झाडी बोली : नवे संदर्भ

महाराष्ट्राच्या अतिपूर्व भागाला असलेल्या परिसरास ‘झाडीपट्टी’ असे संबोधले जाते. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या चार जिल्ह्यांचा झाडीपट्टीत समावेश होतो. या भागात जी बोली बोलली जाते, ती ‘झाडी बोली’ या नावाने ओळखली जाते. उपरोक्त चार जिल्ह्यांशिवाय नागपूर व मध्यप्रदेशातील रायपूर आणि छत्तीसगडमधील दुर्ग व आंध्रातील सीमावर्ती भागांचा ‘झाडी बोलीचा प्रदेश’ म्हणून समावेश करता येतो. झाडी बोलीतील शब्दांचा आढळ मुकुंदराजविरचित मराठीतील आद्य पद्यग्रंथ ‘विवेकसिंधू’ आणि म्हाइंभटसंपादित मराठीतील आद्य गद्यग्रंथ ‘लीळाचरित्र’ या बाराव्या शतकातील ग्रंथांमध्ये होतो.

झाडी बोली ही प्रमाण मराठीचीच बोली असून तिची काही वेगळी वैशिष्ट्ये आहेत. या बोलीत अनेक वर्ण आढळत नाहीत. येथे ‘ण्’ या व्यंजनाचा उच्चार ‘न्’ केला जातो. तसेच ‘छ्’, ‘श्’ आणि ‘ष्’ या तिघांचे कार्य एकटा ‘स्’ पार पाडतो. शिवाय ‘ज्’ आणि ‘झ्’ यांचा केवळ एकच उच्चार येथे प्रचलित आहे. ‘ड्’ या व्यंजनाचा उच्चार हिंदीप्रमाणे होतो.
या बोलीत नपुंसकलिंग आढळत नाही. केवळ पुल्लिंग व स्त्रीलिंग या दोन लिंगावरच तिचे कार्य चालते. त्यामुळे तिने स्वतःची वेगळी लिंगव्यवस्था स्वीकारली आहे. नामाच्या लिंगपरिवर्तनाच्या बाबतीत ‘उली’ हा लघुत्वदर्शक प्रत्यय लक्षवेधी ठरतो. उदा. कोटा-कोटुली, गाडा-गाडुली, ढिरा-ढिरुली, मारा-मारुली इत्यादी. विशेषांच्या बाबतीत ‘केवळ’ या अर्थी ‘टन’ हा परप्रत्यय वेगळा वाटतो. उदा. ‘पाच टन’, ‘दाहा टन’ असे ऐकायला मिळते.
क्रियापदांच्या अनेक वेगळ्या रचना झाडी बोलीत प्रचलित आहेत. ‘मारमूर करून’, ‘जाताजावालं’, असे अभ्यस्त प्रयोग या बोलीत आढळतात. तसेच ‘मी जावासीन ना मा मरावासीन’ असा प्रमाण मराठीत न आढळणारा ‘अर्थ’प्रकार झाडी बोलीत बोलला जातो. अभ्यस्त शब्दांच्या बाबतीत हा प्रयोग अधिक ऐकायला मिळतो. ‘खोलच खोल’, ‘जाताच जावाचा’, ‘मानसाच मानसा’ असे शब्दांच्या सर्व जातींमध्ये बोलले जाते.
प्रमाण मराठीत ‘सर’ या शब्दावरून ‘सर्रकन’ व ‘सरसर’ ही अन्य दोन क्रियाविशेष रूपे निर्माण होतात. झाडी बोलीतही ही प्रचलित असली तरी तेवढ्यांवर तिचे समाधान होत नाही. त्याशिवाय ‘सरना’, ‘सरनारी’ आणि ‘सरोसरो’ असे अन्य तीन पर्यायांचा उपयोग ती करते. तसेच ‘म्हणून’ या उभयान्वयी अव्ययाकरिता ‘मुहून’ हे रूप ती स्वीकारतेच, शिवाय ‘ मुहूनस्यान, ‘मुहूनस्यानी’ व ‘मुहूनस्यारी’ हे अन्य तीन पर्याय येथे उपयोगात आहेत. अशाप्रकारे झाडी बोली आपली शब्दसंख्या वृद्धिंगत करताना दिसते. याशिवाय नाम, विशेषण, क्रियापद आदींचे वेगळे प्रतिशब्द या बोलीने सिद्ध करून आपली शब्दश्रीमंती वाढविली आहे.

झाडी बोलीसंदर्भात अधिक माहितीकरिता डॉ. हरिश्चंद्र बोरकर लिखित पुढील ग्रंथ कृपया अवलोकन करावेत. १. ‘झाडी बोली : भाषा आणि अभ्यास’ (१९९८)
२. ‘झाडी बोली मराठी शब्दकोश’ (२०००)
३. ‘भाषिक भ्रमंती’ (२००८)
४. ‘अर्थपंचमी’ (२०१३)

डॉ. हरिश्चंद्र बोरकर
अध्यक्ष, झाडीबोली साहित्य मंडळ, साकोली
सदस्य, भाषा सल्लागार समिती, महाराष्ट्र राज्य
संपर्क : ९४२२८९०९३७