रंगशारदा नाट्य मंदिरात ‘महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धा’; रसिकांसाठी विनामूल्य प्रवेश

मुंबई, दि. १५ : सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने ६३ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धा २०२४-२५ ची अंतिम फेरी मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. १७ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२५ या कालावधीत वांद्रे येथील रंगशारदा नाट्यगृहात ही स्पर्धा पार पडणार असून रसिकांना विनामूल्य प्रवेश असणार आहे.

महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार आणि मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.

या स्पर्धेत सादर होणारी ४५ नाटके रसिकांना विनामूल्य पाहता येतील. विनामुल्य प्रवेशिका श्री शिवाजी मंदीर, दादर येथे उपलब्ध आहेत.

महाराष्ट्र राज्यातील २३ केंद्रांवर आणि गोवा अशा एकूण २४ केंद्रांवर राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील प्रथम व द्वितीय पारितोषिक प्राप्त दर्जेदार नाटकांची अंतिम फेरीत निवड करण्यात आलेली आहे. अंतिम फेरीतील सर्व नाटके प्रेक्षकांना विनामुल्य पाहता येणार आहेत.

६३ व्या राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीतील पहिले नाटक ‘पंचमवेद’ हे १७ फेब्रुवारीला सायंकाळी ७.०० वाजता रंगशारदा नाट्यगृह येथे सादर होणार आहे. यानंतर दररोज सकाळी ११.३० वा. आणि सायंकाळी ७.०० वाजता नाटकांचे प्रयोग सादर होतील. या राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये सुमारे १२०० पेक्षा अधिक हौशी कलाकार आपली कला सादर करणार आहेत.

राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीमधील स्पर्धक संघाचे मनोधैर्य वाढवण्याकरीता, त्यांना शुभेच्छा देण्याकरीता आणि विविध विषयांवरची विविध अंगी नाटके पाहण्याकरिता जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी केले आहे.

000