मुंबई दि. १४ : जलसंपदा विभागाकडील अधिकाऱ्यांना धरण, कालवे , बंधारे बांधणे यासह या क्षेत्रातील नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचे प्रक्षशिक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनीने सर्वसमावेशक असा प्रशिक्षण कार्यक्रम तयार करावा, अशा सूचना जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या.
सह्याद्री अतिथी गृह येथे महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (मेरी) तसेच कोयना वीजनिर्मिती प्रकल्प (हायड्रो प्रोजेक्ट) यांनी सादरीकरण केले. यावेळी जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, लाभ क्षेत्र विकास सचिव संजय बेलसरे, मुख्य अभियंता तथा सहसचिव अभय पाठक, प्रसाद नार्वेकर, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, गोदावरी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार, मेरीचे महासंचालक श्री. मांदाडे, मुख्य अभियंता सुदर्शन पगार व श्री. चोपडे आदी उपस्थित होते.
जलसंपदा मंत्री विखे पाटील म्हणाले, जलसंपदा विभागामार्फत करण्यात येणाऱ्या कामांमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. हे तंत्रज्ञान क्षेत्रीय अधिकाऱ्यांना अवगत असणे काळाची गरज आहे. यासाठी तीन वर्षातून एकदा प्रत्येक अधिकाऱ्यांना हे प्रशिक्षण मिळाले पाहिजे. या प्रशिक्षणासाठी प्रबोधिनीने प्रत्येक कॅलेंडर वर्षात प्रशिक्षणाचा कार्यक्रम निश्चित करावा. तसेच अधिकाऱ्यांना प्रशिक्षणासाठी मार्गदर्शक सूचनाही तयार कराव्यात.
यावेळी महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (मेरी), यांत्रिकी विभाग, जलविद्युत प्रकल्प, गुणनियंत्रण मंडळ, धरण सुरक्षितता कामे याचाही आढावा घेण्यात आला.
०००
एकनाथ पोवार/विसंअ