पेठसह परिसर विकासासाठी सर्वंकष प्रयत्न करणार – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

नाशिक, दि. १५ (जिमाका वृत्तसेवा) : पेठसह परिसर विकासासाठी सर्वंकष प्रयत्न करण्यात येतील. त्याबरोबरच सर्व विभाग प्रमुखांनी सकारात्मक प्रतिसाद देत सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवाव्यात, असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन व विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले.
मंत्री श्री. झिरवाळ यांच्या विशेष प्रयत्नातून उंबरपाडा (माळेगाव) आदिवासी हुतात्मा स्मारक विकास कामे करण्याचे भूमिपूजन आज करण्यात आले. त्यानंतर ग्रुप ग्रामपंचायत (ता. पेठ) यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रमात मंत्री श्री. झिरवाळ बोलत होते. यावेळी खासदार भास्करराव भगरे, माळेगावचे सरपंच दिलीप राऊत, माजी आमदार धनराज महाले, भास्कर गावित, भिकाजी चौधरी, दिंडोरीचे उपविभागीय अधिकारी अप्पासाहेब शिंदे, तहसीलदार मुकेश कांबळे, पेठच्या तहसीलदार आशा गांगुर्डे, गटविकास अधिकारी जे. टी. सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. झिरवाळ म्हणाले की, पेठ परिसर औद्योगिक विकासाला पूरक आहे. या भागात औद्योगिक विकासाला चालना देण्यात येईल. या भागात पर्यटन विकासाची संधी आहे. त्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येतील. या भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी जोगमोडी परिसरात शैक्षणिक संकुल निर्मितीला प्राधान्य देण्यात येईल. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सर्व सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी विशेष अभियान राबविण्याच्या सूचना मंत्री श्री. झिरवाळ यांनी केली.
माजी आमदार श्री. महाले, श्री. गावित, श्री. चौधरी, गोपाळ देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.
हरिश्चंद्र देशमुख यांनी प्रास्ताविक केले. देवदत्त चौधरी यांनी परिचय करून दिला. तुषार भदाणे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी पेठ पंचायत समितीचे माजी सभापती भिवाजी महाले, सामाजिक कार्यकर्ते विठोबा भोये, रामभाऊ पगारे, यशवंत जाधव, गणपत पवार, मुजफ्फर खान, एकनाथ पाटील आदींचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
०००००