मुंबई, दि.१४ : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने सोमवार, दि. १७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंध येथे ‘प्रशिक्षकांचे प्रशिक्षण कार्यक्रम’ अर्थात ‘ट्रेन द टीचर्स’ या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून कौशल्य विकासावर भर देण्यात आला असून त्याच अंतर्गत’ ट्रेन द टीचर्स’हा उपक्रम राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत आहे.
यावेळी माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, टाटा स्ट्राईव्हचे सीओओ अमेय वंजारी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमासाठी आभासी (ऑनलाईन) पद्धतीने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, छत्रपती संभाजीनगर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अमरावती, राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था, मुंबई आणि इंडो-जर्मन टुल रूम, संभाजीनगरचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
या प्रशिक्षण कार्यक्रमाचा मुख्य हेतू प्रशिक्षित प्रशिक्षक निर्माण करणे असून, दि. १७ फेब्रुवारीपासून या कार्यक्रमाला सुरुवात होणार असल्याची माहिती विभागामार्फत देण्यात आली आहे.
००००
संध्या गरवारे/विसंअ