धुळे, दिनांक 15 फेब्रुवारी, 2025 (जिमाका वृत्त) : सध्याच्या डिजिटील युगामध्ये नागरीकांचा वाचण्याकडे कल कमी होत चाललेला आहे. वाचनाने माणूस समृध्द होत असल्याने ही वाचन संस्कृती वाढविण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणे, त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.
राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, धुळे, ज्येष्ठांचे टोणगांवकर ग्रंथालय, दोंडाईचा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय धुळे ग्रंथोत्सवाचे उद्घाटन दादासाहेब रावल हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, दोंडाईचा येथे आज मान्यवरांच्या उपास्थितीत संपन्न झाले, यावेळी ते दूरदुष्यप्रणालीद्वारे देण्यात आलेल्या आपल्या शुभेच्छा संदेशात बोलत होते. या कार्यक्रमास खासदार डॉ. शोभाताई बच्छाव, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, 5 वे अखिल भारतीय अहिराणी साहित्य समेलनाचे अध्यक्ष सुभाष भामरे, उद्योगपती सरकारसाहेब रावल, माजी नगराध्यक्षा नयनकुंवरजी रावल, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, अपर तहसिलदार संभाजी पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी जगदीश पाटील, खान्देश साहित्य संघाचे अध्यक्ष डॉ. सदाशिव सुर्यवंशी, ज्येष्ठ साहित्यिक डॉ.संजीव गिरासे, ज्येष्ठ शाहीर लोककलावंत श्रावण वाणी, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गजानन कोटेवार, नाशिक विभागीय ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ.दत्ता परदेशी, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाहक अनिल सोनवणे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.रावल आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणाले की, धुळे ग्रंथोत्सव 2024 या कार्यक्रमाचा शुभारंभ आपल्या सगळ्यांचा साक्षीने पहिल्यांदा दोंडाईचा इथे होत आहे. वाचन संस्कृती ही पूर्वीपासून आपल्या देशामध्ये आहे. पूर्वीपासून वाचन, ज्ञान प्राप्त करणं आणि त्याच्या माध्यमातून जीवन जगणं ही भारतामध्ये हजारो वर्षांपासूनची परंपरा राहिलेली आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये आणि विशेषतः आता या मोबाईलच्या युगामध्ये वाचन संस्कृतीकडे लोकांचा कल कमी होत चाललेला आहे. परंतु जो वाचेल, तोच वाचेल या उक्तीप्रमाणे सर्वांनी वाचण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणं, लोकांना प्रोत्साहित करणं, लोकांची व्यवस्था करून देणं ही देखील आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांनी वाचनाकडे लहानपणापासूनच लक्ष दिले पाहिजे. त्यांना वाचनासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे असे सांगून ते म्हणाले की, येत्या काळात दोंडाईचा येथे एक मोठं वाचनालय उघडण्याचा प्रयत्न राहील.
खासदार डॉ. शोभा बच्छाव म्हणाल्या की, ग्रंथोत्सव म्हटलं म्हणजे सर्व अभ्यासकांसाठी ही एक पर्वणी असते. या दोन दिवसात याठिकाणी सर्वांना ज्ञानाचं भांडार उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी निश्चितपणे पुस्तकांचे वाचन केले पाहिजे. पुस्तकांच्या माध्यमातून निश्चितपणे स्फूर्ती निर्माण होते. त्यामुळे सर्वांनी ऐतिहासिक कथा, कादंबऱ्या, तसेच विविध साहित्य नियमित वाचले पाहिजे. वाचनाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना मार्गदर्शन होत असतं त्याचा देखील लाभ आपण निश्चितपणे घेतला पाहिजे. आपल्या ज्ञानातून प्रगल्भता आपल्याला जर वाढवायची असेल तर पुस्तक वाचले पाहिजे. आज युवकांमध्ये व्यसनाधीनता वाढत असतांना त्याला आळा घालायचा असेल तर तो पुस्तकांच्या माध्यमातून, ग्रंथांच्या माध्यमातूनच घालता येईल. ग्रंथाच्या माध्यमातून व्यक्तीमत्त्व विकास होतो, आपल्यात एक आत्मविश्वास निर्माण होतो आणि त्या माध्यमातून निश्चितपणे आपलं जे काही ध्येय आहे ते निश्चित करता येईल, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले की, समाजातील प्रश्न जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी नियमित वाचन करणे आवश्यक आहे. पुढील काळ अतिशय कठीण आहेत या पुढच्या कठीण दिवसांचा जर सामना करायचा असेल तर विद्यार्थ्यांनी नियमित वाचन करायला पाहिजे. विद्यार्थ्यांनी पुढील आयुष्यामधील उद्दिष्ट डोळयासमोर ठेवून आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून त्यात पुढे जाणे आवश्यक आहे. याकरीता नियमित वाचनाची सवय लावावी. या ठिकाणी अनेक पुस्तकांचे स्टॉल लावण्यात आले आहे. येथून प्रत्येकाने किमान एक तरी पुस्तक खरेदी करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
सरकारसाहेब रावल म्हणाले की, ग्रंथामध्ये खुप ताकद असल्याने विद्यार्थ्यांनी नियमित कथा, कांदबरीचे वाचन करणे आवश्यक आहे. त्यांनी यावेळी रामायण, महाभारतासह विविध ग्रंथाचे उदाहरण देऊन विद्यार्थ्यांना ग्रंथाचे महत्व समजावून सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष अहिरे म्हणाले की, धार्मिक कुंभमेळा प्रयागराज होत असतांना दोंडाईच्या नगरीत ग्रंथाचा उत्सव होत आहेत. याचे श्रेय पालकमंत्री श्री. रावल यांना जाते. जयकुमार रावल अहिराणी बोलतात, अहिराणी सांगतात आणि अहिराणी जपतात आणि गावाच्या मातीवर काळजापासून प्रेम करतात. म्हणून महाराष्ट्र शासनाचा ग्रंथोत्सव दोंडाईचा येथे घेऊन दोंडाईचा वासीयांसाठी ज्ञानाचे भांडार उपलब्ध करुन दिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रंथाशी मैत्री केली ते घटनाकार झाले, अबु्दल कलाम यांनी ग्रंथाशी मैत्री केली ते देशाचे देशाचे राष्ट्रपती झाले. जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनीही ग्रंथाशी मैत्री केली म्हणून ते जिल्हाधिकारी झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ग्रंथाची मैत्री सोडू नका, ग्रंथांसोबत आपले असलेल नाते तोडू नका. ग्रंथ हे माणसाला जगायला, वागायला शिकवतात असेही त्यांनी सांगितले.
