येत्या 21-22 व 23 फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीतील तालकटोरा मैदानावर 98 वें अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होवू घातले आहे. संमेलनाचे उद्धाटन पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याने या संमेलनाला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. या निमित्त दिल्लीकर मराठी भाषकांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत आहे. दिल्लीतील साहित्य वर्तुळात आनंद तर वाढलेला आहेच शिवाय हे संमेलन अनेक वर्षानंतर देशाच्या राजधानीत होत असल्याने समस्त मराठी भाषक जनतेसाठी ही एक आनंदाची पर्वनी ठरणार आहे. गेल्या वर्षी 96 वें अखिल भारतीय मराठी संमेलन महात्मा गांधी आणि विनोबा यांच्या कर्मभूमित घेण्यात आले होते. या वर्षी हे संमेलन दिल्लीत होत असल्याने वर्धा ते दिल्ली असा संमेलनाचा प्रवास वर्धेकर जनतेसाठी आनंद द्विगुणीत करणारा आहे. वर्धा आणि दिल्लीचा तसा संबंध स्वातंत्र चळवळी पासून राहिलेला आहे.
या चळवळीच्या दरम्यान महात्मा गांधी वर्धेत वास्तव्यास आल्याने अधिक जवळचा ठरला आहे. या काळात वर्धा शहर स्वातंत्र चळवळीचे एक महत्वाचे केंद्र ठरले. गांधीजींनी शेगावचे नामकरण सेवाग्राम केले आणि सेवाग्राम हे भारताची अशासकीय(नॉन पॉलिटिकल) राजधानी म्हणून ओळखले जावू लागले.
थानावरतयायानिमित्ताने दिल्लीतील राजकीय पुढारी यांची उपस्थिती वर्धेकर जनतेसाठी ऐतिहासिक महत्व अंकित करणारी ठरली, सोबतच साहित्य विश्वातही वर्धेचा नावलौकिक वाढला. स्वातंत्र मिळाल्यानंतर 48वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्धा येथे आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर तब्बल 76 वर्षानंतर हे संमेलन आयोजित करण्यात आले. दरम्यानच्या काळात साहित्य क्षेत्रात अनेक महत्वाच्या घटना घडल्या. वर्धेतील सत्यनारायण बजाज वाचनालय, राष्ट्रभाषा प्रचार समिती, आर्वी येथील लोकमान्य टिळक वाचनालय आणि वर्धेचे गांधी ज्ञान मंदिर साहित्य विश्वात प्रेरणा केंद्र राहिली. या केंद्रातून झालेले मंथन कवी व लेखक घडवण्यात कारणीभूत ठरले. नवकवी व नवलेखकांनी मराठी साहित्यात नाव कमावले व त्याची चर्चा दिल्लीत मानाने करण्यात आली. आता पर्यंत वर्धेत झालेले हे दुसरे संमेलन होते, तसेच राजधानीत होणाने यावर्षीचे संमेलन देखील दुसरे आहे. हा एक योगायोगच म्हणावा.
राज्याची उपराजधानी नागपूर येथे पहिले विश्व हिंदी संमेलन 10 ते 14 जानेवारी 1975 रोजी आयोजित करण्यात आले होते. यासाठी मराठी भाषक साहित्यिकांनीच पुढाकार घेतला होता. त्यातील एका ठरावातून वर्धा येथे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाची स्थापना झाली. एका अर्थाने संमेलनाचा किती प्रभाव असतो हेच यातून दिसते. वर्धा शहराची स्थापना तशी 1866 मध्ये झाली. ज्याचे नाव पालकवाडी असे होते व जिल्ह्याचे मुख्यालय पुलगाव जवळील कवठा या छोट्याशा गावात होते. त्यानंतर वरदायीनी वर्धा नदीच्या नावावर वर्धा असे नामकरण झाले.
