महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ अर्थात बालभारतीच्या स्थापनेला नुकतीच ५८ वर्षे पूर्ण झाली आहेत. मागील अठ्ठावन्न वर्षाच्या काळात नवीन शैक्षणिक विचारप्रणाली, कालसुसंगत शैक्षणिक धोरणे, नवीन अध्ययन- अध्यापन पद्धती अशा विविध बाबींचा विचार करून बालभारतीने पाठ्यपुस्तकांच्या स्वरूपात, आशयात अनेक बदल केले आहेत. कालानुरूप बदलाची ही प्रक्रिया आजही सुरु आहे.
शिक्षण हे समाज परिवर्तनाचे महत्त्वाचे माध्यम आहे, तर पाठ्यपुस्तक हे ज्ञानप्राप्ती व शिक्षणाचा प्रसार करण्याचे प्रमुख साधन आहे. पाठ्यपुस्तके हा प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा विषय असतो. आपल्या मनाचा एक कोपरा लहानपणी शिकलेल्या पाठ्यपुस्तकांसाठी कायम राखीव असतो. लहानपणी शिकलेल्या कथा, कविता, चित्रे यांचा एक विलोभनीय ठसा मनावर उमटलेला असतो. पाठ्यपुस्तकांतून भाषेचे, साहित्याचे आणि वाचनाचे संस्कार तर होतातच, शिवाय जीवनाचे, जगण्याचे अनेक संस्कारही याच पाठ्यपुस्तकांतून होत असतात. अशी ही आयुष्यभर साथसंगत करणारी, उत्तम संस्कारांची शिदोरी देणारी पाठ्यपुस्तके बालभारतीत तयार होतात.दरवर्षी अंदाजे 6.55 कोटी पुस्तकांची छपाई करून त्यांचे वितरण बालभारती मार्फत केले जाते. पाठ्यपुस्तकांची निर्मिती ही खडतर आणि विलक्षण प्रक्रिया आहे. प्रतिवर्षी एकाचवेळी राज्यातील लाखाहून अधिक शाळांमधील शिक्षक, कोट्यवधी विद्यार्थी आणि तितकेच पालक यांच्याशी आपुलकीच्या अतूट धाग्यांनी बालभारती जोडली गेली आहे.
मंडळाची स्थापना
स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या दोन दशकात देशातील शैक्षणिक वाटचालीची जडणघडण झाली. अनेक जाती, अनेक भाषा, विविध रूढी, परंपरा इत्यादींमुळे सामाजिक आणि शैक्षणिक गरजा भागवण्यासाठी नेमके काय स्वीकारावे, काय स्वीकारू नये, याबाबत निश्चित दिशा आणि धोरण नव्हते. वेगवेगळ्या राज्यांतील भाषाविषयक धोरण, शैक्षणिक आकृतिबंध, अभ्यासक्रम यामध्ये एकसमान असे सूत्रही नव्हते. कोठारी आयोगाने शिक्षणक्षेत्रात क्रांती घडवून आणली. पाठ्यपुस्तक मंडळाच्या स्थापनेपूर्वी शाळांमध्ये खासगी प्रकाशकांची पुस्तके वापरात होती. या पुस्तकाचा दर्जा, किमतीमधील तफावत, त्यांची उपलब्धता, शाळेत पुस्तक लावताना होणारे गैरव्यवहार या बाबींची दखल कोठारी आयोगाने घेतली. दर्जेदार आणि रास्त किमतीमधील पुस्तके मुलांना वेळेत मिळावी यासाठी राज्याने स्वायत्त संस्था निर्माण करावी अशी शिफारस करण्यात आली. शालेय पाठ्यपुस्तकांचे राष्ट्रीयीकरण झाले. कोठारी आयोगाच्या शिफारशीनुसार 27 जानेवारी 1967 रोजी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे या संस्थेची स्थापना झाली. याचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते 2 फेब्रुवारी 1967 रोजी झाले. मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष या नात्याने तत्कालीन शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी यांचे संस्था उभारणीत आणि मंडळाचे पहिले संचालक उत्तमराव सेवलेकर आणि पहिले नियंत्रक बापूराव नाईक यांचे संस्थेच्या प्रारंभीच्या वाटचालीत मोलाचे योगदान राहिले.
