माऊली ज्ञानेश्वरांनी ‘अमृतातेही पैजासी जिंके’ ही दिलेली ग्वाही त्यांच्या ७५० व्या जयंती वर्षात आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षात सिद्ध झाली. मराठीचा भाषिक प्रवास प्राचीन महारठ्ठी भाषा, मरहठ्ठी, महाराष्ट्री प्राकृत,अपभ्रंश मराठी,आजची मराठी असा झाला आहे. या भाषा वेगवेगळ्या नसून ती रूपे मराठी या एकाच भाषेची आहेत. मराठी भाषेला २००० वर्षांपेक्षा जास्त समृद्ध अशा साहित्याची परंपरा आहे.या भाषेचे प्राचीनत्व ठरवताना- १) शक ६०२ च्या ताम्रपटातील पन्न्नास, प्रिथिवी हे शब्द. २) शके ७०० चा उद्योतनसुरीने लिहिलेल्या ‘कुवलयमाला’ या ग्रंथात अठरा देशी भाषांचा उल्लेख आला आहे.त्यात मराठी माणसांचे वैशिष्ट्य व त्यांच्या भाषेतील ठळक अशी लकब सांगताना मराठी लोक दिण्णले,गहिल्ले असे उच्चार करतात,असे सांगितले आहे. ३) शके ९६१ च्या सुमारास ‘ज्योतिष रत्नमाला’ श्रीपतींनी रचला. ४)’गाथा सप्तशती’ हा ग्रंथ दुसऱ्या शतकातील सतरावा सातवाहन राजा व कवी हाल याने लिहिला. ५) महाकवी गुणाढ्य यांनी ‘बृहत्कथा’ हे महाकाव्य पैशाची भाषेत सांगितले.सोमदेवने संस्कृत अनुवाद केला, तर ह.अ.भावे यांनी मराठीत पाच खंडात ‘कथासरित्सागर’ रूपात ते आणले.रामायण,महाभारत या दोन महाकाव्यानंतर दोन हजार वर्षांपूर्वीचे हे तिसरे महाकाव्य म्हणावे लागेल.
‘विवेकसिंधू‘ : पहिला ओवीबद्ध ग्रंथ
‘लीळाचरित्र’, ‘ज्ञानेश्वरी’, ‘विवेकसिंधू’हे ग्रंथ मराठी प्रगल्भ व श्रीमंत झाल्यानंतरचे ग्रंथ आहेत. ‘लीळाचरित्र’, ‘ज्ञानेश्वरी’ या ग्रंथांना युनोने अभिजात ग्रंथांचा दर्जा दिलेला आहे. इ.स.११८८ मधील ‘विवेकसिंधू’ हा मुकुंदराजांचा ग्रंथ मराठीतील पहिला ओवीबद्ध ग्रंथ. तेराव्या शतकापासून सतराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत महानुभाव सांप्रदायिकांनी सातत्याने वाङ्मयनिर्मिती केलेली दिसते. महाराष्ट्र संस्कृती आणि मराठी वाङ्मययात त्यांनी मोलाची भर घातली.
‘लीळाचरित्र’ : पहिला चरित्रग्रंथ
तेरावे शतक हे मराठी वाङ्मयनिर्मितीचा प्रारंभिक काळ. परिपक्वता, प्रौढता, पारमार्थिकता या गुणांनी युक्त. मराठीतील पहिला चरित्रग्रंथ म्हणून ‘लीळाचरित्रा’ला अनन्यसाधारण महत्व आहे. महानुभाव संप्रदायातील साहित्यिकांनी निर्माण केलेल्या साहित्याची विपुलता आणि वैविध्यता ही वैशिष्ट्ये आहेत. त्यांनी आख्यानक काव्ये, भाष्ये-महाभाष्ये, सूत्रबद्ध व्याकरण, भावगीतात्मक स्वयंवरकथा, गीताटीका, स्थळवर्णने, आरत्या, पदे, भारुडे, स्तोत्रे, प्रवासवर्णन, चरित्र, टीका, विदग्ध कथाकाव्ये, टीपा अशा विविध साहित्यप्रकांरातून लेखन केलेले दिसते.
मराठीत आज अस्तित्वात असलेल्या अनेक वाङ्मयप्रकारांचा उगम महानुभाव साहित्यात शोधता येतो. संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला आणि मराठी भाषेत गीतार्थाचे सुंदर व प्रत्ययकारी निरुपण केले. सर्व समाजाला प्रेमाचा, समतेचा आणि भक्तिभावाचा उपदेश गीताटिकेच्या द्वारा करण्याचा उपक्रम ज्ञानेश्वरांनी केला.मराठी जन आणि मराठी मन घडवणारा पहिला क्रांतिकारी नेता ज्ञानदेव होय. मौलिक स्वरूपाचे तत्त्वज्ञान आणि अव्वल दर्जाचे काव्य या दोहोंचा मनोहर संगम तत्कालीन दुसऱ्या कोणत्याही भाषेत आढळणार नाही. महाराष्ट्रात दत्तभक्तीचा प्रसार मुख्यतः इस.१५५८ मध्ये लिहिलेल्या सरस्वती गंगाधर यांच्या ‘गुरुचरित्रा’ने केला. दासोपंतांचा ‘गीतार्णव’ यासारखा सव्वा लाख ओवीसंख्या असलेला प्रचंड ग्रंथ मराठीत दुसरा नाही.