यानंतर मान्यवरांच्या हस्ते पुस्तकांच्या स्टॉलचे उद्धटन संपन्न झाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मनिषा गुजराती तर अविनाश भदाणे यांनी आभार मानले. यावेळी स्वो.नि.संस्था सेक्रेटरी सी.एन.गिरासे, सचिव ललितसिह गिरासे, दादासाहेब रावल नॉलेज सिटीचे प्राचार्य के.डी.गिरासे. डी.आर.बी.ओ.डी.हायस्कुल चे प्राचार्य व्ही.बी. चौधरी, टोणगांवकर ग्रंथालयाचे अध्यक्ष डॉ.श्रीराम महाजन, गर्ल्स हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यायलयाच्या प्राचार्या एन.डी. गिरासे, यांच्यासह जिल्ह्यातील मान्यवर साहित्यिक, लेखक, साहित्यप्रेमी, कवि, कथाकथनकार, नागरीक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रंथोत्सवाचा शुभारंभ ग्रथदिंडीने राणीमॉसाहेब मनुपादेवी राऊळ, गर्ल्स हास्कुल व ज्युनिअर कॉलेज, दोंडाईचा येथुन माजी नगराध्यक्षा ताईसो नयनकुंवरजी रावल यांच्या हस्ते तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रंथपुजनाने झाला. या ग्रंथदिंडीत विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी टाळ, मृदृगांसह, लेझिम नृत्य सादर केले. ही ग्रंथदिंडी राणीमॉसाहेब मनुपादेवी राऊळ, गर्ल्स हास्कुल व ज्युनिअर कॉलेज, दोंडाईचा येथून शहिद अब्दुल हमीद चौक-छत्रपती शिवाजी महाराज पुतळा-नगरपालिका मार्गे, दादासाहेब रावल हायस्कुल, दोंडाईचा येथे पोहचली. या ग्रंथदिंडीत विद्यार्थ्यांसह संयोजन समितीचे सदस्य व विविध शाळा, महाविद्यालयांचे शिक्षक, नागरीक, साहित्यप्रेमी, ग्रंथप्रेमी सहभागी झाले होते.
याठिकाणी वाचनप्रेमींसाठी भव्य ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथ, साहित्य व वाड्.मय विषयक पुस्तके विक्रीसाठी स्टॉल लावण्यात आले आहे. हा ग्रंथोत्सवात सकाळी 10.00 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामुल्य प्रवेश राहणार आहे. या ग्रंथोत्सवाचा जिल्ह्यातील नागरिक, पत्रकार, विद्यार्थी, ग्रंथप्रेमी व साहित्य रसिकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन संयोजन समितीमार्फत करण्यात आले येत आहे.
ग्रंथोत्सवात आज होणारे कार्यक्रम
रविवार, 16 फेब्रुवारी, 2025 रोजी सकाळी 11 ते 12 वाजे दरम्यान ‘खान्देशातील अहिराणी साहित्याची वाटचाल’या विषयावर परिसंवाद कार्यक्रम होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजीव गिरासे, साहित्य समिक्षक डॉ. फुला बागुल, प्राध्यापक डॉ. रमेश माने यांचा सहभाग असणार आहे.
दुपारी 1 ते 2 वाजे दरम्यान ‘कथाकथन’चा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहिराणी कथाकार प्रविण माळी, साहित्यिक सुरेश मोरे यांचा सहभाग असणार आहे. दुपारी 2 ते 4 वाजे दरम्यान क-कवितेचा हा बहुभाषिक कवी संमेलनाचा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रभाकर शेळके असतील. ग्रंथोत्सव समारोपाचा कार्यक्रम सायंकाळी 4.30 ते 5.30 वाजता उद्योगपती सरकारसाहेब रावल यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.