राज्यातील प्राथमिक स्तरावर शिक्षण घेणाऱ्या पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी भाषा व इतर सर्व विषयांची पाठ्यपुस्तके तयार करून वितरित करणे हे मंडळाचे मुख्य उद्दिष्ट आहे. मराठी बालभारती इयत्ता पहिली हे मंडळाचे पहिले पुस्तक 1968 मध्ये प्रकाशित झाले. आजपर्यंत बालभारतीच्या पाच माला प्रकाशित झाल्या असून २०१३ पासून सहाव्या मालेचे प्रकाशन सुरु आहे. आठ भाषा माध्यमातून सर्व विषयांची पाठ्यपुस्तके तयार करणारे मंडळ हे बालभारतीचे वैशिष्ट्य आहे. 1968 पासून पाठ्यपुस्तक मंडळ दर्जेदार, संस्कारक्षम आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी पाठ्यपुस्तके अल्प किमतीत उपलब्ध करून देत आहे. गेल्या पन्नास वर्षाच्या काळात नवीन शैक्षणिक विचारप्रणाली, कालसुसंगत शैक्षणिक धोरणे, नवीन अध्ययन- अध्यापन पद्धती अशा विविध बाबींचा विचार करून पुस्तकांच्या स्वरूपात, आशयात अनेक बदल करण्यात आले आहेत. कालानुरूप बदलाची ही प्रक्रिया आजही सुरु आहे.
संस्थेचे नाव महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ असे असले, तरी `बालभारती’ या नावाने प्रकाशित होणारी भाषेची पाठ्यपुस्तके अल्पावधीतच इतकी लोकप्रिय झाली, की मंडळ `बालभारती’ याच नावाने ओळखले जावू लागले. पाठ्यपुस्तक प्रकाशन क्षेत्रातील एक पायाभूत स्वायत्त संस्था असा मंडळाचा उल्लेख करावा लागेल. मंडळाने स्थापनेपासूनच संस्कारक्षम , आकर्षक व दर्जेदार पाठ्यपुस्तक तयार करण्याचे व्रत घेतले. अनेक अडचणींवर मात करून शिक्षण क्षेत्रातील पाठ्यपुस्तक प्रकाशनाचा पाया मजबूत केला. निव्वळ मुलांवरील प्रेमापोटी राज्यातल्या अनेक ख्यातनाम लेखक, कलावंत आणि विचारवंतानी बालभारतीच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले. कल्पना कार्यक्षमता व कर्तृत्व यांचा एक सुंदर त्रिवेणी संगम मंडळाच्या आजवरच्या प्रवासात दिसून येतो.
पाठ्यपुस्तक मंडळाची रचना
पाठ्यपुस्तक मंडळ हे राज्यशासनाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेली स्वायत्त संस्था आहे. राज्याचे शिक्षणमंत्री हे या संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. संस्थेचे सर्व धोरणात्मक निर्णय नियामक मंडळात घेतले जातात. पाठ्यपुस्तके तयार करण्याचे मुख्य काम विद्याविभागात चालते. विद्याविभागांतर्गत मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, सिंधी, तेलुगू, गुजराती या आठ भाषा आणि इतिहास, भूगोल, गणित, विज्ञान, कार्यानुभव, आरोग्य व शारीरिक शिक्षण असे एकूण 14 विभाग आहेत.
विषय समित्या
पाठ्यपुस्तके तयार करण्यासाठी विषयवार समित्या असतात. मंडळातील त्या त्या विषयाचे अधिकारी विषय समित्यांमध्ये सदस्य-सचिव म्हणून काम करतात. जुन्या अभ्यासक्रमाच्या जागी नवीन अभ्यासक्रम येऊन पाठ्यपुस्तके बदलली जात नाहीत, तोपर्यंत या समित्या कार्यरत असतात. पाठ्यपुस्तके तयार करणे ही जटील प्रक्रिया आहे. मुलांचा वयोगट, त्याचं भावविश्व, त्यांची आकलन क्षमता, मजकुराची काठिण्यपातळी या सर्व गोष्टी लक्षात घेऊन पाठ्यविषयांची निवड करणे आणि सोप्या भाषेत त्यांचे लेखन करणे हे एक प्रकारचे दिव्यच असते.
