शासकीय योजना गुणवत्तापूर्ण राबवा – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

दिशा समितीच्या बैठकीत घेतला केंद्रीय योजनांचा आढावा

नागपूर, दि. १५ – केंद्र शासनाच्या सर्वसामान्यांसाठी विविध योजना आहेत. या योजना प्रभावीपणे व गुणवत्तापूर्ण राबवण्यात याव्यात, असे निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी जिल्ह्यातील संबंधित कार्यान्वयन यंत्रणेला आज दिले.

जिल्हा विकास समन्वय तथा संनियंत्रण समितीची (दिशा) बैठक केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. सदर येथील नियोजन भवनच्या सभागृहात झालेल्या या बैठकीला वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार कृपाल तुमाने, आमदार चरणसिंग ठाकूर, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर,  मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त आचल गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांच्यासह दिशा समितीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी नागपूर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या केंद्र सरकार पुरस्कृत योजनांचा आढावा मंत्री श्री. गडकरी यांनी घेतला.

केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी स्वच्छ भारत अभियान, सक्षम अंगणवाडी व पोषण, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, अमृत 1 व 2, प्रधानमंत्री आवास योजना, पाणी व कचरा व्यवस्थापन योजना, प्रधानमंत्री स्वानिधी योजना, प्रधानमंत्री आदिवासी ग्राम विकास योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, आयुष्मान भारत आदी योजनांचा आढावा घेतला. प्रधानमंत्री आवास योजना, रस्ते विकास योजना, अमृत योजना अशा अनेक योजना सर्वसामान्यासाठी आहेत. सरकारी योजना राबविण्यात हयगय करणारे अधिकारी अथवा कंत्राटदारांवर कारवाई करण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी यावेळी दिले

प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये गरिबांना घरे द्या, पण त्याचवेळी अवैधरित्या घरांचा ताबा घेणाऱ्या लोकांवर पोलिसांच्या सुरक्षेत कारवाई करावी. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचाही चुकीचे लोक लाभ घेत असतील तर त्यांच्यावर कारवाई करा, असेही श्री. गडकरी म्हणाले.

ग्रामीण भागातील कचरा व्यवस्थापन योजनेचा आढावा देखील त्यांनी घेतला. गावातून गोळा होणारा कचरा रस्त्याच्या कामात वापरता येईल का किंवा त्यातून कंपोस्ट खत तयार करता येईल का, याचा विचार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ग्रामीण भागात पाणीपुरवठा योजनेची 137 कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यावर योजनेची अंमलबजावणी करताना पाइपलाइन टाकण्यापूर्वी पाण्याचा स्रोत निश्चित करा, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्गात सिकलसेल, थॅलेसिमियाची मोठी समस्या आहे.  लोक सिकलसेल, थॅलेसिमियाने ग्रस्त आहेत. या आजारांवर नागपुरात उपचार व्हावा यासाठी आपण एम्समध्ये यंत्रणा तयार करीत आहोत. याच्या  अंमलबजावणीवर लक्ष द्यावे, अशा सूचना केंद्रीय मंत्री श्री.गडकरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.

रस्ते अपघातात जखमी झालेल्या रुग्णाला कुठल्याही रुग्णालयात उपचार घेण्यासाठी सरकार मदत करेल. ही योजना रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयातर्फे लागू करण्यात आली आहे. या योजनेची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी यावेळी दिले.