आज आपण बोलत असलेली मराठी ही अनेक स्थित्यांतरे आणि उत्क्रांतीनंतर तयार झालेली समृद्ध भाषा आहे. अशा या समृद्ध साहित्य परंपरा लाभलेल्या मराठी भाषेस केंद्र शासनाने ऑगस्ट २०२४ मध्ये अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. आसा दर्जा प्राप्त झाल्यानंतर प्रथमच नवी दिल्ली येथे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्यानिमित्ताने मराठी साहित्याचा पाया असणाऱ्या महानुभाव पंथाच्या साहित्याचा घेतलेला हा धांडोळा. आजच्या आपल्या मराठीच्या विकासामध्ये किंबहुना आज वापरात असलेल्या मराठीला आकार देण्याचे महत्वाचे काम केले ते महानुभाव पंथाने, या पंथाच्या साहित्यातील लीळाचरित्र हा चक्रधर स्वामींच्या लीळांवर आधारित ग्रंथ मराठीतील आद्य ग्रंथ म्हणावा लागेल. मराठीच्या विकासात महानुभव पंथाच्या योगदानावर टाकलेला हा प्रकाश.*
महाराष्ट्र आणि मराठी विषयी – मराठी भाषेची उत्पत्ती प्राकृतात असल्याचे सर्वश्रृत आहे. प्राकृत भाषेत लिहला गेलेला ‘गाथा सप्तशती’ हा आद्य: ग्रंथ आणि यातील भाषा ही अस्सल महाराष्ट्राची, गोदावरी खोऱ्यातील आहे. महाराष्ट्र प्रदेशावर साडेचारशे वर्ष राज्य करणाऱ्या सातवाहन कुलातील राजा हाल यांने हा ग्रंथ लिहला. मराठीतील पहिला शिलालेख हा कर्नाटकातील श्रवणबेळगोळा येथील “श्री चावुण्ड राये करवियले श्री गंगराये सुत्ताले करवियले” हा आहे. तर रायगड जिल्ह्यातील अलिबाग जवळील आक्षी येथे सापडलेला शिलालेख मराठीतील पहिला शिलालेख असल्याचे डॉ शं.गो.तुळपुळे म्हणतात. त्याही आधी ‘धर्मोपदेशमाला’ (इ.स. ८५९) या ग्रंथात मराठी भाषेचा उल्लेख आहे. “सललयि-पय-संचारा पयडियमाणा सुवण्णरयणेल्ला ! मरहठ्य भासा कामिणी य अडवीय रेहंती !!” असे मराठीचे वर्णन येते. सहाव्या शतकातील वराह मिहीरच्या बृहत्दसंहितेत महाराष्ट्र देशाचा उल्लेख पहावयास मिळतो. तर महाराष्ट्राचा स्पष्ट उल्लेख महानुभव लेखक डिंबकृष्णमुनी यांनी केल आहे. ‘विंध्याद्रीपासौनि दक्षिणदिशेसी।कृष्णनदीपासौनि उत्तरेसी।। झाडीमंडळापासौनि पश्चिमेसि । महाराष्ट्र बोलिजे ।।’ असा महाराष्ट्र प्रदेश असल्याचे ते सांगतात. याशिवाय मराठीच्या वापराची उदाहरणे आपल्याला दिवे आगर, पंढरपूर येथील ताम्रपटातून पहावयास मिळतात.
