- ३ अ.भा.मराठी साहित्य संमलेनांच्या आयोजनासह ८ अध्यक्ष पदांचा मान,
- मराठीला अभिजात दर्जा मिळण्यासाठीही योगदान
- ८ साहित्य अकादमी पुरस्कार
९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २१, २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियम येथे संपन्न होत आहे. दिल्लीत होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षा डॉ.तारा भवाळकर असून त्या मराठी लोकसाहित्य, लोकसंस्कृती, लोकपरंपरा आणि लोककला या विषयांच्या अभ्यासिका असून त्यांनी स्त्री-जाणिवांना प्रखर प्रकाशात आणण्याचेही अमूल्य कार्य केले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार हे या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदाच्या भूमिकेत असणार आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील मराठी साहित्य आणि संमेलनातील योगदानासाठी असलेलं अतुट नातं विसरून चालणार नाही.
यापुर्वी ३ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे आयोजन
कोल्हापूरच्या साहित्यविश्वाचा आढावा घेतला तर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदापासून ते ग्रामीण साहित्य चळवळीच्या वाटचालीपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर कोल्हापूरचे योगदान नजरेत भरते. ग्रामीण भागात साहित्य संमेलनांचे आयोजन, वाचक घडविण्याच्या प्रक्रियेत आणि लेखकांच्या जडणघडणीतही कोल्हापूरचा वाटा मोठा आहे. आत्तापर्यंत तीन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने कोल्हापूर जिल्ह्यात झाली आहेत. यातील 18 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 1932 साली सयाजीराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झाले. त्यानंतर 1974 साली 50 वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन इचलकरंजी येथे पु.ल.देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. त्यानंतर 1992 सालचे 65 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोल्हापूर येथेच रमेश मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झाले. विनोदी लेखक, प्रवासवर्णनकार, कथाकार म्हणून मराठी साहित्यात स्वतःचे स्थान निर्माण करणारे रमेश मंत्री यांचे शिक्षण कोल्हापूरला झाले. एम.ए. करीत असतानाच त्यांनी पत्रकारितेत ‘सहसंपादक’ या नात्याने प्रवेश केला. रमेश मंत्री यांच्या नावावर १३० हून अधिक पुस्तके आहे.
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक वि. स. खांडेकर, प्रख्यात लेखक ना. सी. फडके, ‘रातवा’कार चंद्रकुमार नलगे, ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत, विनोदी लेखक शंकर पाटील, प्रा. रमेश मंत्री, आनंद यादव, शंकरराव खरात, सखा कलाल, ‘पानिपत’कार विश्वास पाटील, राजन गवस अशा दिग्गजांनी मराठी साहित्याला समृद्ध करण्यात मोलाचा वाटा उचलला. कोल्हापुरात ज्यांचे साहित्यविश्व फुलले, अशा आठ लेखकांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपद भूषविले आहे.
कोल्हापूर मधील मराठी साहित्यिक
कोल्हापूर जिल्ह्यातील वि. स. खांडेकर, ना.धों. महानोर यांच्यापासून ते अलीकडील काळातील कृष्णात खोत यांच्यापर्यंतचा प्रवास मराठी साहित्याला सुवर्ण झळाळी देणारा आहे. साहित्यातले तब्बल आठ मानाचे साहित्य अकादमी पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यातील साहित्यकांनी पटकाविले आहेत. वि. स. खांडेकरांनी मराठी भाषेतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवला होता. नवनाथ गोरे हे युवा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते आहेत. नामदेव धोंडी महानोर हे साहित्य अकादमी पुरस्कार विजेते रानकवी होते. त्यांच्या कविता आणि गाण्यांनी मराठी काव्य साहित्यावर विशेष ठसा निर्माण केला आहे. अगदी आजच्या काळातील ग्रामीण भाषेवर आधारीत रिंगाण या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक साहित्यिक यामध्ये कथाकार आप्पासाहेब खोत, बाबा परीट, कवी विनोद कांबळे, नीलेश शेळके, अनुवादक सुप्रिया वकील, सोनाली नवांगुळ यांचे योगदान चांगले आहे.