वर्धा हे नाव ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक ऊर्जेचे शहर म्हणून ओळखले जाते. तसा उल्लेख अनेक ग्रंथांमध्ये व वर्धा जिल्हा गॅझेटियरमध्ये सापडतो. भाषिक दृष्टिकोनातूनही वर्धा जिल्हा एक समृद्ध जिल्हा राहिला आहे. हे शहर संस्कृत, प्राकृत, गोंडी, मराठी आणि हिंदी भाषेचे शहर म्हणून लौकिक प्राप्त झालेले आहे. इतिहासाच्या ओघात येथे भाषांचा विकास होत राहिला आणि काही भाषा कमी-अधिक संख्येने बोलल्या जाऊ लागल्या. वर्धा जिल्ह्यात भिली वा भिलोडी, इंग्रजी, गोंडी, गोरखाली वा नेपाळी, हलबी, खानदेशी, कोलामी, कोकणी, कोरकू व कोया अशा दहा भाषा बोलल्या जात होत्या, ज्यामध्ये मराठी प्रथम स्थानी तर हिंदी दुसऱ्या स्थानी राहिली आहे.
मराठी भाषेला आताच भारत सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. मराठी भाषेच्या प्राचीनत्वावर यामुळे मोहर उमटली आहे. मराठी भाषेचे चिरंतन साहित्य संत ज्ञानेश्वरापासून ते आजतागायत प्रवाहित होत आहे. चिरंतन साहित्याचे लक्षण संत ज्ञानेश्वरांनी सांगितले आहे. ‘वाचे बरवे कवित्व । कवित्वी बरवे रसिकत्व । रसिकत्वी परतत्व । स्पर्शु जैसा।। अर्थात भाषेमध्ये काव्य उत्तम. काव्याला रसामुळे बहर येतो आणि रसाला परतत्वाचा स्पर्श झाला म्हणजे मग त्याची गोडी काय वर्णावी. जीवनात क्रांती घडवून आणण्याची शक्ति फक्त आणि फक्त वाड्:मयात अशी महती आचार्य प्र. के. अत्रे यांनी वर्णीली आहे. समाज मनावर साहित्याचा परिणाम त्वरीत होत नाही. सतत सूक्ष्म संस्कार होत राहिल्याने समाजात बदल घडत असतो. साहित्य संमेलनातून असे बदल घडत असतात आणि हेच बदल देश आणि समाजात सकारात्मक परिणाम घडवत असतात. लिखान आणि वाचनातून माणसात जी प्रगल्भता येते ती निरंतर पुढच्या पिढीकडे प्रवाहित होत असते आणि त्याचा लाभ समाजाला होत असतो.
देशाच्या राजधानीत होणारे संमेलन अनेकार्थाने विशेष ठरणारे आहे. येथे अनेक लहान-मोठया संस्था मराठीची पताका फडकवित असतात. महाराष्ट्र सदन असो की बृहंमहाराष्ट्र मंडळ असो येथे साहित्यिक व सांस्कृतिक मेळावे, कार्यक्रम व शिबिरे सतत चालू असतात. यातून दिल्लीकरांना मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीची मेजवाणीच मिळत असते. येथे मोठ्या संख्येने मराठी भाषा बोलणारे असल्याने त्यांना अशा कार्यक्रमांची सतत ओढ लागलेली असते. दिल्लीत मराठी, हिंदी व इतर भारतीय भाषा एक समूह म्हणून किंवा सवंगडी म्हणून वावरत असतात. येथे असणारे मराठी भाषी नागरिक नोकरी व व्यवसायासाठी आलेले असतात परंतु त्यांनाही साहित्याची भूक असते ती ते साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनातून भागवत असतात.
दिल्लीतल्या प्रत्येक मराठी भाषकांसाठी हे संमेलन आपले वाटणारे यामुळेच ठरणार आहे व त्याचे पडसाद देशभरात उमटणार आहे. संमेलनाचा वर्धा ते दिल्ली हा एका वर्षाचा प्रवास साहित्याच्या क्षेत्रातील अनेक प्रकारांना मार्ग तर मोकळा करणारच आहे, तो अधिक प्रशस्तही करणारा ठरणार आहे. हे संमेलन राराची ाचा प्रवास सन 1878 पासुन मराठी भाषा व साहित्याला एक नवी झळाळी तसेच नव्या वाटा देणारे ठरो हिच रास्त अपेक्षा. या संमेलनातून दिल्लीत मराठीची मुद्रा नक्कीच देशपातळीवर उमटणार हेही तितकेच खरे.
- बी.एस. मिरगे
जनसंपर्क अधिकारी
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा
9960562305