‘तुका झालासे कळस‘
एकनाथ हे सांस्कृतिक पुनरुत्थानाचे सर्वश्रेष्ठ प्रतिनिधी होत. ची वाङ्मयसेवा बहुविध आहे. त्यांचे ‘एकनाथी भागवत’ आणि ‘भावार्थ रामायण’ हे महत्त्वपूर्ण ग्रंथ. देशकालपरिस्थितीनुसार अगदी योग्य वेळी,एका विशिष्ट हेतूने ही रामकथा त्या वेळच्या लोकांपुढे त्यांनी ठेवली. हा हेतू राष्ट्रीय स्वरूपाचा आहे. ज्ञानेशादिकांनी सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणून ठेवलेले तत्त्वज्ञान अभ्यासून, पचवून, जीवनाच्या झगड्यात प्रत्यक्ष अनुभवून, लोकांना उपदेश करण्याची पात्रता संत तुकारामांनी सिद्ध केली. यामुळेच ‘तुका झालासे कळस’ हे त्यांच्या संबंधीचे उद्गार सार्थ ठरले आहेत. एकनाथ-तुकारामांच्या काळात आणि त्यानंतरही मुसलमान संतांनी जी मराठीची सेवा केली ती उपेक्षणीय नाही. शहा मुंतोजी ब्रह्मणी यांचा ‘सिद्धसंकेतप्रबंध’ हा दोन हजार ओव्यांचा सर्वात मोठा ग्रंथ. यानंतर अंबर हुसेन, शेख सुलतान, शेख महंमद, शहामुनी इत्यादी संतांनी यात महत्त्वाचे योगदान दिले.
कलात्मकदृष्टीने कथा निवेदन करणे हा विशेष मुक्तेश्वर यांच्या काव्यात दिसतो. त्यांची एकूण कविता १७००० इतकी भरेल.शिवकालीन प्रवृत्तीची आणि आकांक्षांशी पूर्णतः समरस झालेले संत कवी रामदास त्यांचा ‘दासबोध’,’ मनाचे श्लोक’,’रामायण’ ही रचना. वामन पंडित-‘यथार्थदीपिका’, मोरोपंत-‘केकावली’, रघुनाथ पंडित-‘दमयंती स्वयंवर’, सामराज-‘रुक्मिणी स्वयंवर’, कृष्णदयार्णव-‘हरिवरदा’, श्रीधर- ‘हरिविजय’, ‘पांडवप्रताप’,’वेदांतसूर्य’ या पंत साहित्यातील महत्वाच्या रचना.
सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात गद्यलेखनाला बहर
शाहिरी वाङ्मयात होनाजी बाळा, सगनभाऊ, प्रभाकर, परशराम, रामजोशी, अनंतफंदी यांच्या लावण्या आणि पोवाड्यांनी अस्सल मराठमोळ्या जीवनाचे दर्शन घडविले. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात मराठीत गद्यलेखनाला बहर आला. बखर वाङ्मय हे महाराष्ट्र सारस्वताचे एक विलोभनीय लेणे आहे. बखर वाङ्मयातून धर्मनिष्ठा, राष्ट्रनिष्ठा, उच्च जीवनमूल्ये यांची प्रचिती, स्वामीनिष्ठा अशा प्रेरणांनी लेखन केले. मल्हार रामराव चिटणीस यांनी छत्रपती शिवाजी, संभाजी महाराज, थोरले राजाराम, थोरले शाहू महाराज, छत्रपती धाकटे रामराजे, धाकटे शाहू यावर बखरलेखन केले. रामचंद्रपंत अमात्य यांनी रचलेले ‘आज्ञापत्र’ आणि शिवाजी महाराजांनी आवर्जून तयार करवून घेतलेला ‘राज्यव्यवहार कोश’ मराठी साहित्यात महत्वाचे ठरतात.
ख्रिस्तीधर्मीय साहित्यिकांनी मराठी वाङ्मयनिर्मिती केलेली दिसते. फादर स्टीफन्स यांनी ‘ख्रिस्तपुराण’ लिहिले. त्याचबरोबर फादर क्रुवा, पेद्रोज, जोसेफ, मिगेल, रिबैरू यांनीही मराठीत साहित्यनिर्मिती केली. मराठी जैन साहित्याचा विचार करता पुष्पदंत- ‘णायकुमारचरिउ’, ब्रह्मगुणदास-‘श्रेणिकचरित्र’, गुणकीर्ती-‘धर्मामृत’, जिनदास- ‘हरिवंशपुराण’ हे ग्रंथ लिहिले.