कोल्हापूर मधील साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक
१९६० साली वि. स. खांडेकर यांना ययाती साठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. १९६४ मध्ये रणजित देसाई यांना स्वामी साठी तर १९९० सालचा पुरस्कार आनंद यादव यांना झोंबी या लेखनासाठी मिळाला. १९९२ मध्ये विश्वास पाटील यांच्या झाडाझडतीला, २००१चा राजन गवस यांना तणकट साठी, २००७ चा गो. मा. पवार यांना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे (चरित्र) साठी, २०२१ चा किरण गुरव यांना बाळूच्या अवस्थंतराची डायरीसाठी तर अलीकडेच २०२३ मध्ये कृष्णात खोत यांच्या रिंगाण या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे.
कोल्हापूर मधील मराठी साहित्य विश्वातील दिग्गज
वसंत गोवारीकर हे भारतातील आघाडीचे शास्त्रज्ञ होते. त्यांच्या काळात भारताच्या पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार केले असून १९९४ ते २००० या काळात मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष होते. विज्ञानाचा प्रसार प्रामुख्याने मराठी भाषेतून करणे, विज्ञानाचा वापर करण्याच्या दृष्टीने मराठी भाषा समृद्ध करणे, लोकांमध्ये वैज्ञानिक साक्षरता वाढवणे आणि वैज्ञानिक दृष्टी विकसित करणे अशी प्रमुख उद्दिष्टे या संस्थेची होती. त्यानंतर कुसुमाग्रजनगरी, नाशिक येथे झालेल्या ९४व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे जयंत नारळीकर हे अध्यक्ष होते. जयंत नारळीकर यांच्या ‘चार नगरांतले माझे विश्व’ या मराठी आत्मचरित्राला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा २०१४ सालचा पुरस्कार मिळाला आहे. तसेच त्यांच्या ‘यक्षाची देणगी’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला असून त्यांनी अनेक विज्ञानकथा पुस्तकांचे लेखन केले आहे. झोंबी कार म्हणून ओळखले जाणारे आनंद यादव यांच्या ‘झोंबी’ या आत्मचरित्रपर कादंबरीमुळे त्यांची ओळख संपूर्ण देशाला झाली. ‘झोंबी’ला १९९० मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला. नांगरणी, घरभिंती, काचवेल, गोतावळा, नटरंग, झाडवाटा, उगवती मने यासह त्यांची अनेक पुस्तके लोकप्रिय झाली. ‘नटरंग’ या त्यांच्या कादंबरीवर काही वर्षांपूर्वी त्याच नावाचा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. ग्रामीण साहित्य, ग्रामसंस्कृती हे त्यांच्या आवडीचे विषय होते. ग्रामीण साहित्याला ओळख निर्माण करून देण्यात डॉ. यादव यांचा महत्त्वाचा वाटा होता.
मृत्युंजयकार शिवाजी सावंत ख्यातनाम मराठी कादंबरीकार आपणाला परिचित आहेतच. त्यांचे संपूर्ण नाव शिवाजी गोविंदराव सावंत. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा येथे झाला. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण आजऱ्यालाच झाले. प्रथम वर्ष बी. ए. पर्यंत शिक्षण घेऊन पुढे वाणिज्य शाखेतून पदविका घेतली. त्यानंतर कोल्हापूरच्या राजाराम प्रशालेत त्यांनी अध्यापन केले. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षणखात्याच्या लोकशिक्षण ह्या मासिकाचे संपादक म्हणून केले. ‘राजाराम प्रशाले’त अध्यापन करीत असतानाच त्यांनी मृत्युंजय (१९६७) ही पहिली कादंबरी लिहिली. सावंत यांना अनेक साहित्यपुरस्कार आणि सन्मान मिळाले. मृत्युंजयला महाराष्ट्र राज्य पुरस्कार (१९६७), न. चिं. केळकर पुरस्कार (१९७२), भारतीय ज्ञानपीठाचा ‘मूर्तिदेवी पुरस्कार’ (१९९५), फाय फाउंडेशन पुरस्कार (१९९६), आचार्य अत्रे विनोद विद्यापीठ पुरस्कार (१९९८). छावालाही महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला (१९८०) आहे. भारत सरकारच्या मानव संसाधन व सांस्कृतिक कार्यालयाकडून त्यांना ज्येष्ठ साहित्यिक शिष्यवृत्ती देण्यात आली होती.