- नाविन्यपूर्ण उपक्रम
- एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तके :
राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करण्याच्या दृष्टीने शालेय वर्ष २०१९-२०२० मध्ये इयत्ता १ ली ते ७ वीची मराठी माध्यमाची पाठ्यपुस्तके एकात्मिक व द्विभाषिक पद्धतीने तयार करण्यात आली. या पुस्तकामधील सर्व विषयांचा अभ्यास हा तीन भागांमध्ये विभागण्यात आला. जेणेकरून विद्यार्थ्यांनी एकच भाग शाळेत नेऊन त्याचा अभ्यास करणे अपेक्षित होते. तसेच या पुस्तकांमधील गणित व विज्ञान या विषयांच्या संज्ञा व संकल्पनेमध्ये अधिक स्पष्टता येण्याच्या दृष्टीने या विषयाची पुस्तके
द्विभाषिक करण्यात आली. हा पथदर्शी प्रकल्प राज्यातील ६६ ब्लॉकमध्ये राबवण्यात आला होता. त्यामध्ये सुमारे ११ लाख विद्यार्थ्यांपर्यंत ही पाठ्यपुस्तके पोहचवण्यात आली. कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे अशा पद्धतीच्या पाठ्यपुस्तकांचा विद्यार्थ्यांना किती लाभ झाला याचे सर्वेक्षण करता न आल्यामुळे मागील वर्षी प्रकल्पाला मुदतवाढ देण्यात आली. या काळात बहुतांशी शाळा सुरु झाल्या व नंतर बंद झाल्या. या वर्षी म्हणजे शालेय वर्ष २०२२-२३ मध्ये या प्रकल्पाची व्याप्ती वाढवण्यात येऊन तो राज्यातील १०१ ब्लॉकमध्ये विस्तारित करण्यात आला.
- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मराठी व उर्दू माध्यमाच्या ४८८ शाळांची निवड करण्यात आली. या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके देण्याच्या दृष्टीने शालेय वर्ष २०२१-२२ मध्ये `सृजन बालभारती` या नावाने एकात्मिक पाठ्यपुस्तके पथदर्शी स्वरुपात तयार करण्यात आली होती. या पाठ्यपुस्तकांचे वाटप टप्प्याटप्प्याने या ४८८ शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना करण्यात आले व येत आहे. पाठ्यपुस्तकांच्या बाबतीत डायटचे शाळा संपर्क प्रमुखांनी या शाळांमधील शिक्षक, मुख्याध्यापक व विद्यार्थी तसेच घरी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहून त्यांना मार्गदर्शन केले. या पथदर्शी प्रकल्पाचे विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षणतज्ज्ञांनी मोठ्या प्रमाणावर कौतुक केले असून या शालेय वर्ष २०२२-२३ मध्ये ही पाठ्यपुस्तके समग्र शिक्षा योजनेअंतर्गत व खुल्या बाजारात विक्री करण्याचा प्रकल्प संपूर्ण राज्यात राबवण्यात येणार आहे. तसेच अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या विविध संघटनांनी मागणी केल्याने शालेय वर्ष २०२२-२३ पासून इयत्ता १ लीच्या उर्दू माध्यमामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याना एकात्मिक पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
- कोविड-१९ च्या काळात तसेच आजही इयत्ता १ ली ते १२ वीची सर्व माध्यमांची पाठ्यपुस्तके ही पीडीएफ स्वरूपात बालभारतीच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. गेल्या २ वर्षांत राज्यात या पाठ्यपुस्तकांच्या सुमारे ३ कोटी पेक्षाही जास्त पीडीएफ डाऊनलोड करून घेण्यात आलेल्या आहेत.
- CSR अंतर्गत Learning Logics या कंपनीच्या माध्यमातून बालभारतीच्या पाठ्यपुस्तकांची e-books तयार करण्यात आली असून मराठी माध्यमाच्या इयत्ता १ ली ते ८ वीच्या तसेच १० वीच्या विद्यार्थ्यांना e-books नाममात्र रु.५०/- रजिस्ट्रेशन फी भरून उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. तसेच इयत्ता ५ वीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यमातील e-books ही संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. उर्वरित माध्यमाची e-books तयार करण्याचे काम सुरु असून ती मार्च २०२२ अखेर उपलब्ध होतील.
अमराठी पुस्तके
राज्यात मराठी, हिंदी, इंग्रजीबरोबरच अमराठी माध्यमांच्या शाळांची संख्या लक्षणीय आहे. उर्दू, कन्नड, सिंधी, गुजराती, तेलुगू इत्यादी मातृभाषा असणारे अनेक अमराठी भाषक महाराष्ट्रात राहतात. त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारून शासनाने अमराठी माध्यमांच्या शाळा सुरू करण्यास राज्यात परवानगी दिली आहे. या मुलांसाठी त्यांच्या मातृभाषेतील पाठ्यपुस्तके तयार करण्याचे काम बालभारतीच करते. इतिहास, भूगोल, विज्ञान, गणित इत्यादी विषयांची पुस्तके मराठीतून तयार झाल्यानंतर ती अन्य अमराठी भाषांत अनुवादित केली जातात. हीच पुस्तके या शाळांमध्ये अभ्यासली जातात.
पाठ्येतर प्रकाशने
पाठ्यपुस्तकांची निर्मिती व वितरण हे पाठ्यपुस्तक मंडळाचे मुख्य कार्य असले, तरी मंडळाने शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी अन्य उपयुक्त साहित्याचीही निर्मिती केली आहे. आदर्श शिक्षकांची आत्मचरित्रे, उत्तम संस्कारकथा, ग्रामगीता, गांधीजींची आत्मकथा-माझे सत्याचे प्रयोग, कथा स्वातंत्र्याची, शिल्पकार स्वातंत्र्याचे, स्फूर्तिगीते, माहीत आहे का तुला?, मराठी शब्दार्थकोश, गोष्ट स्वातंत्र्यलढ्याची, बालगोष्टी, बालगीते इत्यादी पाठ्येतर प्रकाशनांना वाचकांचा उत्तम प्रतिसाद आहे.
किशोर (मुलांचे मासिक)
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीदिनी (१४ नोव्हेंबर १९७१ रोजी) ८ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी `किशोर’ हे मासिक मंडळाने सुरू केले. मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, अभ्यासक्रमाबाहेरचे ज्ञान मिळावे, त्यांच्या संवेदनशील मनावर उत्तम मूल्यांचे संस्कार व्हावेत ही उद्दिष्टे ठेवून किशोर मासिक चालवले जाते. गेल्या ५१ वर्षांत किशोर मासिकाने अनेक पिढ्यांवर वाचनाचे ज्ञान-विज्ञाचे व मूल्यांचे संस्कार केले आहेत. अनेक चित्रकार, कवी लेखक यांना मासिकाने घडवले आहे. ४० वर्षांतील किशोरमधील उत्तम निवडक साहित्य १४ खंडांत प्रकाशित झाले असून `५० किशोर गोष्टी` या पुस्तकाचा पहिला भाग प्रकाशित झाला आहे.
अद्ययावत ग्रंथालय
पाठ्यपुस्तकांची निर्मिती करताना अनेक संदर्भग्रंथांची आवश्यकता भासते. यासाठी बालभारतीने स्वतःचे समृद्ध असे ग्रंथालय विकसित केले आहे. अद्ययावत आणि अत्यंत दुर्मिळ असे अनेक संदर्भग्रंथ इथे उपलब्ध आहेत. बालभारतीत आठ भाषांमध्ये पाठ्यपुस्तके तयार होत असल्यामुळे ग्रंथायात आठही भाषांमधील विपुल ग्रंथसंपदा आहे. प्रतिवर्षी नवनवीन ग्रंथांची यात भर पडत असते. ग्रंथांबरोबरच आठ भाषांमधील व अन्य विदेशी भाषांमधील असंख्य नियतकालिकेही मागवली जातात.
संपूर्ण देशात बालभारतीची रचना आणि कार्यपद्धती आदर्शवत आहे.गुणवत्ता व दर्जा याबाबतीतसुद्धा मंडळाची पाठ्यपुस्तके मागे नाहीत. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर मंडळनिर्मित पाठ्यपुस्तकाची गणुवत्ता व दर्जा उत्कृष्ट असल्याबाबतची प्रमाणपत्रे मिळाली आहेत. किशोर या मासिकालाही भारत सरकारचे गुणवत्ता प्रमाणपत्र व मुद्रण स्पर्धेतील पारितोषिक प्राप्त झाले आहे. आजही देश-विदेशातील मंडळे बालभारतीला भेट देण्यासाठी येतात आणि येथील रचना आणि कार्यपद्धती त्यांच्याकडे सुरू करण्याच्या दृष्टीने विचार करतात, यातच बालभारतीचे यश दडलेले आहे.
बदलत्या काळानुसार आता बालभारतीही बदलते आहे.आधुनिक ज्ञान-तंत्रज्ञान यामुळे पारंपरिक पाठ्यपुस्तकांचे स्वरूप बदलण्यासाठी व नवी आव्हाने पेलण्यासाठी बालभारती आता सज्ज झाली आहे.
- किरण केंद्रे
संपादक, किशोर
बालभारती, पुणे
७३०३४२८५५५