यादव काळात मराठीला राजभाषेचा दर्जा प्राप्त झाला. या राजभाषेचा विकास करण्याचे कार्य महानुभाव पंथातील अनेकांनी केले. श्री गोविंदप्रभू, भटोबास, केसोबा, डिंबकुष्णमुनी यांनी मराठीला आकार दिला. पंथियांच्या अनेक साहित्यातून मराठी समृद्ध होत गेली. त्यामध्ये म्हाईंभटांचे लीळाचरित्र, गोविंदप्रभूचरित्र किंवा ऋद्धिपूरचरित्र, केशिराजबास यांचे दृष्टांतपाठ, सिद्धांतसूत्रपाठ, बाईदेवबास यांचे पूजावासर, नरेंद्रस्वामी यांचे रुक्मिणीस्वयंवर, भास्करभट्ट यांचे शिशुपाळवध, उद्धवगीता, दामोरदपंडित यांचे वच्छाहरण, रवळोबास यांचे सह्याद्री महात्म्य, नारो बहाळिये यांचे ऋद्धिपूरवर्णन, विश्वनाथ पंडित यांचे ज्ञानप्रबोध, यासह स्थानपोथी, वृद्धाचार, मार्गरुढी, चरित्र अबाब, महदबेचे धवळे अशा ग्रंथांचा समावेश आहे.
सांकेतीक लिपीचा वापर – महानुभाव साहित्याचे एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सांकेतीक लिपीचा वापर. या वापरामुळेच अनेक वर्ष हे साहित्य सामान्यांपासून लांब राहिले. पण, याचमुळे हे सर्व साहित्य आहे त्या स्थितीत आज आपल्याला उपलब्ध झाले. यादव काळात १२ व्या शतकात महानुभाव पंथ उदयास आला. पंथियांना मार्गदर्शन करण्यासाठी साहित्याची निर्मिती केली. या साहित्यातूनच अधुनिक मराठीला आकार मिळत गेला. यानंतरच्या काळात वारकरी सांप्रदायांने मराठी अधिक समृद्ध केली.
महानुभाव सांप्रदायाने महाराष्ट्राला दिलेल्या अनेक देणग्यांपैकी एक म्हणजे समृद्ध साहित्य. पंथियांच्या या साहित्यामध्ये सर्वप्रथम उल्लेख करावा लागेल असा ग्रंथ म्हणले स्थानपोथी. चक्रधरस्वामींनी महाराष्ट्रात ज्या ठिकाणी भ्रमण केले त्याची भौगोलिक माहिती देणारा ग्रंथ म्हणजे स्थानपोथी. चक्रधरस्वामींनी भेटी दिलेल्या ठिकाणी पंथियांनी ओटे बांधले आहेत. त्यामुळे आजही आपणास स्थानपोथीतील गावांची, नगरांची माहिती मिळते. यातील अनेक गावे, नगरे आजही अस्तित्वात आहेत. त्यामुळे यादवकालीन महाराष्ट्र समजून घेताना स्थानपोथीचे महत्व अनन्यसाधारण आहे. एकूणच या ग्रंथाच्या माध्यमातून आपणास यादवकाळातील महाराष्ट्राचा भूगोल, संस्कृती, जीवनपद्धती, ग्रामरचना, खाद्य संस्कृती, व्यवहार, प्रशासन, घर बांधणी, व्यापार व व्यवसाय याविषयी सविस्तर माहिती मिळते. त्याकाळच्या महाराष्ट्राचे समग्र दर्शन घडवणारा उत्कृष्ट असा दुसरा ग्रंथ नाही.
लीळाचरित्र मराठीतील पहिला गद्य चरित्रग्रंथ – महानुभाव पंथांचे संस्थापक चक्रधरस्वामी त्यांच्याविषयीच्या आख्यायिकांच्या संग्रहाला लीळाचरित्र असे नाव आहे. महींद्रबास ऊर्फ म्हाईंभट यांनी नागदेवाचार्यांच्या मदतीने चक्रधरांच्या लीळा संकलित केल्या. याचा रचनाकाल सन ११७८ च्या आसपासचा आहे. तत्कालीन राजकीय, सामाजिक व धार्मिक जीवनाचे मार्मिक चित्रण लीळाचरित्रातून आले आहे. लीळाचरित्राची भाषा म्हणजे यादवकालीन मराठी गद्याच्या समृद्धतेचा उत्तम नमुनाच होय. छोटी छोटी अर्थपूर्ण वाक्ये, अलंकृत साधेपणा हे तिचे विशेष होत. त्यावेळचे खाद्यपदार्थ, वस्त्र, चालीरिती, करमणुकीचे प्रकार, कायदे, सामाजिक सुरक्षा, सण, उत्सव इत्यादी सामाजिक जीवनाच्या दृष्टीने उपयुक्त असे अनेक उल्लेख या चरित्रग्रंथातून आले असल्यामुळे तत्कालीन समाजजीवनाच्या व धार्मिक जीवनाच्या दृष्टीने हा ग्रंथ महत्त्वाचा आहे. चक्रधरांच्या काळातील वाक्प्रचार, म्हणी यांचा उपयोग करून भाषेला सजविण्याचा प्रयत्न म्हाईंभटांनी केला आहे. साधी, सरळ, सोपी पण आलंकारिक भाषा हे या चरित्रग्रंथाचे वैशिष्ट्य.