१८७४ ते १९२० या कालखंडात विष्णुशास्त्री चिपळूणकर,टिळक,आगरकर, लोकहितवादी,महात्मा फुले,न्यायमूर्ती रानडे हे सामाजिक,राजकीय,धार्मिक आणि आर्थिक विचार प्रसृत करीत होते,त्याच काळात केशवसुतांनी आपल्या काव्यरचनेला प्रारंभ केला.नव्या कवितेचे सर्व विशेष त्यांच्या काव्यात आलेले दिसतात. ना.वा.टिळक, गोविंदाग्रज, रेंदाळकर, बालकवी, चंद्रशेखर, भा.रा.तांबे, वि.दा. सावरकर, साने गुरुजी, माधव ज्युलियन, बा.भ.बोरकर, बा.सी.मर्ढेकर, पु.शि.रेगे, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, वसंत बापट, ग.दि.माडगूळकर, ना.धों.महानोर, बहिणाबाई चौधरी, इंदिरा संत, कुसुमाग्रज, वसंत बापट, शांता शेळके, प्र.के.अत्रे, मुक्तिबोध, खानोलकर, दिलीप चित्रे, नारायण सुर्वे, ना.सी.फडके, वि.स.खांडेकर, भालचंद्र नेमाडे, विजय तेंडुलकर या साहित्यिकांनी मराठी सारस्वतात मोलाचे योगदान दिले.
१८७४ ते १९२० या कालखंडात मराठी रंगभूमीच्या क्षेत्रात अण्णासाहेब किर्लोस्कर, गोविंद देवल, श्रीपाद कोल्हटकर, कृष्णाजी खाडीलकर, राम गडकरी आदी नाटककारांनी संगीत नाटके लिहिली, रंगभूमीवर आणली. हा कालखंड मराठी रंगभूमीच्यादृष्टीने सुवर्णयुग मानला जातो.
साहित्यप्रवाहांनी समृद्ध
मराठी साहित्याला दलित साहित्य, ग्रामीण साहित्य, स्रीवादी साहित्य, जनवादी साहित्य, आदिवासी साहित्य, विज्ञान साहित्य, प्रादेशिक साहित्य, बालसाहित्य, मुस्लीम साहित्य, ख्रिस्ती साहित्य, बालसाहित्य अशा साहित्यप्रवाहांनी अतिशय समृद्ध केलेले दिसते. मराठीच्या विविध बोलींतून ही साहित्यनिर्मिती केलेली दिसते.
१९९० च्या नंतर जागतिकीकरणाचा परिणाम मराठी साहित्यावरही झालेला दिसतो भोगवाद, चंगळवाद, उपभोगवाद, विलासवाद, ग्राहकवाद, बाजारवाद, वस्तुवाद, लैंगिकतावाद या प्रकारच्या बाबींची वेगाने प्रतिष्ठापना करीत जागतिकीकरण वाढत चालले आहे. रंगनाथ पठारे, मकरंद साठे, श्रीधर नांदेडकर, जयंत पवार, विश्राम गुप्ते, सदानंद देशमुख, राजन गवस, आसाराम लोमटे आदी साहित्यिकांच्या लेखनात ही संवेदना प्रकटलेली दिसते.
संगणकादी नवे तंत्रज्ञान आल्यावरही मराठीचा वापर प्रचंड वाढला आहे. मराठी ब्लॉग्स,संकेतस्थळे वाढली आहेत. मराठीतील कोशवाङ्मय जगात दुसऱ्या क्रमांकावर आहेत. प्रसारमाध्यमांनी मराठी भाषा साचेबद्ध न ठेवता तिच्यात कालानुरूप बदल केले आहेत. महाराष्ट्रातील जवळजवळ सर्वच विद्यापीठांनी मराठी भाषाभ्यासाला व्यावहारिक जीवनाशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे अनेक क्षेत्रांत नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.भारतातील सर्वच विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकविली जाईल. बोलीभ्यास संशोधन, अनुवाद प्रक्रिया यांना गती मिळेल. ग्रंथालये सशक्त होतील. पुरातन साहित्याचे डिजिटायझेशन होईल. त्यामुळे डिजिटल माध्यमांतून रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील.
अनेक जाती-धर्मांचे लोक मराठी भाषा बोलतात. अनेक पंथ, धर्म, प्रांत, संस्कृती यांना मराठीने आपल्या पोटात सामावून घेतले आहे.खांद्यावर माय मराठीची पताका घेतलेल्या साडे बारा कोटींची ही भाषांमाजी भाषा साजिरी आहे.
– प्रा.डॉ.माहेश्वरी वीरसिंग गावित
(लोकसाहित्य व आदिवासी साहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक)