीता  योगदानाबद्दल नि:शब्द असणे आणि व्यक्त होणे आगळेच. भाषातज्ज्ञ डॉ.गणेश देवी म्हणतात, येत्या ३० वर्षात देशातील सुमारे ४०० भाषा नामशेष होतील. पण अमृताते पैजा जिंके, अशा मराठी भाषेचे अमरत्त्व कायमच राहणार.

 

प्रकाश कथले

पत्रकार, वर्धा