ऋद्धिपूरलीळा उर्फ गोविंदप्रभूचरित्र – ऋद्धिपूरचे चक्रधरांचे गुरू गोविंदप्रभू उर्फ गुंडमराउळ यांनी समाधी घेतल्यानंतर त्यांच्या आठवणी म्हाइंभटाने गोळा केल्या व त्यातून ऋद्धिपूरलीळा उर्फ गोविंदप्रभूचरित्र हा ग्रंथ सिद्ध केला. याचा रचना काळ इ.स. १२८८ आहे. प्राचीन वऱ्हाडी भाषेच्या अभ्यासासाठी हा एक उपयुक्त साधन ग्रंथ आहे. गडू = तांब्या, हारा = टोपली, हेल = पाणी भरण्याचे मडके, पोपट / पावटे = उकडलेल्या तुरीच्या शेंगा, गीदरी, उकड = नीट न बसलेला, कोनटा = कोपरा असे शब्द या ग्रंथात भेटतात.
मराठीतील पहिला कथासंग्रह दृष्टांतपाठ – दृष्टांत म्हणजे छोटीशी बोधकथा होय. प्रत्येक दृष्टांत स्वतंत्र, रोचक आहे. विचारप्रतिपादन, तत्त्वज्ञान, मांडणी, भाषाशैली आणि समाजजीवनाचे निरीक्षण या सर्वच गोष्टींनी हा ग्रंथ अपूर्व आहे. चक्रधरांचे तत्त्वज्ञान विद्वानांना रुचेल अशा मराठीतून मांडणे व अध्यात्मासारखे शास्त्र पेलण्यास समर्थ अशी शब्दसंपत्ती मराठीत रूढ करणे हे केशिराजाचे मोठे कार्य. दृष्टांतपाठ हा फक्त तत्त्वज्ञानाचा ग्रंथ नाही तर मराठीतील लोककथांचे पहिले संकलन आहे. खरे तर ‘म्हातारिया’ना तो सोप्या भाषेतील अज्ञानमुंचन करणारा ज्ञानग्रंथ आहे.
रुक्मिणीस्वयंवर – नरेंद्रस्वामींनी लिहलेला हा ग्रंथ म्हणजे मराठीतील पहिले शृंगारिक आख्यानकाव्य. काव्यदृष्ट्या व कालदृष्ट्या साती ग्रंथांमधील पहिल्या क्रमांकाचा ग्रंथ. हे भक्तीतून उमललेले विदग्ध काव्य आहे. ज्या यादवकाळात रुक्मिणीस्वयंवर लिहिले गेले त्या काळात मराठी वाङ्मयाच्या भावसृष्टीवर श्रीकृष्णाच्या भक्तीचे अधिराज्य होते. या काव्याची रचना संस्कृतमधील महाकाव्यांच्या धर्तीवर आहे. वर्णनाची विपुलता व कथानकाची मंदगती यांचा प्रत्यय येतो. रुक्मिणीस्वयंवराच्या कथेवर अनेकांनी रचना केली पण नरेंद्राची सर कुणालाच आली नाही. खरीखुरी कलावंताची दृष्टी असणारा नरेंद्र हा मराठीतील पहिला कवी आहे.