विजय तेंडुलकर एक चतुरस्र लेखक, वृत्तपत्रव्यवसायी, लघुकथा लेखक, लघुनिबंधकार, अखिल भारतीय कीर्तीचे नाटककार, नव्या रंगभूमीचे प्रमुख आधारस्तंभ. त्यांचे शिक्षण मुंबई, पुणे आणि कोल्हापूर येथे झाले. त्यांच्या एकांकिका यात अजगर आणि गंधर्व, थीफ : पोलिस, रात्र आणि इतर एकांकिका समग्र एकांकिका (भाग १ ते ३) प्रसिद्ध आहेत. त्यांनी काचपात्रे, गाणे, तेंडुलकरांच्या निवडक कथा, द्वंद्व, फुलपाखरू, मेषपात्रे कथांचे लेखनही केले आहे. तेंडुलकरांनी पाटलाच्या पोरीचे लगीन , चिमणा बांधतो बंगला , चांभारचौकशीचे नाटक, मुलांसाठी तीन नाटिका इत्यादींसारखी काही बालनाट्येही लिहिली आहेत. तसेच अनुवादापर नाट्यलेखनही केलेले आहे.
रमेश मंत्री यांची बरीचशी प्रवासवर्णने व विनोदी पुस्तके आहेत. ‘थंडीचे दिवस’, ‘सुखाचे दिवस’, ‘नवरंग’ ही त्यांची वैशिष्ट्यपूर्ण प्रवासवर्णने आहेत. प्रांजळ, प्रसन्न, दिलखुलास लेखणीतून उतरलेली त्यांची प्रवासवर्णने वाचकांना त्या स्थळांच्या प्रत्यक्ष भेटीचा आनंद देतात. त्या वेळी अध्यक्षपदावरून सोडलेल्या संकल्पाच्या पूर्तीसाठी त्यांनी गावोगावी पुस्तकांची प्रदर्शने भरवली. त्यांनी लेखकांच्या भाषणांचे ९५ कार्यक्रम वर्षभरात घडवून आणले. ‘वाचन-संस्कृती’ वृद्धिंगत करण्याचे त्यांचे हे काम महत्त्वाचे होते.
कृष्णात खोत यांच्या लेखनकार्याविषयी
मूळचे कोल्हापूर येथील कृष्णात खोत हे पन्हाळा तालुक्यातील निकमवाडी येथील रहिवाशी आहेत. पन्हाळा विद्यामंदिर येथे त्यांचे शिक्षण झाले आहे. सध्या ते कळे येथील कनिष्ठ महाविद्यालयात शिकवितात. कृष्णात खोत यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रदेशसमूहनिष्ठ कादंबरी लेखनाने ‘कादंबरीकार म्हणून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. खोत यांनी मराठीत लक्षणीय ठराव्यात अशा कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या आहेत. ‘गावठाण’ (२००५), ‘रौंदाळा’ (२००८), ‘झड-झिंबड’ (२०१२), ‘धूळमाती’ (२०१४), ‘रिंगाण’ (२०१८) या त्यांच्या प्रकाशित कादंबऱ्या असून, या कादंबऱ्यांमधून बदलत्या ग्रामीण जीवनाचे वास्तव चित्रण केले आहे. याशिवाय ‘नांगरल्याविन भुई’ हे त्यांनी लिहिलेले ललित व्यक्तिचित्रण प्रकाशित झाले आहेत. गावसंस्कृती आणि बदलत्या खेड्यातील जीवनसंघर्ष त्यांच्या लिखाणाचा विषय आहे. त्यांना राज्यशासनासह अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत.
मराठीला अभिजात दर्जा मिळण्यासाठीही योगदान
ज्ञानेश्वर मुळे हे भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी व मराठी भाषेतील लेखक आहेत. मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य शासनाने एक समिती गठीत केली होती. त्यांचे माती, पंख आणि आकाश हे आत्मकथन प्रकाशित झाले आहे. शेतकरी परंपरा असलेल्या कुटुंबात अब्दुल लाट ता. शिरोळ येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण अब्दुल लाट, कोल्हापूरचे विद्यानिकेतन, शहाजी छत्रपती महाविद्यालय आणि शिवाजी विद्यापीठात झाले. मूळचे कवी असलेल्या मुळे यांचे जोनाकी, दूर राहिला गाव, रस्ताच वेगळा धरला, स्वतःतील अवकाश हे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. माणूस आणि मुक्काम, रशिया – नव्या दिशांचे आमंत्रण, ग्यानबाची मेख, नोकरशाईचे रंग ही त्यांची पुस्तकेही प्रसिद्ध आहेत. मुळे यांनी हिंदीमध्येही काव्यलेखन केले. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे २७ वे साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते.
संकलन – सचिन अडसूळ,
जिल्हा माहिती अधिकारी, कोल्हापूर