शिशुपालवध – महानुभावांच्या साती ग्रंथांपैकी एक. याचा कर्ता भास्करभट्ट बोरीकर आहे. रुक्मिणी-श्रीकृष्ण यांच्या चित्रणासोबतच शिशुपाळवधाचे चित्रण या ग्रंथात आहे. विरक्ती व भक्तीपेक्षा शृंगाराचे चित्रण या ग्रंथात अधिक आढळते. या ग्रंथाविषयी बाईदेवबास म्हणतात “भटो ग्रंथु निका जाला : परि निवृताजोगा नव्हेचि” (ग्रंथ तर उत्तम झाला आहे पण निवृत्तीमार्गासाठी उपयुक्त नाही!) बाइदेवबासांचे हे उद्गार मराठी समीक्षेचे पहिले वाक्य ठरते.
उद्धवगीता – महानुभावांच्या साती ग्रंथांपैकी एक. याचा कर्ता भास्करभट्ट बोरीकर. भागवताच्या एकादशस्कंधावरील मराठीतील ही पहिली टीका ठरते.
वच्छाहरण – महानुभावांच्या साती ग्रंथांपैकी एक. कर्ता दामोदर पंडित. दामोदरपंडिताचा कवित्वाचा विलास वृंदावनवर्णन, यमुनावर्णन, श्रीकृष्णमूर्तीवर्णन यांमधून प्रकर्षाने जाणवतो. श्रीकृष्णवर्णन आणि पंथाच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार हे दुहेरी कार्य दामोदरांनी साधले आहे.
सैह्याद्री-माहात्म्य किंवा सैह्याद्रवर्णन – सैह्याद्री-माहात्म्य किंवा सैह्याद्रवर्णन हा महानुभावांच्या साती ग्रंथांपैकी एक. याचा कर्ता रवळोबास आहे. मूळ ग्रंथ शके १२५४ ते १२७५ यादरम्यान केव्हातरी लिहिला गेला असावा. सैह्याद्रवर्णन काव्यातील सह्याद्री म्हणजे माहूरचा डोंगर. पश्चिम घाटावरील सह्याद्री डोंगराशी या काव्यातील सह्याद्रीचा काही संबंध नाही. सैह्यादी-माहात्म्य हे काव्य, कवीचे वर्णनचातुर्य, त्याची प्रतिभासृष्टी आणि काव्यातला रसाविष्कार या दृष्टीने वाचले तर, रवळोबास हे एक एक प्रतिभावंत कवी होते असे प्रत्ययास येते.
ज्ञानप्रबोध – महानुभावांच्या साती ग्रंथांपैकी एक. याचा कर्ता विश्वनाथ. काव्य व तत्त्वज्ञान यांचा संगम; वैराग्याची व भक्तीची शिकवण या ग्रंथात आहे.
अशा वैविध्यपूर्ण ग्रंथाच्या लिखाणातून पंथियांनी मराठीचे साहित्यविश्व प्राचीनकाळी समृद्ध केले आहे. त्यांच्या या साहित्याचा वारसा पुढील काळात संत ज्ञानेश्वरांनी पुढे नेला. संत ज्ञानेश्वर माऊलींचा भावार्थदीपिका, अमृतानुभव, चांगदेवपासष्टी अशा ग्रंथांनी मराठी भाषेतील साहित्याला वेगळ्या उंचीवर नेले. तर त्यानंतर संत नामदेव, संत तुकाराम महाराज यांनी केलेल्या रचनांनी भक्तीची परंपरा जनसामान्यांपर्यंत पाझरवण्याचे काम केले.
अशा या समृद्ध मराठीभाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. ही प्रत्येक मराठी माणसासाठी नक्कीच अभिमानाची बाब आहे.
हेमंतकुमार चव्हाण,
विभागीय संपर्क अधिकारी
0000